प्रवर्तन संचालनालयाच्या (ईडी) कोलकाता झोनल कार्यालयाने पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षक भरती घोटाळ्यात मोठी कारवाई करत तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि राज्य सरकारमधील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, वस्त्रोद्योग आणि सुधार सेवा विभागाचे मंत्री चंद्रनाथ सिन्हा यांच्या अचल मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात अटॅच केल्या आहेत. ही कारवाई ३१ डिसेंबर रोजी धनशोधन प्रतिबंध अधिनियम (पीएमएलए) २००२ अंतर्गत करण्यात आली असून जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत सुमारे ३.६५ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
ही चौकशी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे सुरू करण्यात आली होती. ही एफआयआर कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निर्देशावर दाखल करण्यात आली होती. आरोप आहेत की प्राथमिक शिक्षकांच्या भरतीमध्ये नियम डावलून अयोग्य, यादीबाहेरील आणि कमी क्रमांकाच्या उमेदवारांना नोकऱ्या देण्यात आल्या, तर पात्र आणि वास्तविक उमेदवारांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले. हा संपूर्ण प्रकार गुन्हेगारी कटाच्या माध्यमातून राबवण्यात आला. याआधी ६ ऑगस्ट २०२५ रोजी चंद्रनाथ सिन्हा यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली सहावी पुरक अभियोजन तक्रार विशेष पीएमएलए न्यायालय, कोलकाता येथे दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान २२ मार्च २०२४ रोजी त्यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला होता, ज्यामध्ये ४१ लाख रुपये रोख आणि अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. तसेच त्यांच्या नियंत्रणाखालील बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा झाल्याचे पुरावेही सापडले आहेत.
हेही वाचा..
अमेरिकन शास्त्रज्ञाने तयार केली ‘बिअर लस’, स्वतःवरच केली चाचणी
आसाम: पूर्व सीमेवरील तेजपूर हवाई तळाच्या विकासासाठी संपादित करणार ३८२.८२ एकर जमीन
भारताने ओलांडली १ अब्ज ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या, डिजिटल कनेक्टिव्हिटीमध्ये गाठला ऐतिहासिक टप्पा
‘न्याय सेतू’: कायदेशीर मदत फक्त एका संदेशाच्या अंतरावर…मार्गर्शनासाठी वकिलाची गरज नाही
ईडीच्या तपासात हेही समोर आले की चंद्रनाथ सिन्हा यांनी कुटुंबीयांच्या नावावर बीरभूम जिल्ह्यातील बोलपूर आणि आसपासच्या भागात अचल मालमत्ता खरेदी केल्या. या सर्व मालमत्ता आता तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आल्या आहेत. या शिक्षक भरती घोटाळ्यात याआधीही मोठ्या जप्त्या झाल्या आहेत. पश्चिम बंगालचे माजी शिक्षणमंत्री पार्थ चटर्जी यांची निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या ठिकाणांवरून ईडीने ४९.८० कोटी रुपये रोख आणि ५.०८ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले होते. आतापर्यंत या प्रकरणात सात जणांना अटक झाली असून त्यामध्ये पार्थ चटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांचाही समावेश आहे.
ईडीने आतापर्यंत या प्रकरणात सुमारे ९५ कोटी रुपये किमतीचे सहा तात्पुरते जप्ती आदेश जारी केले आहेत. ताज्या कारवाईनंतर एकूण जप्त मालमत्तेचा आकडा ९८.६५ कोटी रुपये पेक्षा अधिक झाला आहे. प्राथमिक शिक्षक भरती घोटाळ्यातील एकूण जप्ती आणि अटॅचमेंटची रक्कम सध्या सुमारे १५४.९१ कोटी रुपये इतकी झाली आहे. याशिवाय एसएससी सहाय्यक शिक्षक भरती तसेच ग्रुप ‘सी’ आणि ‘डी’ कर्मचाऱ्यांच्या भरती घोटाळ्यांमध्ये ईडीने सुमारे ४८६ कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. या सर्व भरती घोटाळ्यांमध्ये कोलकाता ईडीने आतापर्यंत एकूण ६४१ कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता अटॅच केली आहे. ईडीने स्पष्ट केले आहे की या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून येत्या काळात आणखी कारवाई होण्याची शक्यता आहे.
