नेव्ही नगरात खळबळ; अग्निवीर जवानाची रायफल, मॅगझिन, जिवंत राऊंड लंपास

नेव्ही नगरात खळबळ; अग्निवीर जवानाची रायफल, मॅगझिन, जिवंत राऊंड लंपास

कुलाब्यातील नेव्ही नगर परिसरात मोठी सुरक्षाभंगाची घटना उघडकीस आली आहे. रडार प्रोटेक्टरवर ड्युटी करणाऱ्या अग्निवीर जवानाला फसवून एका अज्ञात व्यक्तीने इंसास रायफल, तीन मॅगझिन आणि ४० जिवंत राऊंड चोरून पोबारा केला आहे. या घटनेमुळे नौदलातील सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कफ परेड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरुद्ध चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी नेव्ही नगर येथे ड्युटीवर तैनात असलेल्या अग्निवीर जवानाकडे एक अज्ञात व्यक्ती आला. त्याने स्वतःची ओळख “क्यूआरटी विभागाचा” असल्याचे सांगितले. त्याने जवानाकडून इंसास रायफल, दोन भरलेली मॅगझिन आणि एक रिकामी मॅगझिन घेतली व जवानाला हॉस्टेलमध्ये जाण्यास सांगितले.

जवानाला वाटले की त्याला ड्युटीवरून कोणी बदलायला आले असावे म्हणून तो निघून गेला. मात्र, रात्री उशिरा परत ड्युटी ठिकाणी गेल्यावर त्या ठिकाणी कोणीही नसल्याचे लक्षात आले. त्याने शोध घेतला तरी ती व्यक्ती कुठेही दिसली नाही. अखेर जवानाने याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले.

हे ही वाचा : 

लालबाग विसर्जनात भाविकांना लुटणारी १५ जणांची टोळी गजाआड

भारत टिकटॉकवरील बंदी उठवणार का?, मंत्री वैष्णव म्हणाले…

नेपाळमधील निदर्शनांनंतर सीमेवर अलर्ट!

इस्रायली संरक्षण धोरण तज्ज्ञ म्हणतात ‘ही’ गोष्ट मोदींकडून शिकण्यासारखी

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने तपास सुरू करून सर्वत्र शोधमोहीम राबवली. अखेर ७ सप्टेंबर रोजी कफ परेड पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिस व लष्करी यंत्रणा या घटनेचा सखोल तपास करत असून, अज्ञात व्यक्तीचा शोध तीव्र करण्यात आला आहे.

Exit mobile version