सोशल मीडियावरील ट्रोलिंग किती घातक ठरू शकते, याचा अंगावर शहारे आणणारा अनुभव राजस्थानातील जोधपूरमध्ये समोर आला आहे. लाखो फॉलोअर्स असलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अनीता बिश्नोई हिने इन्स्टाग्राम लाइव्हदरम्यान विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर अनीताला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर अनीता बिश्नोई सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या रडारवर आली होती. तिच्या प्रत्येक पोस्टवर टीकेचा वर्षाव होत होता. अनेकांनी तिच्या मतांवर आक्षेप घेतला, तर काहींनी वैयक्तिक पातळीवर जाऊन अपमानास्पद भाषेत हल्ले चढवले. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या डिजिटल छळामुळे अनीता प्रचंड मानसिक तणावाखाली गेल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा:
ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेल्या इन्फ्लुएंसरचे टोकाचे पाऊल!
माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाचा गैरवापर
अफगाणिस्तानविरुद्धची कसोटी म्हणजे युवा भारताची परीक्षा! सबा करीम यांचे मोठे वक्तव्य
भारत-अफगाणिस्तान कसोटीचा रणसंग्राम रंगणार!
बुधवारी अनीताने इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत आपल्या मनातील वेदना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही क्षणांतच परिस्थितीने धक्कादायक वळण घेतले. लाइव्हदरम्यानच तिने विषारी पदार्थ प्राशन केल्याचे समोर आले. हा प्रकार पाहून तिच्या फॉलोअर्समध्ये एकच खळबळ उडाली. काहींनी तातडीने कुटुंबीयांशी संपर्क साधला, त्यानंतर अनीताला रुग्णालयात हलवण्यात आले.
या घटनेनंतर अनीताच्या कुटुंबीयांचा संताप अनावर झाला आहे. “सततच्या ट्रोलिंगने आणि मानसिक छळाने अनीता पूर्णपणे खचली होती,” असा आरोप त्यांनी केला आहे. सोशल मीडियावरील काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक तिची बदनामी आणि मानसिक छळ केल्याचा दावा करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. अनीताचे सोशल मीडिया अकाउंट्स, लाइव्ह व्हिडिओ आणि ट्रोलिंगशी संबंधित पोस्ट्स व संदेशांची चौकशी केली जात आहे. सायबर छळामागील व्यक्तींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अनीता बिश्नोई प्रकरणाने पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या काळ्या बाजूवर प्रकाश टाकला आहे. मोबाईलच्या स्क्रीनमागे बसून केले जाणारे अपमान, द्वेषपूर्ण कमेंट्स आणि ट्रोलिंग एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर किती खोल परिणाम करू शकते, याचे हे भयावह उदाहरण मानले जात आहे.
एका व्हायरल पोस्टपासून सुरू झालेला वाद अखेर एका तरुणीला मृत्यूच्या दारात घेऊन पोहोचवणारा ठरला. त्यामुळे सोशल मीडियावरील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जबाबदारी यामधील सीमारेषा नेमकी कुठे आखली जावी, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
