गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात एका १९ वर्षीय तरुणीची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‘लव्ह ट्रँगल’ मधून हा प्रकार घडला असून, या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी एका २५ वर्षीय तरुणीसह तिच्या प्रियकराला आणि इतर दोन साथीदारांना अटक केली आहे. बुधवारी कुर्ला न्यायालयाने या चौघांना १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खून करणारी तरुणी ही प्रियकराची दुसरी प्रेयसी होती. पहिल्या प्रेयसीवर तिने रागातून हा हल्ला केला.
मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कमला रामन नगर येथे शिफा शेख (१९) या तरुणीची हत्या करण्यात आली. शिफाचे नदीम उर्फ रिझवान (२८) याच्यावर प्रेम होते. मात्र, नदीमचे गेल्या ६-७ वर्षांपासून तब्बसुम शेख (२६) या तरुणीसोबतही प्रेमसंबंध होते. शिफा आणि नदीमच्या जवळीकीमुळे तब्बसुम संतापलेली होती. यापूर्वी तिने शिफाला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
हे ही वाचा:
आर. अश्विन उस्मान तारिकच्या समर्थनार्थ
मोदी-शाह यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी भेट
अभिषेक आणि वरुण अव्वल, सिकंदर रझा नंबर १ ऑलराउंडर
ट्रम्पनी गळा दाबला म्हणून मोदींनी भारत विकला!
मंगळवारी सकाळी १० वाजता शिफा नाश्ता करण्यासाठी घराबाहेर पडली आणि त्यानंतर ती नदीमला भेटण्यासाठी तब्बसुमच्या घरी गेली. तिथे तब्बसुम, नदीम, तिचा भाऊ साजिद आणि मित्र कलाम हजर होते.
नदीमवरून शिफा आणि तब्बसुम यांच्यात जोरदार वादावादी झाली. रागाच्या भरात तब्बसुमने नदीम जवळील देशी कट्टा काढून शिफावर गोळी झाडली. ही गोळी शिफाच्या गालातून थेट कवटीत शिरली, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, शिफा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपींनी तिला घराबाहेर आणून टाकले आणि तिथून पळ काढला.
तब्बसुम शेर मोहम्मद शेख (२६),नदीम उर्फ रिझवान समशुद्दीन शेख (२८),कलाम अब्दुल चौधरी (१९),साजिद शेर मोहम्मद शेख (२३) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
परिसरातील नागरिकांनी शिफाला जखमी अवस्थेत पाहून शताब्दी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शिवाजी नगर पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत मंगळवारी रात्रीच चारही आरोपींना ताब्यात घेतले. मुख्य आरोपी नदीम हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला देशी कट्टा हस्तगत केला असून अधिक तपास सुरू आहे.
