पोलिसांची नजर चुकवून अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी खासगी कारवर बनावट ‘POLICE’ प्लेट लावल्याचा धक्कादायक प्रकार डोंगरी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या कारमधून मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाची तस्करी केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ७.२ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे १ लाख ८ हजार रुपये आहे.
जमीर सिद्दीक सय्यद (२६), सोमनाथ शरद महाजन (३०) आणि मोहम्मद झीशान अफसर सय्यद (२९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी एमएच-४३-सीसी-३२७७ क्रमांकाची कारही ताब्यात घेतली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २.५० वाजता डोंगरी पोलिसांचे पथक एस.व्ही.पी. रोडवरील वाडीबंदर परिसरात गस्त घालत होते. सुन्नी मशिदीसमोरील पुलाजवळ एक चारचाकी वाहन संशयास्पदरीत्या उभे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. कारमधील दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी केली.
हे ही वाचा:
उत्तराखंडमध्ये ढगफुटीसह मुसळधार पावसाचा कहर; पूल गेला वाहून
पीओकेमधील हिंसक आंदोलनानंतर पाक सरकार बॅकफूटवर; चर्चेची तयारी
साहित्य भारतीच्या ‘आषाढरंग’ने न्हाऊन निघाली कवीमने
संसदेत गोंधळ घालण्यासाठी फक्त चार दिवस शिल्लक…
पंचांच्या उपस्थितीत कारची झडती घेतली असता जमीर सय्यद याच्याकडून ३.४ ग्रॅम, तर सोमनाथ महाजन याच्याकडून ३.८ ग्रॅम एमडी सापडले. एकूण ७.२ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला. या कारवर ‘POLICE’ असा बनावट फलक लावण्यात आल्याचेही तपासात समोर आले.
प्राथमिक चौकशीत दोघांनी हा एमडी मोहम्मद झीशान अफसर सय्यद याच्याकडून खरेदी केल्याची माहिती पोलिसांना दिल्याचा दावा आहे. त्यानंतर पोलिसांनी झीशानला अटक केली.
या प्रकरणी डोंगरी पोलिसांनी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या (NDPS) कलम ८(क) आणि २२(ब), तसेच भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २०५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पुढील दिवसापर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, आरोपींना एमडीचा पुरवठा नेमका कुठून होत होता, ते किती काळापासून अमली पदार्थांच्या तस्करीत सक्रिय होते, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास डोंगरी पोलिसांकडून सुरू आहे. आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची तसेच एमडीच्या पुरवठा आणि वितरणाच्या नेटवर्कचीही चौकशी करण्यात येत आहे.
