छत्तीसगढमध्ये एका हायप्रोफाइल फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. येथील कोंडागाव जिल्ह्यात एका भाजप नेत्याला ४१ लाख रुपयांना फसवण्यात आले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या संतोष कटारिया यांना जेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले तेव्हा त्यांनी केशकल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
संतोष कटारिया हे छत्तीसगड भाजपच्या कोर ग्रुपचे सदस्य आहेत. संतोष अविभाजित मध्य प्रदेशातील उत्तर बस्तरमध्ये जिल्हाध्यक्ष देखील आहेत. ते बऱ्याच काळापासून राजकारणाशी संबंधित आहेत. त्यांची भेट काजल जोशी नावाच्या महिलेशी झाली. महिलेने सांगितले की ती दिल्लीत राहते आणि आरएसएसची अधिकारी आहे. महिलेने संतोष कटारिया यांना ऑफर दिली की जर त्यांनी तीन कोटी रुपये दिले तर ती त्यांना खनिज महामंडळाचे अध्यक्ष बनवेल. संतोष कटारिया महिलेच्या शब्दांना बळी पडले आणि अध्यक्ष होण्यासाठी त्यांनी ३ महिन्यांत वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये एकूण ४१.३० लाख रुपये दिले.
राज्य सरकारने महामंडळे आणि मंडळांची यादी जाहीर केली तेव्हा संतोष कटारिया यांचे नाव त्यात नव्हते. त्यानंतर त्यांनी महिलेशी संपर्क साधला पण तिचा फोन बंद होता. अनेक दिवस संपर्क साधूनही महिलेशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशन गाठले आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की या संपूर्ण फसवणुकीत एक मुलगा आणि एक मुलगी सामील आहेत.
संतोष कटारिया यांनी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रायपूरचे रहिवासी राजीव सोनी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी काजल जोशीचे नाव ऐकले होते. त्यानंतर राजीवने काजलची भेट घडवून आणली. काजलने सांगितले की ती महाराष्ट्राची आहे आणि दिल्लीत राहून आरएसएसचे काम पाहते. कटारिया यांनी सांगितले की, त्यांनी पहिल्यांदा काजलला २० लाख रुपये दिले होते. त्यानंतर क्यूआर कोडद्वारे १ लाख ३० हजार रुपये खात्यात पाठवले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, यानंतर कटारिया यांनी ऑक्टोबर-२०२४ मध्ये रायपूरमधील एका हॉटेलमध्ये काजल आणि राजीव यांना २० लाख रुपये रोख दिले आणि अशा प्रकारे एकूण ४१ लाख ३० हजार रुपये देण्यात आले.
हे ही वाचा :
जो लालचामुळं धर्मांतर करतो, तो देशही विकू शकतो
लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण : सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती
जन्म प्रमाणपत्र घोटाळा, मराठवाड्यात १२,९६५ जन्म प्रमाणपत्रे रद्द!
पुढील उपराष्ट्रपती जेडीयूचा नाहीतर भाजपाचा असेल!
केशकल पोलिस स्टेशनचे प्रभारी ज्ञानेंद्र सिंह चौहान म्हणाले की, दोन्ही आरोपींविरुद्ध फसवणूक, गुन्हेगारी धमकी आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांचाही शोध सुरू आहे. ते म्हणाले की, काजल जोशीचे नाव कोमल मुंजारे असल्याचे तपासात समोर आले आहे.
