पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे भारतात शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांची तस्करी उधळली

बिकानेरमध्ये ₹५० कोटींचे हेरॉईन जप्त

पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे भारतात शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांची तस्करी उधळली

राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेवर सुरक्षा यंत्रणांनी मोठी कारवाई करत पाकिस्तानमधून ड्रोनच्या माध्यमातून करण्यात येणारा अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांचा तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. या कारवाईत तब्बल ₹५० कोटी किमतीचे सुमारे १० किलो हेरॉईन, ११ विदेशी बनावटीची स्वयंचलित शस्त्रे, २२ मॅगझिन आणि १०० हून अधिक जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, संभाव्य दहशतवादी किंवा मोठा गुन्हेगारी कट उधळण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.

बिकानेर जिल्हा विशेष पथक (DST), सायबर सेल आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. गुप्त माहितीच्या आधारे सीमावर्ती भागात सापळा रचण्यात आला होता. तपासादरम्यान पाकिस्तानस्थित तस्करांनी ड्रोनच्या साहाय्याने भारतीय हद्दीत अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांचे पार्सल टाकल्याची माहिती समोर आली. हे पार्सल उचलण्यासाठी आलेल्या जोधपूरमधील वीरेंद्र सिंह या संशयिताला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याच्याशी संबंधित इतर तस्करांचा शोधही पोलिस घेत आहेत.
हे ही वाचा:
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा: भारताची शानदार कामगिरी, ३९ पदके, चौथे स्थान

कृष्णा नदीच्या पुराचे पाणी वाईच्या महागणपती मंदिरात

भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांची दमदार कमबॅक

इंडोनेशियात भीषण बोट दुर्घटना, ५ जणांचा मृत्यू, ४१ जण बेपत्ता

बिकानेर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक ओम प्रकाश यांनी सांगितले की, यापूर्वी २७ फेब्रुवारी रोजीही अशाच प्रकारच्या सीमापार तस्करीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली होती. गुप्तचर यंत्रणा, पोलीस आणि स्थानिक नागरिक यांच्या समन्वयामुळे सीमावर्ती भागातील ड्रोनद्वारे होणाऱ्या तस्करीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यात मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

सध्या संपूर्ण सीमावर्ती परिसरात शोधमोहीम सुरू असून या प्रकरणात आणखी शस्त्रे, अमली पदार्थ किंवा इतर संशयितांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जप्त करण्यात आलेले हेरॉईन, शस्त्रे आणि दारूगोळा न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठविण्यात आला असून या प्रकरणातील आंतरराष्ट्रीय तस्करीच्या जाळ्याचा तपास विविध तपास यंत्रणा संयुक्तपणे करत आहेत.

Exit mobile version