स्व बोध : अर्थात, पराभूत मानसिकतेच्या जोखडातून मुक्ती

आपण कोण आहोत याची जाणीव असणे हे महत्त्वाचे

स्व बोध : अर्थात, पराभूत मानसिकतेच्या जोखडातून मुक्ती
पराभूताने जेत्याला केलेला सलाम त्याच्या मानसिक पराभवाची पहिली निशाणी असते. म्हणून भारतावर आक्रमण करणाऱ्या सगळ्या आक्रमकांनी इथे त्याच्या सत्तेची चिन्ह उभारली. कुणी शहरांची नावं बदलली. कुणी इथल्या समृद्ध, संपन्न मंदिरांवर घुमट बांधून त्यांच्या मशिदी केल्या. कुणी इथली सुंदर, लावण्यपूर्ण शिल्पं खणून काढली, इथल्या श्रद्धास्थानांवर घणाचे घाव घातले. हे सगळं करण्यामागे आक्रमकांची एक निश्चित रणनीती होती. इथल्या समाजमनावर त्यांच्या सत्तेची भीती बसवण्यासाठी इथली संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न केले गेले.The Guardian या दैनिकाने मोदींच्या पहिल्या लोकसभा विजयानंतर लिहिलं होतं, “Today, 18 May 2014, may well go down in history as the day when Britain finally left India.”याचं कारण म्हणजे मोदी सरकारने भारताच्या ‘स्व’ जागरणाचा ध्यास घेतला. जिथे जिथे परकीय सत्ताधीशांची निशाणी होती ती पुसून तिथे अस्सल भारतीय प्रतिमान स्थापित होऊ लागली. राजपथाचं कर्तव्यपथ असं नामांतरण, सेन्गोल, नौदलाच्या चिन्हात केलेला बदल असे अनेक निर्णय केंद्र सरकारने घेतले. समाजानेही या निर्णयांचं स्वागत केलं.

भारतातल्या प्रमुख विरोधी पक्षांनी या निर्णयांना विरोध केला. या बदलांना ‘भगवेकरण’ असं संबोधणं ही एक मोठी चूक आहे. ही भारतीयांना झालेली ‘स्व-बोधाची’ म्हणजेच स्वतःच्या अस्मितेची नव्याने झालेली जाणीव आहे. या जाणीवेचं सखोल विश्लेषण करण्यासाठी भारतीय इतिहासातल्या त्या कालखंडांचा अभ्यास करणं आवश्यक आहे, ज्यात या ‘स्व’चा पद्धतशीरपणे लोप करण्यात आला. सुमारे एक सहस्रक चाललेल्या या प्रक्रियेने भारताच्या सभ्यतेवर खोलवर जखमा केल्या, ज्या भरून काढण्यासाठी आणि स्वतःची ओळख परत मिळवण्यासाठी आजचा हा प्रयत्न सुरू आहे.

पाशवी मुघल आक्रमणभारताच्या मूळ सभ्यतेच्या प्रवासातला पहिला मोठा अडथळा इस्लामी आक्रमणातून आला. केवळ सत्तेसाठी होणारी ही आक्रमणं नव्हती. इथे इस्लामचा हिरवा झेंडा रोवण्यासाठी अमानुषपणे नागरिकांना मारणे, मंदिरं लुटणे, मूर्तीभंजन असे प्रकार या आक्रमकांनी सुरु केले. पराजित हिंदू राजांना मारून त्यांच्या मृतदेहाची किळसवाणी विटंबना होऊ लागली. पराभूत राजाच्या प्रजेतूनही कुणी उठून नव्या सत्ताधीशांना विरोध करू नये; म्हणून भारताला अपरिचित असणारी ही अमानुष वागणूक इथे रूढ झाली. भारताच्या विश्वकल्याणकारी भूमिकेशी ही नवी व्यवस्था विपरीत होती.या मुस्लीम शासकांनी बहुसंख्य गैर-मुस्लिम लोकसंख्येवर राज्य करण्यासाठी जाचक कायदे केले. झिजीया सारखा कर लादला. भारतीय विचार परंपरेत राजा हा वेतनभोगी सेवकासारखा असला पाहिजे. हे नवे राजे विलासी होते. या नव्या राजवटीचं प्रजारक्षण हे ध्येय कधीही नव्हतं. उलट जमेल तितकं प्रजेचं शोषण करणे हाच ध्यास या राज्यकर्त्यांना होता.

याच काळात भारताच्या ज्ञानपरंपरेवर थेट हल्ले झाले. इ.स. ११९३ मध्ये बख्तियार खिलजीने नालंदा विद्यापीठाचा केलेला विध्वंस हे सांस्कृतिक हिंसाचाराचं एक प्रतीक होतं. नालंदाच्या नऊ मजली वाचनालयातली लाखो हस्तलिखितं अनेक महिने जळत होती. भारताच्या बौद्धिक परंपरेवर केलेला हा थेट हल्ला होता. ‘तबकात-इ-नासिरी’ सारख्या समकालीन वृत्तांतांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे ही जाळपोळ आणि विध्वंस फक्त विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी नव्हता. ज्ञानाच्या मूळ भारतीय प्रणालींना मुळापासून उखडून टाकण्याचा हा प्रयत्न होता.

या काळात मंदिर विध्वंसाचा मुद्दा अत्यंत गुतागुंतीचा आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. हे विध्वंस मूर्तीभंजनाच्या विचारधारेतून आणि हिंदू उपासनेला पूर्णपणे संपवण्याच्या उद्देशाने केले गेले. मंदिर विध्वंस हे राजकीय हेतूंनी प्रेरित होतं. या घटनांनी भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जडणघडणीत एक खोलवरचा बदल घडवून आणला, ज्यामुळे मूळ ‘स्व’ची ओळख पुसट होऊ लागली.

वसाहतवादी आक्रमण

जर मुघल काळातल्या आक्रमणांनी भारताच्या भौतिक आणि सांस्कृतिक वारशावर आघात केला असेल, तर ब्रिटिश वसाहतवादाने अधिक सूक्ष्म आणि घातक हल्ला भारतीयांच्या मनावर आणि आत्मविश्वासावर केला. या मानसिक गुलामगिरीचा पाया थॉमस बॅबिंग्टन मेकॉलेच्या १८३५ मधील “शिक्षणावरील टिपण” (Minute on Education) या दस्तऐवजाने घातला. मेकॉलेचे ध्येय स्पष्ट होतं: “असा एक वर्ग तयार करणे जो रक्ताने आणि रंगाने भारतीय असेल, पण आवडीनिवडी, मते, नैतिकता आणि बुद्धीने इंग्रज असेल”. ब्रिटिश राजवटीला निष्ठावान असलेला मध्यस्थांचा एक वर्ग निर्माण करण्यासाठी आखलेली वैचारिक विध्वंसाची एक सुनियोजित योजना होती.

या प्रकल्पाचा तात्त्विक आधार होता भारतीय ज्ञानप्रणालीबद्दलची मेकॉलेची अत्यंत तुच्छता. “एका चांगल्या युरोपीय ग्रंथालयाची एक फळी ही भारत आणि अरबस्तानच्या संपूर्ण देशी साहित्यापेक्षा अधिक मोलाची आहे,” हे त्याचं कुप्रसिद्ध विधान या धोरणाचं सार होतं. त्याने संस्कृत आणि अरबी शिक्षणाला “खोटा इतिहास, खोटं खगोलशास्त्र, खोटं वैद्यकशास्त्र” यांचं भांडार म्हणून हिणवलं आणि सुशिक्षित भारतीयांना त्यांच्या स्वतःच्या बौद्धिक वारशापासून लांब नेलं.

हे ही वाचा:

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर कुलूपबंद मंदिर-गुरुद्वारा ४२ वर्षांनी उघडले!

हिमाचल प्रदेश : बस दरीत कोसळून ७ ठार

इंग्लंड दौऱ्यात भारत पासा पलटू शकतो!

७ महिन्यांत ८ हजार लोक बेपत्ता!

हे धोरण पद्धतशीरपणे लागू करण्यात आलं. मेकॉलेने अरबी आणि संस्कृत पुस्तकांची छपाई थांबवण्याचे, पारंपरिक महाविद्यालयं बंद करण्याचे आणि सर्व निधी केवळ इंग्रजी शिक्षणाकडे वळवण्याचे स्पष्ट निर्देश दिले. ही एक वरून खाली लादलेली व्यवस्था होती; जिचा उद्देश अस्तित्वात असलेली शैक्षणिक पायाभूत सुविधा नष्ट करून त्या जागी वसाहतवादी नियंत्रणाला पूरक ठरेल अशी व्यवस्था निर्माण करणे हा होता. हे केवळ शिक्षण धोरण नव्हे मानसिक युद्ध होते. मेकॉलेने केवळ इंग्रजी श्रेष्ठ आहे असं म्हटले नाही, तर भारतीय ज्ञान हानिकारक आहे असा युक्तिवाद केला. शिक्षण आणि रोजगारासाठी भारतीयांना हे गृहीतक स्वीकारायला भाग पाडून, व्यवस्थेने त्यांना त्यांच्याच सांस्कृतिक आत्म-अवमूल्यनात सहभागी व्हायला भाग पाडलं.

‘स्व-बोधा’ची गरज

या दीर्घकाळच्या मानसिक आणि सांस्कृतिक दडपशाहीचे परिणाम अत्यंत दूरगामी आणि विनाशकारी होते. याने एक अशी ‘वसाहतवादी जाणीव’ (colonial consciousness) निर्माण केली, जिथे शासित लोक शासकांच्या दृष्टिकोनातून स्वतःच्या संस्कृतीला कमी लेखू लागले. यामुळे स्वतःच्या सांस्कृतिक पद्धतींबद्दल एक प्रकारची नापसंती आणि पाश्चात्य जीवनशैलीचे उदात्तीकरण सुरू झालं.

प्रसिद्ध विचारवंत के. सी. भट्टाचार्य यांनी या स्थितीला ‘मनाची गुलामगिरी’ (enslavement of the mind) म्हटलं आहे. ही एक अशी अवस्था आहे जिथे गुलामगिरीचे दुःख जाणवणंच बंद होतं आणि ती अधिक खोलवर रुजत जाते. यामुळे स्वतःच्या सांस्कृतिक स्मृती आणि वारशाची एक मोठी दरी निर्माण झाली. या प्रक्रियेने एक “परकीय संकल्पनात्मक शब्दसंग्रह” आणि एक पाश्चात्य वर्चस्ववादी दृष्टिकोन निर्माण केला, ज्यातून भारतीय जगाकडे आणि स्वतःकडे पाहू लागले. या खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक आघातामुळे आणि दुभंग अस्मितेमुळे, ‘भारतीय मनाचे वसाहतवाद मुक्तीकरण’ (decolonising the Indian mind) भारतीय सभ्यतेच्या अस्तित्वासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी एक अत्यावश्यक गरज आहे. सध्या दिसणारा ‘स्व-बोध’ हा या ऐतिहासिक जखमेवरचा थेट आणि आवश्यक प्रतिसाद आहे.

पुनरुत्थानाची चिन्हे

शतकांच्या दडपशाहीनंतर भारतीय जन चेतना आता एका नव्या वळणावर आहे. समकालीन भारतातल्या विविध घटना आणि धोरणं ही राजकीय डावपेच नाहीत. ही एका खोलवरच्या आणि सुसंगत अशा ‘स्व-बोधा’च्या प्रक्रियेची ठोस उदाहरणं आहेत. हा ‘स्व-बोध’ म्हणजे वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडून आपल्या मूळ सांस्कृतिक आणि सभ्यतेच्या ओळखीची पुनर्स्थापना करण्याचा एक जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. या प्रक्रियेचं स्वरूप केवळ प्रतिक्रियात्मक नाही; रचनात्मक आहे. केवळ परकीय प्रभावाला नाकारण्याऐवजी जे ‘स्व’ आहे, त्याची पुनर्स्थापना होत आहे.

शहरांचे नामांतरण

प्राचीन भारतात ठिकाणांची नावं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व (‘स्व’) धारण करत होती, जी त्या ठिकाणची ओळख दर्शवत होती. त्यामुळे नावे बदलण्याची प्रक्रिया ही वसाहतवादमुक्तीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. या प्रक्रियेचा उद्देश या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरेशी पुन्हा संबंध प्रस्थापित करणे हा आहे.

अलाहाबाद ते प्रयागराज: अलाहाबादचे नामांतर हे सांस्कृतिक पुनर्स्थापनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ‘प्रयाग’ या नावाला प्राचीन संदर्भ आहेत. वेद आणि पुराणांमध्ये त्याचा उल्लेख नद्यांच्या पवित्र संगमाचे स्थान म्हणून आढळतो. ‘अलाहाबाद’ किंवा ‘इलाहाबाद’ हे नाव १६ व्या शतकात मुघल आक्रमक अकबराने दिलं होतं. त्यामुळे हे नामांतर म्हणजे ऐतिहासिक चूक दुरुस्त करून शहराची मूळ, पवित्र ओळख पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न आहे.

औरंगाबाद ते छत्रपती संभाजी नगर: या नामांतराचा संदर्भ मुघल आक्रमक औरंगजेब आणि मराठा शासक छत्रपती संभाजी महाराज यांच्यातल्या ऐतिहासिक संघर्षात आहे. औरंगजेबाला एक क्रूर शासक होता. इस्लाम स्वीकारायला नकार दिल्यामुळे संभाजी महाराजांचा अत्यंत क्रूरपणे छळ करून त्यांची हत्या औरंगजेबाने केली. त्यामुळे ‘औरंगाबाद’ हे नाव जुलूम आणि धार्मिक छळाचे प्रतीक होतं. ‘स्वराज्य’ आणि ‘धर्मा’साठी बलिदान देणाऱ्या राष्ट्रपुरुषाच्या नावाने शहराचे नामांतर करणे हे अभिमान परत मिळवण्याचे आणि अत्याचाराविरुद्धच्या स्वदेशी प्रतिकाराचा सन्मान करण्याचे कृत्य आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०

स्वातंत्र्यानंतर भारतीय शिक्षणाचे वसाहतवाद मुक्तीकरण करण्याचा सर्वात महत्त्वपूर्ण आणि पद्धतशीर प्रयत्न म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२०. याकडे केवळ एक सुधारणा म्हणून न पाहता, एक “बौद्धिक वसाहतवादमुक्ती” म्हणून पाहिलं पाहिजे.हे धोरण अंधानुकरण करणाऱ्या वसाहतवादी मानसिकतेला भारतीय संस्कृती आणि नीतिमत्तेत रुजलेल्या विचारसरणीत बदलण्याचा प्रयत्न करत आहे.

या धोरणाचा गाभा म्हणजे भारतीय ज्ञान प्रणाली (Indian Knowledge Systems – IKS)मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. मेकॉलेने नाकारलेल्या ज्ञानाची ही पुनर्स्थापना आहे. NEP 2020 मध्ये सुरुवातीच्या टप्प्यात मातृभाषेतून शिक्षणावर दिलेला भर हा एक शैक्षणिक आणि सांस्कृतिक सुधार आहे. हा प्रयत्न इंग्रजीच्या वसाहतवादी पगड्यापासून दूर जाऊन मुलांच्या नैसर्गिक भाषिक वातावरणात ज्ञानात्मक कौशल्यं वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतो, जे तत्त्व प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीतही महत्त्वाचे मानले जात होते. या धोरणाचा अंतिम उद्देश सहानुभूती, आदर, लोकशाही भावना आणि सेवा यांसारखी मूल्यं रुजवून ‘भारतीयता’ वाढवणे आहे. नव्या भारतीय तरुणांची वैश्विक ओळख सांस्कृतिक असेल.

भारतीय सभ्यतेच्या प्रतीकांचे पुनरुज्जीवन

‘स्व-बोधा’ची प्रक्रिया केवळ धोरणात्मक बदलांपुरती मर्यादित नाही. ती राष्ट्रीय प्रतीकांमध्येही दिसून येते. भव्य प्रतीकात्मक कृती आणि सखोल प्रणालीगत सुधारणा यांच्यात एक जाणीवपूर्वक समन्वय दिसतो. ही प्रतीकं त्या प्रणालीगत बदलांची सांस्कृतिक आणि भावनिक बैठक पक्की करतात.

सेंगोल: नवीन संसद भवनात ‘सेंगोल’ची स्थापना हे एक प्रतीकात्मक पण दीर्घकाळ परिणाम करणारी कृती आहे. हे प्रतीक १९४७ मध्ये ब्रिटिशांकडून नेहरूंना सत्ता हस्तांतरित करण्यासाठी वापरले गेले होते आणि ते चोल राजवंशाच्या परंपरेवर आधारित आहे. ‘सेंगोल’ हा शब्द तमिळ ‘सेम्मई’ (नीतिमत्ता) या शब्दावरून आला आहे आणि त्याच्या शीर्षस्थानी ‘नंदी’ (न्यायाचे प्रतीक) आहे. हे प्रतीक सत्तेच्या वसाहतवादी मॉडेलमधून स्वदेशी, धार्मिक शासन संकल्पनेकडे होणारे स्थित्यंतर आहे. त्याचे पुनरुज्जीवन हे ऐतिहासिक चुकीची दुरुस्ती आणि आधुनिक भारताच्या लोकशाहीला तिच्या प्राचीन सभ्यतेशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न आहे.

नवीन नौदल ध्वज: भारतीय नौदलासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरित नवीन ध्वज स्वीकारणे हे आणखी एक महत्त्वाचं पाऊल आहे. ब्रिटिश वसाहतवादी भूतकाळाचा अवशेष असलेला सेंट जॉर्ज क्रॉस यातून काढून टाकला आहे. शिवाजी महाराजांना “भारतीय नौदलाचे जनक” म्हटलं जातं. शिवरायांनी सागरी सत्तेचं महत्त्व ओळखून स्वराज्यातले समुद्रतट सुरक्षित करण्यासाठी एक शक्तिशाली आरमार उभारलं. हा नवीन ध्वज वसाहतवादी वारसा नाकारून स्वदेशी लष्करी आणि सामरिक वारसा स्वीकारण्याचं द्योतक आहे. अष्टकोन आठ दिशांचं प्रतीक आहेत. भारतीय नौदलाची जागतिक पोहोच आणि क्षमतेचं हे द्योतक आहे. ही प्रतीकात्मक कृती राष्ट्रीय अभिमानाची आणि आत्मविश्वासाची घोषणा आहे.

या सगळ्यातून काय मिळणार?

‘भारताचा इतिहास पराजयाचा आहे’ अशी जाणीवपूर्वक मांडणी डाव्या इतिहासकारांनी केली. आक्रमणपूर्व भारत सांस्कृतिकदृष्ट्या एक राष्ट्र होता. तरीही १९४७ नंतर आलेल्या राज्यकर्त्यांच्या भारताविषयीच्या अवधारणा स्पष्ट नसल्यामुळे आपण आता एक नवीन राष्ट्र निर्माण करत आहोत असा गैरसमज राज्यकर्त्यांना झाला. त्यातून झालेल्या अक्षम्य चुका सुधारण्याला भगवेकरण म्हणणे हे वैचारिक दिवाळखोरीचं लक्षण आहे. इथल्या अल्पसंख्यांक समाजाचा इतिहास पुसून टाकण्याचा हा डाव आहे, अशीही टीका केली गेली. मात्र ‘स्व’बोधाची ही चळवळ कुणाचाही इतिहास पुसण्यासाठी नाही तर आपला इतिहास पुनर्स्थापित करण्यासाठी आहे.

छत्रपती शिवरायांनी त्यांच्या हिंदवी स्वराज्यात आक्रमकांनी पाडलेली हिंदू मंदिरं पुन्हा उभारली. त्यांचा हाच वारसा पुढे अहिल्याबाई होळकरांनीही चालवला.

जर समृद्ध भारताचं निर्माण करायचं असेल तर ते आपल्या गौरवशाली इतिहासाचं स्मरण ठेवल्याशिवाय शक्य नाही. जाॅर्ज ओरवेलचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, “the most effective way to destroy people is to deny and obliterate their own understanding of their history.”

(कुठल्याही समाजाला नष्ट करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे आपल्या इतिहासाविषयी त्यांची स्वतःची समज नष्ट करणे. ) आपण कोण आहोत याची जाणीव असल्याशिवाय कुठलाच देश, लोकसमूह प्रगती करू शकत नाही. भारताला हा ‘स्व’ बोध होणे भारताच्या भविष्यासाठी आवश्यक आहे. याची सुरुवात शासकीय स्तरावरून झाली असली तरी नागरिकांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात हा स्वबोध आचरणे अतिशय गरजेचे आहे.

Exit mobile version