पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी कथित संबंध असल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिक वहाब आलमच्या नेटवर्कचा तपास पश्चिम बंगाल एसटीएफने वेगाने सुरू केला आहे. या तपासात आलमच्या आणखी एका स्थानिक साथीदाराला अटक करण्यात आली असून, आतापर्यंत या प्रकरणात त्याच्या तीन सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव जफर शाम्स उर्फ सनी असे आहे. तो पूर्व कोलकात्यातील टॉपसिया परिसरातील रहिवासी असून, आलमला अटक झाल्यानंतर तो फरार झाला होता. एसटीएफने त्याचा शोध घेत अखेर हुगळी जिल्ह्यातील रिशरा येथून त्याला पकडले. सनीच्या अटकेशी संबंधित अन्य तपशील पोलिसांनी अद्याप जाहीर केलेले नाहीत.
एसटीएफकडून सनीची कसून चौकशी सुरू आहे. आलम भारतातून संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या आयएसआयपर्यंत पोहोचवण्यासाठी कथितरित्या नेटवर्क उभारत होता आणि त्यामध्ये सनीने मदत केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. या नेटवर्कमध्ये स्लीपर सेल तयार करण्यासाठी किंवा त्याचा विस्तार करण्यासाठी सनीची भूमिका होती का, याचाही तपास केला जात आहे.
या प्रकरणात यापूर्वी इमरान हुसेन आणि मोहम्मद एजाज यांना अटक करण्यात आली आहे. इमरानला दोन दिवसांपूर्वी टॉपसिया येथील त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. तर एजाजला त्याच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली होती. आलमशी एजाजचे जवळचे संबंध असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आलमने २०१२ मध्ये नेपाळमार्गे भारतात बेकायदेशीर प्रवेश केल्यानंतर काही काळ एजाजच्या घरी आश्रय घेतला होता. तसेच आलमला भारतीय ओळख सिद्ध करणारी कागदपत्रे मिळवून देण्यात एजाजने मदत केल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा:
‘ऑपरेशन सिंदूर’ डॉक्युमेंटरीवर पाकचा थयथयाट; पहाटे २ वाजता लष्कराची प्रतिक्रिया
संतापजनक! जुन्नरमध्ये १० वर्षांच्या चिमुकलीची अत्याचारानंतर हत्या
सायबर गुन्ह्यासाठी ४५०० सीम कार्ड; चीन पाकिस्तान कनेक्शन
उड्डाणाच्या वेळी वेग घटला, टेल स्ट्राइक, टायर फुटले… काय घडले म्युनिक विमानतळावर?
आलम, एजाज आणि इमरान यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एसटीएफने सनीपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. तिघांची स्वतंत्र आणि त्यानंतर एकत्र चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, १४ ऑगस्टला कूचबिहार जिल्ह्यातील साहेबगंज परिसरातून तीन संशयितांना अटक करण्यात आली होती. भारत-बांगलादेश सीमेजवळ झालेल्या या कारवाईत राशिदुल हक, नूर नसीरुद्दीन अली आणि शफीकुल इस्लाम या तिघांना पकडण्यात आले. तिघेही भारतीय नागरिक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
