दिल्लीत मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन (Special Intensive Revision – SIR) मोहिमेदरम्यान कर्तव्य बजावत असलेल्या एका महिला बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) सोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन करणे आणि तिचा अपमान केल्याचा आरोप या चौघांवर आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोहम्मद सबरीन (४४), अतीक-उर-रहमान (५८), मोहम्मद आसिफ (५०) आणि मोहम्मद आफताब (४४) यांना अटक केली आहे. हे चौघेही तुर्कमान गेट परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
संबंधित घटना ५ जुलै रोजी मध्य दिल्लीतील चांदणी महल परिसरातील फाटक तेलियान येथे घडली. तक्रारदार या विशेष शिक्षण विषयाच्या पदव्युत्तर शिक्षिका असून त्यांची मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेसाठी BLO म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तक्रारीनुसार, त्या घराघरांत जाऊन मतदार पडताळणीचे काम करत असताना एका व्यक्तीने त्यांच्या विरोधानंतरही BLO रजिस्टर त्यांच्या मांडीवर ठेवून त्यावर स्वाक्षरी केली. त्यानंतर उपस्थित इतरांनी त्यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलत गैरवर्तन केले आणि SIR मोहिमेचे फॉर्म स्वीकारण्यास नकार देत त्यांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
घटना ५ जुलै रोजी घडली असली तरी तक्रार १५ जुलै रोजी पोलिसांकडे पोहोचली. तक्रारदार महिलेने प्रथम जुन्या दिल्लीतील अतिरिक्त जिल्हाधिकारी (ADM) यांच्याशी संपर्क साधला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पुढील कारवाईबाबत चर्चा सुरू असल्यामुळे तक्रार दाखल करण्यास विलंब झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर ADM यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला.
हे ही वाचा:
पश्चिम बंगालमध्ये ट्रेनची कारला धडक; दोन विद्यार्थ्यांसह तिघांचा मृत्यू
चीनने २२ कोटी अमेरिकन मतदारांचा डेटा चोरला!
राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी कोसळला रॉड, कार्यकर्ता मृत्युमुखी
रोहित शर्मा खरंच निवृत्त होणार? प्रशिक्षकांचे वक्तव्य चर्चेत
प्राथमिक चौकशीत आरोपांना आधार मिळाल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यावर बलप्रयोग, महिलेचा विनयभंग, तिचा अपमान करणे आणि समान उद्देशाने गुन्हा केल्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
