दुकानांच्या मागील भिंत फोडून घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा जे.जे. मार्ग पोलिसांनी पर्दाफाश करत दोन कुख्यात गुन्हेगारांना अटक केली आहे. या अटकेमुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे जिल्ह्यातील किमान सात घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी कमकुवत भिंती असलेली दुकाने व घरे हेरून लोखंडी रॉडच्या साहाय्याने भिंत फोडून आत प्रवेश करत होते. संशय येऊ नये म्हणून ते मुख्य दरवाजा व कुलूप शाबूत ठेवत असत. २ जानेवारी २०२६ रोजी दक्षिण मुंबईतील आय.आर. रोडवरील ‘बशीर मेहंदी’ नावाच्या बंद दुकानात चोरी झाल्याने या प्रकरणाचा छडा लागला. आरोपींनी बाथरूमची खिडकी व भिंत फोडून दुकानात प्रवेश केला आणि काउंटरचा ड्रॉवर फोडून सुमारे १.५० लाख रुपये रोख व इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या. याप्रकरणी जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रईस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर व त्यांच्या पथकाने परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यांच्या माहितीतून आरोपी सराईत गुन्हेगार असून ओळख लपवण्यासाठी वारंवार ठिकाणे बदलत असल्याचे निष्पन्न झाले.
हे ही वाचा:
ग्रीनलँड आणि अमेरिका संघर्ष चिघळणार? अतिरिक्त सैन्याच्या उपस्थितीने पडले प्रश्न
भारत- बांगलादेश तणावादरम्यान ‘चिकन नेक’जवळ चीनी राजदूतांचा दौरा
उत्तर प्रदेशातील हापूरमधून २५० किलो स्फोटके जप्त
फडणवीस म्हणाले, तिसऱ्या मुंबईसाठी भरघोस गुंतवणूक येईल!
दरम्यान, आरोपी शिवडी (दारुखाना) परिसरात दारू पिण्यास येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शरीफुल इस्लाम अब्दुल सत्तार शेख (वय ५१) आणि सलीम रहुफ खान (वय ५२) अशी असून ते दोघेही पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. चौकशीत त्यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी याच पद्धतीने घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास जे.जे. मार्ग पोलीस करत आहेत.
