या लोकांची नाटके, भाषणे, लेख, पुस्तके, पथनाट्ये, गाणी, कविता केवळ विद्रोही किंवा सरकारविरोधी नसून भारताचा खरा इतिहास नष्ट करून लोकांच्या मनात इतिहासाच्या नावाखाली कसलेही पुरावे न देता वाट्टेल ते भरवणारे, अत्यंत आक्षेपार्ह केवळ शुद्ध खोटेच नाही तर भडकाऊ स्वरूपाचे साहित्य हे लोक विविध माध्यमांतून समाजात पेरत असतात.
हिंदूंच्या जातीजातीत भांडणे लावायची, तथाकथित सवर्ण समाजातील एका गटाला एका बाजूला पीठमाग्या, भीकमाग्या, भिक्षेवर पोट भरणारा, गरीब, लाचार म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांनीच बहुजनांवर अनन्वित केले असेही म्हणायचे. एका बाजूला मराठा समाजाविरुद्ध अन्यायी सत्ताधारी म्हणून गरळ ओकायाचे, पण बहुजन समाजातूनही अनेक पराक्रमी राजे, सरदार, सेनापती या देशात झाले, आणि भारतात जात पाहून नाही तर कर्तृत्व पाहून व्यक्तीला समाजात स्थान मिळत असे, हे सत्य कधी लोकांच्या कानांवर पडूच द्यायचे नाही. अशी उलट्या काळजाची खेळी हे माओवादी खेळत आहेत. आणि त्यासाठी त्यांनी स्थानिक, बामसेफ़, संभाजी ब्रिगेड अश्या फुटीरतावादी, जातीवादी संघटनांना हाताशी धरून महाराष्ट्रातील समाज कायम विद्रोही, अस्थिर, अशांत, अस्वस्थ राहील, इथे विकासाचे वारे नाही तर नक्षली क्रांतीच्या रक्ताचे पाट वाहतील, असा प्रयत्न केला आहे. या लेखात गेल्या १५ वर्षांतील कबीर कला मंचच्या हालचाली, पोलीस कारवाई इत्यादींचा अभ्यास करू. यातून त्यांची मोडस ऑपेरांडी समजून यायला मदत होते.
हे ही वाचा:
पचनाशी संबंधित आजारांवर नाशपात्याचा उपाय
आसाम विधानसभा निवडणूक हा ‘संस्कृतींचा लढा’
मेक इन इंडिया, पीएलआय योजनांनी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला दिली गती
भारत दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग हब बनला
सन २००२ मध्ये अमरनाथ चंडालिया याने कबीर कला मंच स्थापन केला. याला २०११ मध्ये अटक केली. त्याच्या जबाबानुसार २००५ साली शितल साठे, सचिन माळी, रमेश गायचोर, ज्योती जगताप, दीपक ढेंगळे, सागर गोरखे हे कबीर कला मंचामध्ये सहभागी झाले होते. विद्रोही मासिकाचा संपादक सुधीर ढवळे यांच्या माध्यमातून भाकप माओवादी संघटनेतील एका व्यक्तीची ओळख झाली, ज्याने प्रसिद्ध माओवादी मिलिंद तेलतूंबडे आणि त्याची पत्नी अँजेला तेलतुंबडे यांच्याशी त्याची भेट करून दिली. या लोकांनी पुण्यातील खेड तालुक्यात पंधरा दिवसांचे प्रशिक्षण शिबिर घेऊन भाकपासाठी पूर्णवेळ देण्याचा आग्रह केला होता. अँजेला उर्फ इस्कारा ही गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये संशयित व वॉन्टेड आरोपी होती. तिला अटक करून जे धागेदोरे मिळाले त्यावरून पुणे शाखेच्या अधिकाऱ्यांनी नंदिनी पंजाबराव भगत उर्फ जैनी व ज्योती बाबासाहेब चोरगे या दोन महिलांना पकडले. यांच्या जबानीनुसार अनुराधा मारुती सोनुळे हिलाही पकडले. या सर्व महिलांकडे प्रतिबंधित भाकप माओवादी संघटनेचे प्रचार साहित्य, पुस्तके, फोटो, पॅन कार्ड, अनेक दस्तऐवज, विविध सिम कार्ड, प्रचार प्रसार साहित्य, विविध ओळखपत्रे, असे सामान मिळाले.
नाशिक मधून एल्गार परिषद सहआरोपी सिद्धार्थ भोसले उर्फ जीवा याला पकडण्यात आले. गणेश गायकवाड या साक्षीदाराच्या जबाबानुसार हा सिद्धार्थ त्याचा कॉलेज मित्र असून त्याने त्याला बस्तर, दंडकारण्य, गडचिरोली इत्यादी परिसरातील नक्षल कारवायासंबंधी विविध प्रक्षोभक पुस्तके, पत्रके साहित्य दिले होते. याच्याकडूनही अनेक सीडी डीव्हीडी मधून भाकप च्या विचारधारेचे कागदपत्रे संघटनेचे धोरण प्रचार प्रसार साहित्य सापडले. इतकेच नाही तर कार्यकर्त्यांना व सदस्यांना देण्यात आलेल्या शस्त्र प्रशिक्षण कार्यक्रमाचे संपूर्ण चित्रीकरण केलेले आढळले.
पुढच्या तपासात एटीएस पुणे यांनी ढवळा कामा ढेंगळे उर्फ प्रताप उर्फ दीपक यालाही पकडले. कबीर कला मंचचा हा प्रमुख शाहीर. याची राहती खोली नक्षली कारवायांच्या प्रमुख बैठकींसाठी वापरली जात असे.
कबीर कला मंचची प्रमुख गायिका शितल साठे गर्भवती असल्याचे कळताच ती व तिचा पती सचिन माळी यांनी समर्पणाचा पर्याय निवडला. त्या आधी पकड वॉरंट निघाल्यावर बामसेफ व संभाजी ब्रिगेड मध्ये सक्रिय राहिलेल्या धनंजय कानगुडे यांच्याकडे एक वर्ष त्यांनी आश्रय घेतला होता. या काळात नगर जिल्ह्यातील बामसेफ व संभाजी ब्रिगेड सारख्या काही जातीवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संबंध निर्माण केले. अशा जातीवादी व फुटीरतावादी संघटनांची विविध प्रकारे मदत उघड कारवायांसाठी माओवादी घेत असतात. खरे तर यांच्यातील साम्य इतकेच की हे सर्वजण भारतीय संस्कृती उत्सव परंपरा विशेषतः हिंदू संस्कृती हिंदू प्रतीकांबद्दल अतिशय जहाल बोलत असतात. याच कारणासाठी या संघटना आणि माओवादी फ्रंट संघटना अनेक वेळा एकाच मंचावर आलेल्या दिसतात. माओवाद्यांनी त्यांच्या शहरी भागातील रणनीती विषयक दस्तऐवजांमध्ये अशा प्रकारच्या जातीवादी फूटीरतावादी संघटनांना एकत्रित करून एक व्यापक आघाडी निर्माण करण्याचे धोरण स्वीकारले आहे. माळी याने श्रीरामपूर येथील वास्तव्यात ’जाती अंतक सांस्कृतिक क्रांतीचे आत्मभान’ हे पुस्तक लिहिले. ते ‘कॉम्रेड चंद्रगुप्त चौधरी स्मृती समिती’, औरंगाबाद यांनी प्रसिद्धही केले.
अमर नावाने वावरणाऱ्या नक्षलवाद्याला अटक केल्यावर त्याच्या जबाबानुसार साठे व माळी हे २०१० मधे अनेक महिने उत्तर गडचिरोलीच्या जंगलात वास्तव्य करून होते. तसेच गोंदिया व अबूजमाड पहाडावर ‘दंडकारण्य स्पेशल झोन समितीने’ आयोजित केलेल्या अधिवेशनातही उपस्थित होते. अँजेला सोनटक्के मिलिंद उर्फ दीपक तेलतुंबडे यांच्याबरोबर हा अमर आणि हे दोघेजण होते. या बैठकीत या दोघांवर पुणे आणि मुंबईत चळवळ सक्रिय करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. पुढे साठे व माळी यांनी कबीर कला मंचात सक्रिय असणाऱ्या मधु म्हणजे प्रशांत कांबळे व विश्वा(संतोष शेलार) या दोन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुन्हा गोंदिया आणि उत्तर गडचिरोलीच्या जंगलात शिरले.
२०१३ मध्ये जंगलातील काही नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यांचे जबाब घेत असताना त्यांच्यासमोर कबीर कला मंचाच्या सदस्यांची छायाचित्रे इतर लोकांच्या छायाचित्रांसोबत मिसळून त्यांना दाखवण्यात आली. तेव्हा त्यांनी नेमकेपणाने कबीर कला मंचाच्या सदस्यांची ओळख करून ते काही काळासाठी बनावट नावे धारण करून, जंगलातील नक्षल चळवळीत सक्रिय सहभागी असल्याचे, शस्त्र बाळगण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे, भाकप या प्रतिबंधित संघटनेचे नेते म्हणून त्यांची ओळख करून दिल्याचे सांगितले.
मिलिंद राजू, वसंत शंकर शेलार, लक्ष्मी जालिंदर कांबळे, प्रवीण कांबळे, जीवन नरोटे, निलेश कांबळे, या सर्वानी आत्मसमर्पणानंतर सुनावणी दरम्यान, सचिन मारुती माळी आणि शितल हनुमंत साठे हे भाकप माओवादीची नक्षल विचारधारा मानत होते, तथापि स्वतःला कबीर कला मंच या सामाजिक संघटनेचे सदस्य असल्याचे वरकरणी दाखवत होते. परंतु कबीर कला मंचच्या अंतर्गत संवादात सशस्त्र क्रांतीचे नियोजन व इतर चर्चा केल्या जात असत, इत्यादी स्फोटक माहिती पोलीसांना दिली आहे.
जीवन राम साई या समर्पित नक्षलच्या जबाबानुसार हे दोघे नावेरझारी जंगलामध्ये झालेल्या विभागीय कमांडर त्यांच्या शिबिराला हजर होते. यात शंभर ते १२५ नक्षलवादी नक्षल प्रशिक्षण घेण्यासाठी शस्त्रांसह सहभागी झाले होते. अन्य एक साक्षीदार विक्रांत उर्फ विक्रम याच्या जबाबानुसार कबीर कला मंचाच्या या लोकांनी त्याला खडकीहून अहमदनगर कडे स्फोटके भरून जाणाऱ्या ट्रक विषयी माहिती जमवण्याचे काम दिले होते. २०११०-११ या काळात नगरला राहून त्याने हि माहिती काढली. तसेच वर्ध्याजवळील पुलगाव येथून सेंट्रल अम्युनिशन डेपो येथून जाणाऱ्या ट्रक्स ची माहितीही काढली होती. मिलीं तेलतुंबडे याने जिलेटीन आणि डिटोनेटर ची वाहतूक करण्यासाठी एक मोटारही दिली होती.
म्हणजे प्रतिबंधित भाकप माओवादी या संघटनेचे सदस्य कबीर कला मंच, देश रक्षा युवा मंच, युवा पँथर, आयडियल ग्रुप, दैशभक्ती युवा मंच इत्यादी विविध फ्रंट संघटनांच्या माध्यमातून महाविद्यालयांमध्ये व पुणे शहराच्या उपनगरांमध्ये माओवादी विचार पसरवण्याचे शहरी भागातून सशस्त्र क्रांतीसाठी केडर जमवण्याचे काम करत होते. त्यानुसार जहाल नक्षलवादी गोपी याने कबीर कला मंचाच्या सदस्यांबरोबर काम केले असून त्या सर्वांचा जंगलातील सक्रियतेचा वृत्तांत त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात नोंद झाला आहे.
पुण्याचे संतोष शेलार व प्रशांत कांबळे हे सुद्धा कबीर कला मंचाच्या सचिन माळी, शीतल साठे, सागर गोरखे यांच्या संपर्कात येऊन नक्षली चळवळीत सहभागी झाले. संतोष उर्फ पेंटर उर्फ विश्वा यांनी काढलेली चित्रे, माओवादी विचारांची पुस्तके, बंदुका, वॊकीटॉकी, माईन्स इत्यादी युद्धसामग्री गडचिरोली जिल्ह्याच्या पुराडा येथील मरझर जंगलामध्ये सापडली. इथे त्या चकमकीत ६० नक्षली मारले गेले होते. आम्ही वस्तीत कबीर कला मंच चा कार्यक्रम ठेवला नसता तर आमचा मुलगा वाचला असता, असे संतोष च्या आई सुशीला यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
या संतोष सोबतच कबीर कला मंचाच्या नादाला लागून, गेल्या तब्बल १५ वर्षांपासून फरार झालेला, नक्षलवादी प्रशांत जालिंदर कांबळे उर्फ लॅपटॉप याला पोलिसांनी पुणे येथे ४ मे २५ या दिवशी २०११ साली दाखल झालेल्या गुन्ह्यासाठी पकडले. संगणकाचे उत्तम ज्ञान असणारा प्रशांत दुहेरी जीवन जगत होता. १० मार्च २०१८ रोजी युट्यूबवर पोस्ट झालेल्या ‘उलगुलान – एव्हरीडे हिरो’ नावाच्या एका लघुपटात तो झळकला होता. तीन मिनिटांच्या या लघुपटात त्याचे नाव “सुनील जगताप सर” असे नमूद असून, तो खालापूर (रायगड जिल्हा) येथल आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक काम करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे. लघुपटात तो स्वतःच्या कामाची माहिती सांगताना दिसत आहे आहे. त्याने सुनील जगताप नावाने खालापूरच्या पत्त्यावर आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड आणि पासपोर्ट देखील मिळविल्याची धक्कादायक माहिती* तपासात समोर आली आहे. तो २०२१ मध्ये शेतकरी आंदोलनातही सहभागी झाला होता व नेपाळसह भारतातील विविध राज्यात फिरायचा, असे पोलिसांनी मुंबई सेशन कोर्टात सांगितले आहे.
आता याच्या पुढचा विषय येतो २०१५ साली माओवाद्यांच्या ईस्टर्न रिजनल ब्युरो या भाकपच्या भूमिगत गटाच्या विभागीय समितीच्या बैठकीत घोषित झालेल्या एल्गार परिषदेचा. या षड्यंत्रात सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, व्हर्नोन गोंसाल्विस आणि वरवरा राव यांचा स्पष्ट सहभाग असल्याचा ठोस पुरावा उपलब्ध झाला आहे. यात विविध समाज घटकांमध्ये तेढ निर्माण करून व्यवस्थेप्रती असंतोष व अराजक निर्माण करण्याचा उद्देश उद्दिष्ट ठरवण्यात आले होते. ही जबाबदारी माओवादी फ्रंट संघटना कबीर कला मंच व रिपब्लिकन पँथर यांच्याकडे देण्यात आली होती. त्यासाठी सुधीर ढवळे, महेश राऊत, सोमा सेन, व सुरेंद्र गडलिंग यांच्या माध्यमातून माओवादी संघटनेने निधी पुरवला होता. त्यानुसार चिथावणीखोर गाणी, पथनाट्य, नाटके, भाषणे, पुस्तके व इतर साहित्याच्या वाटप व विक्रीतून लोकशाही शासनाच्या विरोधात लोकांना एकत्रित करून द्वेष भावना पसरवण्याचे षडयंत्र रचले गेले होते. त्यानुसार खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे करून त्यांनी विविध सामाजिक घटकांमध्ये तेढ निर्माण केली. त्यामुळे महाराष्ट्र दिनांक १ जानेवारी २०१८ या दिवशी आणि त्यानंतर प्रचंड हिंसाचार माजला. कोरेगाव भीमा परिसरात जाळपोळ दगडफेक झाली. त्यात जीवित हानी व सार्वजनिक व वैयक्तिक मालमत्तांचे नुकसान करण्यात आले. तपासांती असे लक्षात आले की कोरेगाव भीमा ही घटना त्यांच्या व्यापक षड्यंत्राचा केवळ एक हिस्सा आहे. याचा महत्त्वाचा भाग म्हणजे अनेक ख्यातनाम शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना माओवाद्यांच्या प्रभावाखालील जंगल भागामध्ये नेऊन त्यांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यात आले.
