गोल्डी ब्रार टोळीशी संबंधित दोन शूटर्सना अटक; मुनावर फारुकी होता लक्ष्य

पोलिसांशी झालेल्या चकमकीनंतर कारवाई

गोल्डी ब्रार टोळीशी संबंधित दोन शूटर्सना अटक; मुनावर फारुकी होता लक्ष्य

गुरुवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीनंतर दिल्लीत गोल्डी ब्रार टोळीशी संबंधित दोन शूटर्सना अटक करण्यात आली. माहितीनुसार, कॉमेडियन मुनावर फारुकी हा त्यांच्या लक्ष्यावर होता. जैतपूर- कालिंदी कुंज रोडवर ही गोळीबाराची घटना घडली. पोलिसांनी दोन गुन्हेगारांची ओळख पटवली असून ते पानिपत येथील राहुल आणि भिवानी येथील साहिल असे आहेत. हे दोघेही रोहित गोदरा- गोल्डी ब्रार- वीरेंद्र चरण संघटित गुन्हेगारी सिंडिकेटशी संबंधित होते.

माहितीनुसार, राहुल डिसेंबर २०२४ मध्ये यमुना नगरमध्ये झालेल्या तिहेरी हत्याकांडात सहभागी होता आणि त्याची ओळख अद्याप पटली नसल्याने तो फरार होता. अलिकडच्या काळात, राहुल आणि साहिल दोघेही, गुंड रोहित गोदारा, गोल्डी ब्रार आणि वीरेंद्र चरण यांच्या आदेशानुसार, कॉमेडियन मुनावर फारुकी यांच्या हत्येचा कट रचत होते. मुंबई आणि बंगळूरू येथे लक्ष्यावर लक्ष ठेवून होते.

न्यू फ्रेंड्स कॉलनीजवळ गोळीबार करणाऱ्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. कालिंदी कुंज पुष्टा रोडवर सापळा रचण्यात आला आणि पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास एक संशयास्पद दुचाकी आढळून आली. अधिकाऱ्यांनी या गाडीला थांबण्याचा इशारा करताच गुन्हेगारांनी गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरात दोघांच्याही पायाला गोळी लागली. नंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्ही जखमी गुन्हेगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून त्यांनी वापरलेली शस्त्रे आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

बलात्कार प्रकरणी ब्रिटिश- पाकिस्तानी मोहम्मद जाहिदला ३५ वर्षांचा तुरुंगवास

‘त्या‘ फोटोमुळे पाक लष्करप्रमुख मुनीर बनले स्वतःच्याच देशात टीकेचे धनी

“अल्पसंख्याकांच्या छळाचा इतिहास असणारे मानवी हक्कांवर व्याख्यान कसे देऊ शकतात?”

पीओकेमध्ये पाक सैन्याच्या गोळीबारात १० निदर्शकांचा मृत्यू

अलिकडच्या काळात, सिद्धू मुसेवाला हत्येनंतर गुन्हेगारी कारवायांसाठी प्रसिद्ध झालेल्या गँगस्टर गोल्डी ब्रारशी संबंधित गुन्हेगारांनी सेलिब्रिटींना लक्ष्य करून हल्ले केले आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला, मुंबई गुन्हे शाखेने कपिल शर्मा याला धमकी देणाऱ्या एकाला अटक केली होती. दिलीप चौधरी म्हणून ओळख पटलेल्या आरोपीने स्वतःची ओळख गोल्डी ब्रार आणि रोहित गोदरा टोळीचा सदस्य म्हणून करून दिली.

Exit mobile version