मुंबई हादरली! ड्रग्ज ओव्हरडोसने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

गोरेगावातील लाइव्ह कॉन्सर्टमध्ये घडली घटना

मुंबई हादरली! ड्रग्ज ओव्हरडोसने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

शहराला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान ड्रग्जचा ओव्हरडोस घेतल्यामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली असून तरुणांमधील वाढत्या ड्रग्जप्रवृत्तीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी वनराई पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून ५ जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी गोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या लाइव्ह कॉन्सर्टला तब्बल ३ ते ४ हजार तरुण-तरुणी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान काहींनी मोठ्या प्रमाणात मद्यपान व अमली पदार्थांचे सेवन केल्याचे सांगितले जाते. यानंतर काही तरुणांची प्रकृती अचानक खालावली.

हे ही वाचा:

अलविदा आशाताई!

“पहलगाम हल्ल्यामुळे पाकिस्तानला सन्मान मिळाला”; लष्कर कमांडरचा दावा

पुरुष पोलिस कॉन्स्टेबलला धर्मांतरित केले, निकाह करायला भाग पाडले!

मालदा हिंसाचार प्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते शाहदात आणि आसिफ अटकेत

यापैकी दोन तरुणींना जोगेश्वरी येथील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. तसेच एका तरुणाला गोरेगाव पश्चिमेतील लाईफ लाईन रुग्णालय येथे उपचारासाठी नेण्यात आले.
लाईफ लाईन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, ट्रॉमा केअरमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर एका तरुणीला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने आज दुपारी तिचाही मृत्यू झाला. दुसरी तरुणी अद्याप गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे.

या प्रकरणी वनराई पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांसह पाच जणांना अटक केली आहे.. मृत विद्यार्थ्यांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे.

या घटनेमुळे मुंबईत पुन्हा एकदा नशेच्या वाढत्या विळख्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. तरुणांच्या सुरक्षिततेसाठी अशा कार्यक्रमांवर नियंत्रण आणण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Exit mobile version