बोरिवली येथील स्काय सिटी मॉलमधील पीव्हीआर थिएटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदान’ या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिग्दर्शक आणि निर्माते विनोद कुमार चौधरी यांची निर्मिती असलेला हा सिनेमा गोसंरक्षणासारख्या महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील विषयावर भाष्य करणारा आहे. महाराष्ट्रातील या पहिल्याच शोला सभागृह खचाखच भरलेले होते.
या विशेष शोचे आयोजन युवा उद्योजक आणि लेखक विवान कारुळकर यांनी केले होते. समाजाभिमुख विषयांवर नेहमीच सकारात्मक भूमिका घेणाऱ्या विवान कारुळकर यांनी आतापर्यंत तीन पुस्तके लिहिली असून त्या पुस्तकांच्या विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नातून या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले. एक लेखक आणि युवा संशोधक म्हणून त्यांच्या वाटचालीवर एका माहितीपटाचे सिनेमाच्या आधी प्रसारण करण्यात आले.
हे ही वाचा:
टी२० विश्वचषकात मोहम्मद नबीवर आयसीसीची कारवाई
पंतप्रधान मोदी हायवे इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीवर करणार ऐतिहासिक लँडिंग
फुटबॉलचा बादशाह इटली, पण आज क्रिकेटमध्येही गोल!
वनडे विश्वचषक २०२७ फक्त खेळायचा नाही, जिंकायचाच!
‘गोदान’ या चित्रपटाचा विषय राष्ट्रहिताचा असून गोसंरक्षणाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करणे हा त्यामागील मुख्य हेतू आहे. ग्रामीण आणि शहरी भागात गोसंरक्षणाबाबत जागरूकता वाढावी, तसेच या विषयाकडे सकारात्मक आणि जबाबदार दृष्टीकोनातून पाहिले जावे, यासाठी हा चित्रपट प्रभावी माध्यम ठरत असल्याचे उपस्थितांचे मत होते.
या विशेष स्क्रीनिंगला सामान्य प्रेक्षकांसोबतच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि विश्व हिंदू परिषदेचे अनेक पदाधिकारीही उपस्थित होते. चित्रपट संपल्यानंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा चित्रपट प्रत्येक भारतीय नागरिकाने पाहावा. विषय अत्यंत महत्त्वाचा असून तो समाजाला विचार करायला भाग पाडतो.”
चित्रपटाच्या कथानकासोबतच कलाकारांच्या प्रभावी अभिनयाचेही विशेष कौतुक करण्यात आले. भावनिक आणि वास्तवदर्शी मांडणीमुळे प्रेक्षक चित्रपटाशी जोडले गेले. ‘गोदान’चा हा पहिला विशेष शो यशस्वी ठरला असून पुढील काळात हा चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.







