28.3 C
Mumbai
Saturday, July 18, 2026
घरसंपादकीय२० जुलैला उपोषण थांबणार! सुरू होणार संसदेतला गोंधळ

२० जुलैला उपोषण थांबणार! सुरू होणार संसदेतला गोंधळ

Google News Follow

Related

केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून संसदेच्या प्रत्येक अधिवेशनात एखादा विषय कायम गाजत आला आहे. त्या विषयावरून अधिवेशनात प्रचंड गोंधळ माजवायचा, कोणतेही कामकाज होऊ द्यायचे नाही, बहिष्कार घालायचा, सभात्याग करायचा, नंतर संसदेच्या बाहेर बसून आंदोलने करायची, संसदेत नियमांचे उल्लंघन करायचे हाच शिरस्ता या सगळ्या अधिवेशनात विरोधकांकडून पाहायला मिळालेला आहे. हीच प्रथा आता २० जुलैपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही दिसणार यात कोणतीही शंका नाही. त्याला आधार मिळत आहे तो, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा.

देशातील नीट ही प्रवेशपरिक्षा पेपरफुटीमुळे रद्द झाली आणि या मुद्द्यावरून आंदोलन सुरू झाले. कॉकरोच जनता पार्टी नावाच्या चळवळीने या पेपरफुटीप्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन सुरू केले. २८ जूनपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीतल्या जंतरमंतर येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली. तेव्हापासून २० जुलैला सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनाच्या दिवशीच एक मोर्चा काढण्याचे सुतोवाच केले जात होते. ९ जुलैला कॉकरोच जनता पार्टीने तशी घोषणाही केली. आता वांगचुक यांनीही २० जुलैला आपण हे उपोषण थांबवणार असल्याचे जाहीर केलेले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, आंदोलनाचा उद्देश संसदेच्या अधिवेशनात विरोधकांना एक ताजा विषय मिळावा, हाच आहे.

वांगचुक हे जवळपास २० दिवस हे उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती ढासळल्याचे वेगवेगळे रिपोर्ट्सही समोर येत आहेत. त्यांचे वजन किती घटले ते सांगितले जात आहे. पण एखादी ६० वयाची व्यक्ती २० दिवस काहीही न खातापिता एकाच ठिकाणी राहू शकते, शिवाय, लोकांशी संवाद साधू शकते हे मात्र पटणारे नाही. असो. त्यामागील कारण काय याचा आपण कोणताही अंदाज बांधू शकत नाही, किंवा त्यावर भाष्य करणे शक्य नाही. आजकाल आमरण उपोषणाचे हे तंत्र सगळ्याच उपोषणकर्त्यांना गवसले आहे. मग कधी मराठा आंदोलनाचे मनोज जरांगे असे आंदोलन करतात तर कधी रोहित पवारही आमरण उपोषणाच्या आंदोलनाचे हत्यार उपसतात. कधी आणखी कुणी या आंदोलनाचा प्रयत्न करतो. मीडिया याची भरपूर चर्चा करतो. डॉक्टर त्या आंदोलनकर्त्याला तपासतात. लोक भेटायला येतात. सहानुभूती दर्शविली जाते. अनेक दिवस ती व्यक्ती काहीही न खाता कशी काय राहू शकते, असे प्रश्न मात्र कुणीही विचारत नाही. आंदोलनाची धार कमी होऊ नये, म्हणून मीडियाही काळजी घेत असावा. असो. मात्र हे आंदोलन २० जुलैपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापर्यंतच सुरू राहील ही घोषणा पुरेशी बोलकी आहे.

हे ही वाचा:

जॉर्डनमध्ये अमेरिकन तळ लक्ष्य; विमाने, टँकर उद्ध्वस्त?

एडनच्या आखातात रासायनिक टँकरवर सशस्त्र हल्ला; जहाजावर हल्लेखोरांचा ताबा

UPI व्यवहारांवर शुल्काची चाहूल?

मुंबई लोकलमध्ये ‘सीट वॉर’चा कळस; महिला डब्यात पेपर स्प्रे फवारला

आतापर्यंत वांगचुक हे २० दिवस उपाशी राहिलेले आहेत पण त्यादरम्यान सरकारकडून कुणीही त्यांना भेटायला आलेले नाही. सरकारनेही हे आंदोलन सुरू राहणार नाही, यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. वांगचुक यांना अनेकांनी आंदोलन मागे घेण्यास सांगितलेले आहे पण त्यावर वांगचुक यांनी कोणताही विचार केलेला नाही. त्यामुळे आंदोलन २० जुलैपर्यंत खेचण्याचा हा प्रयत्न आहे. २० जुलैपर्यंत आपण जिवंत राहणार असे वांगचुक छातीठोकपणे सांगत आहेत. एकदा २० जुलैचा दिवस आला की, आपोआपच आंदोलनाची सांगता होईल आणि संसदेकडे जाणाऱ्या मोर्चात त्याचे रूपांतर होऊन हा सगळा मुद्दाच मागे पडेल. मग सुरू होईल ती संसदेतली गोंधळाची परंपरा.

सगळे पक्ष हे प्रामुख्याने नीट परीक्षा पेपरफुटी, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या विषयावर राजकारण करण्यासाठी उत्सुक आहेत. नीट परीक्षेचे पेपर फुटले ही निश्चितच चिंतेची बाब होती. आणि प्रत्येकवेळेला अशी पेपरफुटी होते तेव्हाही ती चिंतेची बाब असते. मुख्य म्हणजे ज्यांना हे पेपर सेट करण्यासाठी नेमले त्यांनीच विश्वासघात केला. लाखो रुपये या पेपरफुटीसाठी मोजले गेले. क्लासेसही त्यात सहभागी असल्याचे समोर आले. महाराष्ट्रातच हे सगळे सूत्रधार सापडले. आज या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यानंतर पुन्हा नीटची परीक्षा जाहीर केली गेली. यावेळी पेपरफुटी होऊ नये म्हणून पूर्ण बंदोबस्त केला गेला आणि ती परीक्षा झाली, त्याचे निकालही नुकतेच जाहीर झाले आहेत.

३ मे रोजी ही परीक्षा झाली पण पेपरफुटीमुळे ती पुढे रद्द करण्यात आली आणि २१ जूनला ती पुन्हा घेण्यात आली. यावेळी मात्र पेपरफुटीसंदर्भात पूर्ण काळजी घेण्यात आल्यामुळे तसा कोणताही प्रकार घडला नाही. २० लाख मुलांनी ही परीक्षा दिली. त्याती ११ लाखांपेक्षा अधिक मुले उत्तीर्ण झाली आहेत. परीक्षा रद्द झाली त्यामुळे जवळपास १४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. त्या विद्यार्थ्यांचे जीव परत आणणे शक्य नाही. पण भविष्यात असे प्रकार होऊ नयेत, कोणत्याही पळवाटा राहू नयेत याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र पुन्हा जेव्हा ही परीक्षा घेण्याचे ठरले त्यानंतर पेपरफुटीचा कलंक त्याला लागला नाही, हे नशीब.

आता निकाल लागले आहेत, ज्या मुलांनी चांगली तयारी केली त्यांना यश मिळाले आहे. जर पेपरफुटीनंतर परीक्षाच घेतली गेली नसती किंवा तो सगळा मुद्दा अधांतरी राहिला असता तर आंदोलनाला अर्थ होता, आता त्याच धर्मेंद्र प्रधान यांच्या शिक्षण विभागाने ही परीक्षा घेतली आहे आणि त्याचे निकालही जाहीर झाले आहेत. त्यामुळे आता हळूहळू आंदोलन आटोपते घेण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आता नव्याने घेण्यात आलेल्या परीक्षेत दमदार यश मिळविले आहे त्यांना आता या आंदोलनातून काहीही मिळविण्यासारखे नाही. पालकही या आंदोलनात फारसे रस घेण्याची शक्यता नाही.

एकूणच आंदोलनाचा उद्देश हा संसदेत विरोधकांना मसाला उपलब्ध होईल एवढाच शिल्लक राहिला आहे. पेपरफुटी हा नक्कीच महत्त्वाचा मुद्दा आहे, पण एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन तो प्रश्न सुटणारा नाही. कारण उद्या तिथे नवा मंत्री येणारच आहे. मंत्र्यांचे राजीनामे मागणे हे राजकीय हत्यार असू शकते, पण कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यासाठी काय करता येईल, हे महत्त्वाचे आहे. पुन्हा एकदा नीटची परीक्षा घेतली गेली, त्यावेळी जी काळजी घेण्यात आली, तीच प्रतिवर्षी घेतली गेली पाहिजे आणि तीही प्रत्येक अशा परीक्षांच्या वेळेस. त्यामुळे पेपरफुटीचे हे संकट कायमचे गाडले जाईल.
दुर्दैवाने वांगचुक यांच्या आंदोलनात नीट पेपरफुटी किंवा मंत्र्यांचा राजीनामा यापलीकडेही अनेक गोष्टी घडल्या. त्यातून आंदोलनाचा उपयोग आपापले हिशेब पूर्ण करण्यासाठी केला जात असल्याचे स्पष्ट झाले.

राजकीय पक्षांनी आपली पोळी भाजून घेतली. सर्वांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असला तरी त्याचा आपल्याला कसा उपयोग होईल, हाच त्यामागील उद्देश आहे. याचा फायदा हे आता या संसदेच्या अधिवेशनात उचलण्याच्या तयारीत असतील.त्याबरोबरच कुणाल कामरासारखे तथाकथित स्टँड अप कॉमेडियन, लो बजेट चित्रपटातील स्वरा भास्करसारख्या काही तथाकथित सेलिब्रिटी, हिंदुत्वावरून शिव्याशाप देणारी काही मंडळी, मूळ प्रश्नांशी भिडण्यापेक्षा भाजपाला विरोध करण्यासाठी सज्ज असलेली मंडळी यांनी या आंदोलनाचा मंच ताब्यात घेतला. अशा आंदोलनजीवींनी आंदोलनाचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग करण्याचा प्रयत्न करून पाहिला. त्यांच्यासाठी अशी आंदोलने म्हणजे पर्वणी असते. ते स्वतः आंदोलन उभारू शकत नाहीत त्यामुळे त्यांना अशा आंदोलनांवर अवलंबून राहावे लागते.

या सगळ्या घडामोडीतून हे स्पष्ट होते की, आंदोलन हे एखाद्या प्रश्नाला भिडण्यासाठी आहे की, आपापले स्वार्थ साधण्यासाठी आहे? या आंदोलनाच्या माध्यमातून सरकार खाली खेचता येते का, असा प्रयत्न नक्कीच सुरू आहे. पण तशी धार या आंदोलनाला मिळालेली नाही. ठिणगीचे वणव्यात रूपांतर व्हावे अशी विरोधकांची खूप इच्छा आहे, पण तसे होताना अजिबात दिसत नाही. अरविंद केजरीवाल वांगचुक यांना भेटले आणि वांगचुक यांनाच शिक्षण मंत्री करा अशी घोषणा देताना दिसले. त्यावरून आंदोलनाची दिशा स्पष्ट झाली. पंतप्रधानांना खाली खेचा, तिथे कुणाला तरी बसवा, शिक्षण मंत्र्यांना खुर्चीवरून उतरवा आणि तिथे कुणाला तरी बसवा एवढाच उद्देश त्यातून दिसतो. राहुल गांधी तर या सगळ्या एवढ्या दिवसांच्या आंदोलनात कुठेही दिसले नाहीत की बोलले नाहीत. कदाचित त्यांनी सगळा मसाला अधिवेशनासाठी राखून ठेवला असावा. ते आता परदेशातच होते. रोज नरेंद्र मोदी कोणत्या दौऱ्यावर जात आहेत, ते कसे सतत देशविदेशात फिरत आहेत असा दावा करणारे लोक राहुल गांधी नेमके कोणत्या देशात गेले, कशासाठी गेले यावर अजिबात चर्चा करत नाहीत. राहुल गांधी अधिवेशनाच्या आधी असेच परदेशात जात असतात आणि तिथून नवा काहीतरी विषय घेऊन संसदेत येत असतात. आताही त्यांचा तोच प्रयत्न असणार. त्यामुळे गोंधळ घालण्यासाठी आता वांगचुक यांच्या आंदोलनाचा मसाला वापरण्यात येतो की नवा काही विषय राहुल गांधी उपस्थित करतात, हे पाहायचे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा