सोन्याच्या खऱ्या विटांच्या मोबदल्यात दागिन्यांची डिलिव्हरी घेणे एका मुंबईकर सराफाला चांगलेच महागात पडले आहे. न्हावी (जळगाव) येथील एका सराफाने आणि कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याने संगनमत करून एका सराफाची तब्बल ४४ लाख रुपयांच्या दागिन्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एल. टी. मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोन्ही आरोपी फरार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार सुशीलकुमार लालिचंद माजी (रा. नेरुळ) यांचा मशीद बंदर येथील अमिना चेंबर्समध्ये दागिन्यांचा व्यवसाय आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये अंधेरीतील सहारा हॉटेलमध्ये झालेल्या एका ज्वेलरी एक्झिबिशनमध्ये त्यांची ओळख जळगाव येथील ‘शुभ गोल्ड ज्वेलर्स’च्या मालकाशी झाली होती. याच ओळखीचा फायदा घेत संबंधित सराफाने जुलै २०२६ मध्ये माजी यांना फोन करून दागिन्यांची ऑर्डर दिली आणि पेमेंट म्हणून सोन्याच्या विटा देण्याचे आमिष दाखवले.
हे ही वाचा:
महिला क्रिकेटच्या नव्या युगाची लॉर्ड्सवर नांदी
कल्याण शहरातील प्रसिद्ध ज्वेलर्स मुथाच्या मुलाने उडवले दुचाकीला
क्लान राइस सेमीफायनलमध्ये खेळणार?
मणिपूरमध्ये शस्त्रसाठ्यासह उग्रवाद्याला अटक
विश्वास बसल्याने सुशीलकुमार माजी यांनी ३२३ ग्रॅम वजनाचे, सुमारे ४४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ‘नवीन कुरिअर कंपनी’च्या एका कर्मचाऱ्यामार्फत जळगावला पाठवले. कुरिअर पोहोचल्यावर त्या कर्मचाऱ्याने माजी यांच्याकडून दागिने घेतले आणि बदल्यात सहा सोन्याच्या विटा (प्रत्येकी ५० ग्रॅम) दिल्या.
दागिने मिळाल्यानंतर माजी यांनी जेव्हा या सोन्याच्या विटांची खातरजमा केली, तेव्हा त्या सर्व विटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी संबंधित सराफ आणि कुरिअर कर्मचाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघांचेही फोन बंद होते.
या प्रकरणी सुशीलकुमार माजी यांनी एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, दोन्ही आरोपींचा शोध घेतला जात आहे. आरोपींनी अशाच पद्धतीने इतर सराफांचीही फसवणूक केली आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
