कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह, अपमानास्पद आणि कथित दिशाभूल करणाऱ्या पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वरील अनेक खात्यांना नोटिसा बजावल्या असून, काही न्यूज पोर्टल्सच्या सोशल मीडिया खात्यांचाही यात समावेश आहे. या खात्यांकडून पोस्ट करणाऱ्या व्यक्तींची माहिती आणि संबंधित तपशील मागविण्यात आले आहेत.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, कॉकरोच जनता पार्टी आंदोलनादरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पोस्ट, व्हिडिओ आणि टिप्पण्या प्रसारित करण्यात आल्या होत्या. यापैकी काही पोस्टमध्ये पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली होती, तर काही पोस्ट दिशाभूल करणाऱ्या असल्याचा संशय आहे. या प्रकरणी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सामग्रीची तपासणी करण्यात आली असून, कायद्याचे उल्लंघन झाल्याचा संशय असलेल्या खात्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मलाही नोटीस पाठवून संबंधित पोस्ट करणाऱ्या वापरकर्त्यांची माहिती, खातेधारकांची ओळख आणि इतर आवश्यक तपशील उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. तपासासाठी ही माहिती महत्त्वाची असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्युजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (IFSO) युनिटकडून तपास केला जात आहे. आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओ, पोस्ट आणि टिप्पण्यांमधून द्वेष पसरविणे, चुकीची माहिती प्रसारित करणे किंवा कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न झाला का, याचाही तपास सुरू आहे.
हे ही वाचा:
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलक भारतासारखेच शत्रू!
सरकारी वाहनांच्या वापरावर केंद्राची नवी शिस्त; ‘वन ऑफिसर, वन कार’ नियम
‘दगडांनी भरलेला ट्रक’ कट नव्हे; महापालिकेच्या कामासाठीच होता
यापूर्वीही कॉकरोच जनता पार्टी आंदोलनाशी संबंधित अनेक पोस्ट आणि व्हिडिओंविरोधात दिल्ली पोलिसांनी कारवाई केली होती. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटिसा पाठवून दिशाभूल करणारी सामग्री हटविण्याचे निर्देश देण्यात आले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यापैकी बहुतांश पोस्ट आणि व्हिडिओ हटविण्यात आले आहेत.
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टी आंदोलनानंतर सोशल मीडियावरील सामग्रीवर देखरेख अधिक कडक करण्यात आली असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या किंवा आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्यांविरोधात आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिल्ली पोलिसांनी दिला आहे.
