बिहार पोलिसांनी किशनगंज जिल्ह्यातून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (पीएफआय) संबंधित असलेल्या एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या आरोपीचे नाव मेहबूब आलम नदवी (वय ३९ वर्षे) असे आहे. हलीम चौक परिसरातून या संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
मेहबूब आलम नदवी हा मूळचा बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील बंशीबारी, रामपूर, हसनगंज येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. तो मार्च २०२५ पासून किशनगंज येथे राहत होता आणि एका स्थानिक खाजगी शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता. माहितीनुसार, २०२२ मध्ये फुलवारी शरीफ येथे दाखल झालेल्या एका गुन्हेगारी प्रकरणात मेहबूबचे नाव समोर आले होते. पीएफआयशी संबंधित गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण नंतर राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) वर्ग करण्यात आले.
या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एनआयएचे एक विशेष पथक लवकरच किशनगंजला पोहोचणार आहे. मेहबूब आलम नदवी याने दिल्लीच्या प्रतिष्ठित जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. याशिवाय, २०१६-१७ या वर्षात तो बिहारमध्ये पीएफआयचा राज्य अध्यक्ष देखील राहिला आहे. यावरून त्याचा संघटनेशी असलेला सखोल संबंध दिसून येतो.
हेही वाचा..
छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याची परंपरा नेहरूंच्या काळापासून
पेड राजकीय मोहिमेचा बळी ठरत असल्याचा दावा नितीन गडकरी यांनी का केला?
राहुल गांधी परदेश दौऱ्यात प्रोटोकॉल मोडतात… सीआरपीएफ हतबल
नेपाळ सारखे जनआंदोलन भारतात व्हावं; तृणमूलचे आमदार बरळले
ताब्यात घेण्यापूर्वी मेहबूब हा किशनगंजमध्ये शिक्षकाची नोकरी करत सामान्य जीवन जगत होता, परंतु पोलिसांना त्याच्या कारवायांबद्दल शंका होती. ही अटक महत्त्वाची असून पीएफआयवर यापूर्वीच अनेक गंभीर आरोप आहेत आणि एनआयएसह इतर केंद्रीय एजन्सी या संघटनेच्या कारवायांवर लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे आणि एनआयए टीम किशनगंज येथे पोहचल्यावर या प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.
