एका विदेशी महिलेने तिच्या इन्स्टाग्राम आयडीवरून मुंबईत दोन अनोळखी इसम पाठलाग करून छेडछाड करीत असल्याचा व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर आग्रीपाडा पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. ही घटना २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महालक्ष्मी रेल्वे स्थानक, धोबी घाट आणि सातरस्ता परिसरात घडली होती.
सदर व्हिडिओ २७ फेब्रुवारी रोजी आग्रीपाडा पोलिस ठाण्यास प्राप्त झाला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित विदेशी महिलेशी मोबाईलद्वारे संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली. महिलेच्या तक्रारीनुसार, तिचा दोन अनोळखी इसमांनी पाठलाग करून छेडछाड केली होती.
हे ही वाचा:
इराणच्या नतान्झ अणुस्थळाला नुकसान!
“१ कोटी भारतीयांची सुरक्षा हीच सर्वोच्च प्राथमिकता”
चिंता नको, भारताकडे २५ दिवस पुरेल इतका तेलसाठा
चीन पुन्हा नापास…आधी पाकिस्तानात आता इराणमध्ये
या प्रकरणी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात २७ फेब्रुवारी रोजी भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७८(१)(प), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. व्हिडिओमधील इसमांची ओळख पटविण्यासाठी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी तसेच स्थानिक पातळीवर चौकशी करण्यात आली. तपासाअंती एक आरोपी मलबार हिल परिसरातील बांधकाम साईटवर कामगार असल्याचे निष्पन्न झाले.
गुलशनकुमार नरेश शर्मा (वय २०) यास २८ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याचा गुन्ह्यात सहभाग स्पष्ट झाल्याने त्याला अटक करण्यात आली. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, मुख्य आरोपी मनसुखकुमार चंदकिशोर शर्मा (वय २२) हा आपल्या मूळ गावी बिहारला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बिहार येथे जाऊन १ मार्च रोजी त्याला अटक केली. त्यालाही न्यायालयासमोर हजर केले असता ४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
