बांगलादेश सीमेवरून बनावट नोटा रॅकेटची मुख्य सूत्रधार गजाआड

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

बांगलादेश सीमेवरून बनावट नोटा रॅकेटची मुख्य सूत्रधार गजाआड

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सतर्कता दाखवत बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी महिलेला झारखंडमधील बांगलादेश सीमेजवळून अटक करण्यात आली असून, यामुळे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असलेले मोठे रॅकेट उघड झाले आहे.

गेल्या आठवड्यात दादर रेल्वे स्थानकाजवळ शिवाजी पार्क पोलिसांनी कारवाई करत ६१ वर्षीय अमरउद्दीन शेख याला अटक केली होती. त्याच्याकडून ५०० रुपयांच्या ७२,००० रुपये किमतीच्या उच्च दर्जाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. तपासादरम्यान या नोटा बांगलादेशातून भारतात तस्करी करण्यात आल्याचा संशय बळावला होता.
अमरउद्दीनच्या चौकशीत या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार एका महिलेचे नाव समोर आले. जोस्ना बीबी ऊर्फ जोस्ना सिराजुल शेख (४९) असे या अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ती गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देत फरार होती.

झारखंडमध्ये सापळा आणि अटक

मुंबई पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे जोस्नाचा माग काढला. अखेर झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यातील राधानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून, बांगलादेश सीमेजवळ तिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. जोस्ना ६० हजार रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात १ लाख रुपयांच्या बनावट नोटा पुरवत असे. गेल्या दोन वर्षांपासून ती या अवैध व्यवसायात सक्रिय होती. आतापर्यंत तिने सुमारे १२ ते १४ लाख रुपयांच्या बनावट नोटा भारतीय बाजारपेठेत चलनात आणल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

हे ही वाचा:

ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन

प्रदूषणामुळे श्वास घेणे कठीण होत आहे?

उद्धव ठाकरेंशी केलेल्या युतीचा राज यांना सर्वात मोठा फटका

भारताची अर्थव्यवस्था पुन्हा वेगात

मुंबईत निवडणुकांचे वातावरण असताना अशा प्रकारे बनावट चलन बाजारात फिरवून आर्थिक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न यामागे होता का, याचा पोलीस शोध घेत आहेत. या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे आणि या नोटांचे वितरण मुंबईत कोठे करण्यात आले, याचा सखोल तपास शिवाजी पार्क पोलीस करत आहेत.

Exit mobile version