कांदिवली पूर्व येथील अशोकनगर परिसरात असलेल्या भारत को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या एटीएममध्ये चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी एटीएमचे बाह्य दार जबरदस्तीने तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मजबूत सुरक्षा यंत्रणेमुळे त्यांचा डाव फसला. या प्रकरणी समता नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी बँकेचे शाखा व्यवस्थापक शशांक जगन्नाथ पुजारी (वय ३१) यांनी तक्रार दाखल केली आहे. भारत को- ऑपरेटिव्ह बँकेची अशोकनगर येथील शाखा आणि तिच्या शेजारी असलेल्या एटीएमची सुरक्षा खासगी एजन्सीमार्फत करण्यात येते. ९ जानेवारी रोजी रात्री सुमारे १०.४० वाजता सीसीटीव्ही सर्व्हिलन्स कंपनीतील कर्मचारी प्रविण कोलापाटे यांनी एटीएममध्ये संशयास्पद हालचाली होत असल्याची माहिती दूरध्वनीवरून दिली.
माहिती मिळताच शाखा व्यवस्थापक पुजारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये रात्री सुमारे १०.०८ वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात युवक एटीएमजवळ आल्याचे दिसून येते. ओळख लपवण्यासाठी एकाने टोपी तर दुसऱ्याने हेल्मेट घातले होते. त्यांनी एटीएमचे बाह्य दार जोरात ओढून उघडले; मात्र आत बसवलेले पिन-सिस्टीमचे सुरक्षा दार तोडण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे ते एटीएममध्ये प्रवेश करू शकले नाहीत आणि कोणतीही चोरी न करता तेथून फरार झाले.
हे ही वाचा:
माहिममध्ये मेडिकल स्टोअरवर एअरगन दाखवून धमकी; आरोपी अटकेत
उद्योजक प्रशांत कारुळकर यांना देवरुखे भूषण पुरस्कार
ऊर्जा क्षेत्रात क्रांतीची नांदी; तारांशिवाय वाहिली वीज! प्रकरण काय?
अमेरिका- फ्रान्स टॅरिफ युद्ध: फ्रेंच वाइनवर २०० टक्के टॅरिफ लावणार
घटनेनंतर बँक प्रशासनाने तपासणी केली असता एटीएममधील रोख रक्कम किंवा इतर कोणतेही साहित्य चोरीला गेले नसल्याचे स्पष्ट झाले. तरीही सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब मानून बँक प्रशासनाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. समता नगर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच परिसरात पोलिस गस्त वाढवण्यात आली आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
