मुंबई गुन्हे शाखा, युनिट–७ ने मोठी आणि धक्कादायक कारवाई करत मेफेड्रोन (एमडी) औषधनिर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे ११५ कोटी रुपयांचा एमडी ड्रग्ज व कच्चा माल जप्त करण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाने ९ ऑक्टोबर रोजी मुलुंड पश्चिम येथे दोन संशयितांकडून १३६ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले होते. या प्रकरणी एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(अ) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान घोडबंदर रोड परिसरात राहणाऱ्या एका आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील रावेत येथील संतोसा हॉटेल परिसरातून एमडीचा पुरवठा होत असल्याचे उघड झाले. त्यानंतर गुन्हे शाखेची दोन विशेष पथके तयार करण्यात आली. त्यानुसार एका आरोपीला ठाण्यातील घोडबंदर रोडवरून, तर दुसऱ्या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली.
पुण्यातून अटक करण्यात आलेल्या आरोपीने चौकशीत धक्कादायक कबुली दिली. तो व त्याचे तीन साथीदार सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात, पोस्ट बामनोली अंतर्गत सावरीगाव येथील शेतात असलेल्या अनप्लास्टर विटांच्या शेडमध्ये एमडी तयार करत असल्याचे त्याने मान्य केले.
या माहितीनंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ छापा टाकत संपूर्ण मेफेड्रोन उत्पादन कारखाना उद्ध्वस्त केला. घटनास्थळावरून ७.५ किलो घन (सॉलिड) एमडी, ३८ किलो द्रव (लिक्विड) एमडी, तसेच ड्रग्ज निर्मितीसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल व उपकरणे असा सुमारे ११५ कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या ठिकाणाहून आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली.
हे ही वाचा:
१० वर्षांच्या डेटिंगनंतर शिलादित्यने श्रेया घोषालला कसं केलं होतं प्रपोज?
कॅप्टनचा आदेश: षटकार लागत राहू द्या!
७० फूटांचा ‘मेस्सी महाकाय’ कोलकात्यात उभा!
सातत्यपूर्ण विकास हा आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाची पायाभरणी
ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत (युनिट–७) यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस निरीक्षक अरुण थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत करकर, सुहास खरमाटे, अमोल माळी, रामदास कदम, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील काळे, महेश शेलार तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे केली.
ही संपूर्ण कारवाई गुन्हे शाखा (शोध) पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
दरम्यान, एमडी ड्रग्ज निर्मिती आणि पुरवठा साखळीतील आणखी दुव्यांचा शोध घेण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.
