गुजरातमध्ये बनावट दारू प्यायल्याने ६ जणांचा मृत्यू, २५ जणांची प्रकृती गंभीर

अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई सुरू

गुजरातमध्ये बनावट दारू प्यायल्याने ६ जणांचा मृत्यू, २५ जणांची प्रकृती गंभीर

गुजरातमध्ये दारूबंदी असतानाही बनावट दारूच्या सेवनामुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भावनगर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत २५ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे गुजरातमध्ये मोठी खळबळ उडाली असून, अवैध दारूच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्याच्या यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भावनगरमध्ये एका पार्टीदरम्यान भेसळयुक्त दारूचे सेवन करण्यात आले. रॉयल स्टॅगच्या बाटल्यांमध्ये ही बनावट दारू भरून विकली जात असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ही पार्टी एका तरुणाची पोलीस दलात निवड झाल्याच्या आनंदात आयोजित करण्यात आली होती. रविवारी रात्री झालेल्या या पार्टीत काही जणांनी बनावट दारू प्यायल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडू लागली. त्यानंतर अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हे ही वाचा:
कॉकरोच जनता पार्टीला पाकिस्तानी भट्टीचे बळ…

दुःखात ‘देवाभाऊ’ बनले आधार, आज बहिणीच्या नव्या संसाराची बांधली गाठ

सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर FDAचा कडक बडगा

पोलिसांच्या बळासह आंदोलनातील हिंसाचाराची होणार चौकशी

या दुर्घटनेतील २५ वर्षीय उपेंद्रसिंह यांचा मंगळवारी दुपारी रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. या घटनेतील बाधित नागरिक भावनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांतील असल्याचे समोर आले आहे. मृतांचा आकडा सहावर पोहोचला असून, आणखी २५ जणांची प्रकृती गंभीर आहे. काही रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असून, काहींची दृष्टी कमी झाल्याची लक्षणे दिसत आहेत. तसेच काही रुग्णांना मूत्रपिंडाशी संबंधित गंभीर त्रास जाणवत असल्याची माहिती आहे.

भावनगरचे जिल्हाधिकारी मनीष कुमार बन्सल यांनी प्रशासनाला मंगळवारी सायंकाळी या घटनेची माहिती मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर बाधित व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले. मृतांपैकी ४० वर्षीय कार्तिक आणि ५० वर्षीय घनश्यामसिंह यांची ओळख पटली आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक मयूर चावडा यांच्या माहितीनुसार, ही बनावट दारू भावनगरमध्येच तयार करून विकली गेल्याचा प्राथमिक तपासातून संशय आहे. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, या अवैध दारूच्या संपूर्ण साखळीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये बनावट दारूमुळे झालेल्या या मृत्यूंनी प्रशासनासमोर गंभीर आव्हान उभे केले आहे. दारू कुठे तयार झाली, ती पार्टीपर्यंत कशी पोहोचली आणि या संपूर्ण व्यवहारामागे कोण आहेत, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यासोबतच अवैध दारूच्या पुरवठ्याची साखळी मोडून काढणे हे प्रशासनापुढील मोठे आव्हान आहे.

Exit mobile version