आगामी महापालिका निवडणुका आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कारवाई तीव्र केली असून, पायधुनी पोलिसांनी दक्षिण मुंबईतून तब्बल ३६ कोटी ७२ लाख रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. या प्रकरणात ३ महिलांसह ९ जणांना अटक करण्यात आली असून, ड्रग्स पुरवठ्याची मोठी साखळी उघडकीस आली आहे.
१६ डिसेंबर रोजी पी. डी’मेलो रोड, मस्जिद बंदर परिसरात पायधुनी पोलिसांनी जलाराम नटवर ठक्कर (३७) आणि वसीम मजरुद्दीन सय्यद (२७) यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्यांच्याकडून ३२६.२२ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. याप्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान हे हेरॉईन रुबीना मोहम्मद सय्यद खान (३०) हिच्यामार्फत आल्याचे निष्पन्न झाले. पुढील चौकशीत हा माल शबनम शेख हिचा असल्याचे उघड झाल्यानंतर, फरार शबनमला अजमेर (राजस्थान) येथून अटक करण्यात आली. शबनमला माल पुरवणारी मुस्कान समरूल शेख (१९) हिलाही मस्जिद बंदर परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
हे ही वाचा:
ट्रम्प- झेलेन्स्की भेटीपूर्वी रशियाचा कीववर क्षेपणास्त्र हल्ला
पाकिस्तानात नाही राहायचे, गेल्या वर्षी ७ लाख लोकांनी सोडला देश
पुण्यात राष्ट्रवादीचे मनोमिलन नाहीच, जगताप यांनी राजीनामा दिला कशासाठी?
यंदा जगातील अनेक विद्यापीठे ठरली वादग्रस्त
मुस्कानच्या चौकशीतून पुढे मेहरबान अली हा मुख्य पुरवठादार असल्याचे समोर आले. २४ डिसेंबर रोजी सापळा रचून अब्दुल कादिर शेख याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १ कोटी ३८ लाख रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले.
यानंतर पोलिसांनी ओशिवरा येथील आनंदनगर परिसरात छापा टाकून नवाजीस गालीब खान, सारिक मोहम्मद सलीम सलमानी आणि समद गालीब खान यांना हेरॉईनच्या कागदी पुड्या पॅक करताना रंगेहाथ पकडले. त्या ठिकाणाहून ३३ कोटी ८६ लाख ७६ हजार रुपयांचे हेरॉईन हस्तगत करण्यात आले.
या कारवाईत पोलिसांनी एकूण ८ किलो ८३२ ग्रॅम वजनाचे हेरॉईन, ८.२६ लाख रुपयांची रोख रक्कम, १० लाखांची मोटार कार आणि १२ मोबाईल फोन असा एकूण ३६ कोटी ७२ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या यशस्वी कारवाईचे नेतृत्व परिमंडळ-२ चे पोलीस उपआयुक्त विजयकांत सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बूवा यांच्या मार्गदर्शनाखाली पायधुनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि पथकाने केले. या प्रकरणात ड्रग्स रॅकेटच्या आंतरराज्यीय साखळीचा तपास सुरू असून, आणखी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
