के पूर्वच्या सहाय्यक आयुक्ताने केला बलात्कार, झाली अटक

लग्नाचे आमिष दाखवले

के पूर्वच्या सहाय्यक आयुक्ताने केला बलात्कार, झाली अटक

मुंबई महापालिकेच्या ‘के-पूर्व’ विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन शुक्ला यांना पार्कसाईट पोलिसांनी सोमवारी अटक केली. एका महिला आर्किटेक्टला लग्नाचे आमिष दाखवून गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक आरोप शुक्ला यांच्यावर आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असून, त्यांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला एका खासगी कंपनीत आर्किटेक्ट इंजिनिअर आहे. तीन वर्षांपूर्वी नितीन शुक्ला हे विक्रोळी विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असताना कामानिमित्त त्यांची पीडितेशी भेट झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि त्यानंतर शुक्ला यांनी लग्नाचे वचन देऊन पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. विशेष म्हणजे, शुक्ला यांचे सात वर्षांपूर्वीच लग्न झाले आहे, ही बाब त्यांनी पीडितेपासून लपवून ठेवली होती, असेही तक्रारीत म्हटले आहे. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने २६ एप्रिलच्या रात्री पार्कसाईट पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती.

हे ही वाचा:

आईएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कप : १६ पदकांसह भारत अव्वल

१० दिवसांत ४२ पाकिस्तानी सैनिक ठार

क्लिप वारंवार पाहिली, दिशा बदलली नाही

भारत – न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या तक्रारीवरून शुक्ला यांना सोमवारी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. प्राथमिक चौकशीत मिळालेले पुरावे आणि पीडितेचा जबाब यांच्या आधारे पोलिसांनी त्यांना अटक केली.

‘एफ-वॉर्ड’मध्ये असताना त्यांनी केलेल्या एका तोडक कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र निदर्शने केली होती, ज्यामुळे ५० दिवसांतच त्यांची बदली झाली होती.
या बलात्कार प्रकरणामुळे पालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version