बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काही वनअधिकारी दारूपार्टी करत असल्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. काही अधिकारी मद्यपान करत असल्याचा दावा व्हिडिओतुन करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कुणी काढला, कधीचा आहे याचा तपास आता सुरू आहे तसेच या व्हीडिओची सत्यताही तपासली जात आहे.
दरम्यान, उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे आणि सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. संरक्षण चौकीसारख्या दिसणाऱ्या ठिकाणी वनअधिकारी दारू पित असल्याचा हा व्हिडीओ असून ते अधिकारी कोण याचा छडा लावला जात आहे.
संचालिका अनिता पाटील यांनी याबाबत निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यातून याबाबतची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासली जाणार असून चुकीचे प्रकार घडत असतील तर ते नक्कीच थांबवले जातील. तसेच हा व्हिडिओ कोणत्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आला, याची माहिती गोळा करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
हे ही वाचा:
मुंबई प्रेस क्लबच्या सभेत खडाजंगी, सभा रद्द
जगातील सर्वात प्रदूषित शहर पाकिस्तानचे लाहोर
पोटदुखीपासून खोकल्यापर्यंत ‘अजवाइन’ वरदान
वाहन कर्ज विभागाचे एयूएम दरवर्षी १७ टक्क्यांच्या दराने वाढणार
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईतील अत्यंत महत्त्वाचे पर्यावरणीय क्षेत्र असल्याने या प्रकरणाची चौकशी तातडीने पूर्ण करून संबंधितांवर आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
नॅशनल पार्क न्यूज या इंस्टाग्राम हँडलवरून हा व्हिडीओ रिलीज झाला आहे. ६ डिसेंबर रात्री सुमारे १०:३० वाजता तो पोस्ट करण्यात आल्याचे दिसते आहे. या रीलमध्ये उद्यानातील चौकीमध्ये उशिरा रात्री “दारु पार्टी” झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जर हे कृत्य खरोखरच घडले असेल तर त्याबाबत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचंही संचालिका अनिता पाटील यांनी म्हटलं आहे.
