लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत. यापूर्वी या प्रकरणी मंगळवारी ईडीने लालूप्रसाद यांच्या पत्नी राबडी देवी, मुलगी मीसा भारती, मुलगा तेज प्रताप यादव यांची चौकशी केली होती. त्यानंतर बुधवार, १९ मार्च रोजी लालूप्रसाद यादव यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार ते कार्यालयात हजर झाले आहेत.
लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणात ईडीने लालूप्रसाद यादव यांना समन्स बजावले होते. त्यानुसार त्यांना बुधवारी सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार लालूप्रसाद यादव ईडी कार्यालयात हजर झाले असून त्यांच्यासोबत राजद खासदार आणि त्यांची मुलगी मीसा भारती आहेत. दरम्यान, ईडी कार्यालयाबाहेर राजद कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच त्यांनी यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी देखील केली.
#WATCH | Patna | RJD president Lalu Yadav arrives at the office of the Enforcement Directorate to appear before the agency in land for job scam pic.twitter.com/3YLoE2Jrew
— ANI (@ANI) March 19, 2025
लालू प्रसादांच्या चौकशीबाबत राजदचे प्रवक्ते शक्ती यादव म्हणाले की, हे निवडणूक समन्स आहे. या सगळ्यामुळे काही फरक पडत नाही. लालूप्रसाद यादव यांचे कुटुंब घाबरणार नाही. निवडणुकीच्या काळात भाजपा अशा युक्त्या अवलंबत राहतो.
मागील वर्षीही या प्रकरणी लालूप्रसाद यादव यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी झाली होती. आतापर्यंत अनेकवेळा चौकशी करण्यात आली आहे. २० जानेवारी २०२४ रोजी दिल्ली आणि पाटणा पथकातील ईडी अधिकाऱ्यांनी लालूप्रसाद यादव आणि त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांची १० तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. या काळात लालूप्रसाद यादव यांना ५० हून अधिक प्रश्न विचारण्यात आले होते.
हे ही वाचा :
न्यू इंडिया को-ओ.बँक घोटाळा, एका राजकीय पक्षाच्या माजी सचिवाच्या भावाला अटक!
सुकांत कदम स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनलमध्ये दुसऱ्या स्थानावर
नागपूर हिंसाचारादरम्यान अंधाराचा फायदा घेत महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग
‘ग्राहक संरक्षण’ वाढवण्यासाठी केंद्र सरकारची मेटासोबत भागीदारी
२००४ ते २००९ या काळात रेल्वेमंत्री असताना लालूप्रसाद यादव यांनी ‘ग्रुप डी’ मधील लोकांना नोकऱ्या दिल्या आणि त्यांच्या जमिनी आपल्या नावावर केल्याचा आरोप आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी त्यांची जमीन घेऊन त्यांना रेल्वेच्या ‘ग्रुप डी’मध्ये नोकरी दिल्याची पुष्टी अनेकांनी त्यांच्या वक्तव्यातून केली आहे. रेल्वेमंत्री असताना लालूप्रसाद यादव यांनी नियमांकडे दुर्लक्ष करून भरती केल्याचे सीबीआयने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
