कॅनडात भारतीय वंशाच्या हिमांशीची हत्या केली होती अब्दुल गफूरीने

पोलिसांनी केली अटक, होऊ शकते जन्मठेपेची शिक्षा

कॅनडात भारतीय वंशाच्या हिमांशीची हत्या केली होती अब्दुल गफूरीने

कॅनडातील टोरंटो येथे भारतीय वंशाच्या ३० वर्षीय हिमांशी खुराना यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक माध्यमांनी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी हिमांशी यांचा ३२ वर्षीय साथीदार अब्दुल गफूरी याला अटक केली आहे.

हिमांशी खुराना यांची गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हत्या झाली होती. पोलिसांनी या प्रकरणाला ‘जवळच्या साथीदाराकडून झालेली हिंसा’ असे संबोधले होते. अब्दुल गफूरी हा टोरंटोचा रहिवासी असून त्याला शुक्रवारी विमानतळावरून अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी शनिवारी स्थानिक वेळेनुसार सांगितले की, गफूरीवर हिमांशी खुराना यांच्या प्रथम श्रेणीतील हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे.

टोरंटो पोलिसांच्या फरार आरोपी शोध पथक आणि हत्या तपास पथकाने गफूरीला कॅनडात परत आणण्यासाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पोलिस यंत्रणांशी समन्वय साधला. मात्र, तो कोणत्या देशात होता, याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली नाही.

२० डिसेंबरला आढळला होता मृतदेह

हिमांशी खुराना हिचा मृतदेह गेल्या वर्षी २० डिसेंबर रोजी आढळून आला होता. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, १९ डिसेंबर रोजी स्ट्रॅचन ऍव्हेन्यू आणि वेलिंग्टन स्ट्रीट वेस्ट परिसरातून एका महिलेच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हिमांशी एका घरात मृतावस्थेत आढळल्या. पोलिसांनी पीडित महिला आणि संशयित एकमेकांच्या परिचयाचे असल्याचे स्पष्ट केले होते. प्राथमिक तपासानंतर या प्रकरणाला हत्येचे स्वरूप देण्यात आले.

हे ही वाचा:

‘जेन झी’ची काही लोकांनी दिशाभूल केली!

मुंबई-पुण्याच्या ऑफिस मार्केटला ब्रेक; बंगळुरू-हैदराबादची जोरदार आघाडी

महाराष्ट्रातील ‘या’ ५ ऑफबीट ठिकाणांना एकदा नक्की भेट द्या!

विदेशी पैसा हवाय कशाला ?

भारतीय दूतावासानेही व्यक्त केला शोक

हिमांशी खुराना यांच्या हत्येनंतर टोरंटोतील भारतीय वाणिज्य दूतावासाने दुःख व्यक्त केले होते. भारतीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवले असून कॅनडाच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाने हिमांशीच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत दिली जात असल्याचे सांगितले होते.

अब्दुल गफूरीविरोधात कॅनडात प्रथम श्रेणीतील हत्येचा वॉरंट जारी करण्यात आला होता. न्यायालयात हत्या पूर्वनियोजित आणि हेतुपुरस्सर असल्याचे सिद्ध झाल्यास या आरोपासाठी पॅरोलशिवाय जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

 

भारतीय महिलांसाठी विशेष केंद्राची स्थापना

हिमांशी यांच्या हत्येनंतर गेल्या वर्षी टोरंटोतील भारतीय वाणिज्य दूतावासाने भारतीय महिलांसाठी विशेष ‘वन स्टॉप सेंटर’ सुरू केले होते. घरगुती हिंसाचार, गैरवर्तन, कौटुंबिक वाद, शोषण आणि कायदेशीर अडचणींचा सामना करणाऱ्या भारतीय महिलांना मदत करणे हा या केंद्राचा उद्देश आहे.

टोरंटोतील भारतीय मिशनच्या माध्यमातून हे केंद्र कार्यरत आहे. भारतीय वाणिज्य दूतावासाने जारी केलेल्या निवेदनानुसार, हे केंद्र गरजू महिलांना वेळेवर आणि योग्य मदत मिळवून देण्यासाठी लाभार्थीकेंद्रित सेवा उपलब्ध करून देईल.

यामध्ये तातडीचे समुपदेशन, मानसिक-सामाजिक मदत, कायदेशीर मदत आणि सल्ला तसेच कॅनडातील आवश्यक सामुदायिक आणि सामाजिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली जाईल. या केंद्राचे सर्व काम कॅनडाच्या कायद्यांच्या चौकटीत केले जाईल.

केंद्राचे संचालन एका महिला अधिकाऱ्यामार्फत केले जाणार असून, २४ तासांच्या हेल्पलाइनद्वारे अडचणीत असलेल्या महिलांच्या फोनवर तातडीने प्रतिसाद दिला जाईल. गरजू महिलांना सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार मदत उपलब्ध करून दिली जाईल.

पॅनेलवरील स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समुपदेशन आणि भावनिक आधारही दिला जाणार आहे. आर्थिक मदत भारत सरकारच्या नियमांनुसार लाभार्थ्यांच्या परिस्थितीचा विचार करून दिली जाईल.

 

Exit mobile version