मुंबई : सोशल मीडियावर रिल्समधून ओळख निर्माण केलेल्या आणि मराठी टीव्ही सिरीयलमध्ये छोट्या भूमिका साकारणाऱ्या एका कलाकाराला बुलेट मोटारसायकल चोरीप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. सुनिल उर्फ रिहान सुभाष चौधरी (३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून पाच रॉयल एनफिल्ड बुलेट मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
सुनिल उर्फ रिहान चौधरी हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील रहिवासी असून सध्या तो पत्नीसमवेत बदलापूर पूर्व येथे वास्तव्यास आहे. रिल्स स्टार म्हणून ओळख असलेल्या रिहानने मराठी सिरीयल आणि चित्रपटांमध्ये लहानमोठ्या भूमिका केल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हे ही वाचा:
कर्मचाऱ्यांची प्रतिभा टिकवण्यासाठी कंपनींचे स्वागतार्ह उपक्रम
कर्नाटकातील विजयपुरा येथे प्रशिक्षण विमानाचा अपघात
फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यापूर्वी ११४ राफेल लढाऊ विमानांचा होणार करार?
हिंदुत्व म्हणजे सुरक्षेची हमी…सरसंघचालक मोहनराव भागवतांनी दिला संदेश
पोलिसांच्या माहितीनुसार, कुर्ला पश्चिम येथे राहणाऱ्या संदीप ओमप्रकाश सोनकर यांची बुलेट मोटारसायकल २१ जानेवारी रोजी टिळकनगर स्थानकाजवळील एल. आर. उड्डाणपुल परिसरातून चोरीला गेली होती. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या चोरीचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष ढेमरे आणि पोलीस निरीक्षक संगम गुरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघमारे तसेच सपोऊनी,आशिष भांड,शिंदे, पोलीस अंमलदार. पोमने ,भुवड,साटेलकर आणि भोसले या पथकाने सुरू केला.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान आरोपी बदलापूर पूर्व येथे राहत असल्याचे तसेच त्याच्यावर मुंबईत सुमारे १७ मोटारसायकल चोरीचे गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली.
पोलिसांनी बदलापूर येथे सापळा रचून रिहान उर्फ सुनील चौधरी याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून वेगवेगळ्या गुन्ह्यांतील पाच रॉयल एनफिल्ड बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांच्या चौकशीतून मागील काही वर्षांपासून तो बुलेट मोटारसायकल चोरी करून त्या वेगवेगळ्या शहरांमध्ये विकत असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावरील चमकधमक आणि अभिनयाच्या आड चोरीचे रॅकेट चालवत असल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाने खळबळ उडाली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष ढेमरे यांनी दिली.
