माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाचा गैरवापर

एमटीएचएल पुनर्वसन घराचे आमिष दाखवून १.१२ कोटींची फसवणूल

माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाचा गैरवापर

मुंबई : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पांतर्गत पुनर्वसन योजनेत घर मिळवून देण्याचे आमिष दाखवत माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाचा गैरवापर करून एका तरुणाची तब्बल १.१२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरी परिसरात राहणारे २९ वर्षीय शैफान मकबूल शेख यांना आरोपींनी कुर्ला (पूर्व) येथील एमटीएचएल पुनर्वसन प्रकल्पात माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या कोट्यातून सदनिका मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. आरोपींनी राजकीय ओळखींचा प्रभाव असल्याचे भासवत शेख यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर जानेवारी २०२५ पासून विविध टप्प्यांत त्यांच्याकडून एकूण १ कोटी १२ लाख रुपये उकळण्यात आले.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानविरुद्धची कसोटी म्हणजे युवा भारताची परीक्षा! सबा करीम यांचे मोठे वक्तव्य

भारतीय कसोटी संघाचा आधारस्तंभ ठरणार!

भारत-अफगाणिस्तान कसोटीचा रणसंग्राम रंगणार!

विराट कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर?
या प्रकरणातील आरोपींची नावे युनूस शेख, सचिन यादव, अक्षय रुपवटे, हनुमंत देवधरकर आणि फैसल अशी आहेत. प्राथमिक तपासात या सर्वांनी संगनमताने फसवणुकीचा कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
फसवणुकीसाठी आरोपींनी शेख यांना बनावट वाटपपत्रे आणि ताबा पावत्या दिल्या होत्या. सी-विंग, आर-२ इमारतीतील १००५, ११०६, १५०३, ११०८, १००६ आणि १६०७ क्रमांकाच्या सदनिका एमटीएचएल प्रकल्पांतर्गत मंजूर झाल्याचे या कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आले होते. मात्र, पडताळणीदरम्यान ही सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले आणि संबंधित सदनिकांचे कोणतेही अधिकृत वाटप झाले नसल्याचे समोर आले.
तक्रारीनंतर डोंगरी पोलिसांनी आरोपींविरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या व्यवहारांशी संबंधित बैठका आणि आर्थिक देवाणघेवाण वाडी बंदर येथील पी. डी. मेलो रोडवरील जनमोहम्मद इमारतीजवळ झाल्याचे तपासात समोर आले आहे.
आरोपींनी याच पद्धतीने आणखी काही जणांना गंडा घातला आहे का, याचा पोलिसांकडून तपास सुरू असून माजी खासदारांच्या नावाचा नेमका किती प्रमाणात गैरवापर करण्यात आला, याचाही शोध घेतला जात आहे.

Exit mobile version