चेंबूरमध्ये चिमुरडीचे अपहरण करण्याचा प्रयत्न फसला

सतर्क तरुणाच्या प्रसंगावधानामुळे नराधम पोलिसांच्या ताब्यात

चेंबूरमध्ये चिमुरडीचे अपहरण करण्याचा प्रयत्न फसला

मुंबई: चेंबूर परिसरात सात वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करण्याचा प्रयत्न एका सतर्क तरुणाने आपल्या प्रसंगावधानाने हाणून पाडला. गुरुवारी रात्री घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील लालडोंगर परिसरात राहणारा १८ वर्षीय कार्तिक गणेश अहिरे हा तरुण बुधवारी (४ जून) रात्री सव्वा नऊच्या सुमारास एकता मित्र मंडळाजवळ होता. त्याच वेळी त्याला एक अनोळखी व्यक्ती एका सात वर्षांच्या मुलीचा हात धरून तिला जबरदस्तीने घेऊन जाताना दिसली.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानविरुद्ध भारताची दमदार मुसंडी!

केरळमध्ये पावसाचा कहर; पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडला वेग

फैसल खान तथा ‘खान सर’ अखेर न्यायालयात शरण
त्या अनोळखी व्यक्तीने कार्तिकला थांबवून हायवेचा रस्ता विचारला. मात्र, त्या व्यक्तीचे अस्ताव्यस्त कपडे आणि हातापायाला लागलेला चिखल पाहून कार्तिकला संशय आला. त्याने तातडीने त्या मुलीला त्या व्यक्तीपासून दूर केले आणि तिची विचारपूस केली. त्या मुलीने आपले नाव सांगितले. कार्तिकने जेव्हा तिला “हा माणूस तुझे वडील आहेत का?” असे विचारले, तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला.
कार्तिकने संबंधित व्यक्तीकडे (राजेश सुरेश हुजारे, वय ४५) अधिक चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर कार्तिकने आरडाओरडा करून स्थानिक नागरिकांना बोलावले. जमाव गोळा होताच नागरिकांनी त्या संशयिताला जाब विचारला आणि परिस्थितीचे गांभीर्य पाहून पोलिसांना तातडीने १०० क्रमांकावर फोन केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. कार्तिक अहिरे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरण आणि संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीला अशा प्रकारे नेण्याचा उद्देश काय होता आणि यामागे आणखी कोणी आहे का, याचा तपास चेंबूर पोलीस करत आहेत.

Exit mobile version