मुंबई: शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका सायबर भामट्याने माटुंग्यातील ६० वर्षीय गृहिणीची तब्बल २ कोटी २० लाख ६० हजार ४०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
तक्रारदार रिटा विपुल गंगर (वय ६०) या माटुंग्यात राहतात आणि घरूनच विणकाम शिकवण्याचे काम करतात. मार्च २०२६ मध्ये त्यांना ‘Quantifying Wealth Trends’ नावाच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले. या ग्रुपमध्ये शेअर ट्रेडिंगबाबत चर्चा चालत असे. सुरुवातीला त्यांना ५० हजार रुपयांची गुंतवणूक करायला सांगून एक लिंक पाठवण्यात आली. त्या लिंकद्वारे त्यांनी ‘GSA CAP’ नावाचे ॲप डाऊनलोड केले आणि ट्रेडिंग सुरू केले.
हे ही वाचा:
चेंबूरमध्ये चिमुरडीचे अपहरण करण्याचा प्रयत्न फसला
अफगाणिस्तानविरुद्ध भारताची दमदार मुसंडी!
वडापाव- समोसे वर्तमानपत्रात देण्यास बंदी! FSSAI कडून खाद्य विक्रेत्यांना इशारा
सुरुवातीला गुंतवलेल्या ५० हजार रुपयांवर नफा झाल्याचे ॲपवर दिसल्याने तक्रारदारांचा विश्वास बसला. त्यानंतर भामट्यांनी त्यांना मोठी रक्कम गुंतवल्यास आणखी फायदा होईल, असे सांगून फसवणुकीचे जाळे विणले. त्यांनी तक्रारदार आणि त्यांच्या मुलाच्या नावाने बनावट ट्रेडिंग खाती उघडली. काही दिवसांतच तक्रारदारांना त्यांच्या खात्यात ११ कोटी रुपये आणि मुलाच्या खात्यात १० कोटी रुपये जमा झाल्याचे ॲपवर दिसू लागले.
जेव्हा तक्रारदारांनी आपल्या खात्यातील पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना पैसे काढता आले नाहीत. तेव्हा भामट्यांनी ‘व्हीआयपी मेंबरशिप’ घेण्यासाठी १५ लाख रुपयांची मागणी केली. या प्रकारामुळे फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तक्रारदारांनी पोलिसांत धाव घेतली.
तक्रारदारांनी १ मार्च ते २० मे या कालावधीत विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण २ कोटी २० लाख ६० हजार ४०० रुपये भरले. सायबर पोलिसांनी या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलीस या खात्यांचा आणि आरोपींचा शोध घेत आहेत.







