झरदारींनी केली चव्हाणांची पोलखोल!

झरदारींनी केली चव्हाणांची पोलखोल!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात या आपल्या कार्यक्रमात २०२५ या सरत्या वर्षातील विविध घडामोडींचा आढावा घेतला. त्यात स्वाभाविकच ऑपरेशन सिंदूर हा भारताच्या विविध मोहिमांमधील सर्वाधिक यशस्वी म्हणता येईल असा टप्पा होता. ऑपरेशन सिंदूरने जगाला दाखवून दिले की, भारताची सामरिक ताकद काय आहे. आपण मर्यादित स्वरूपात हल्ले करून कसे शत्रुराष्ट्राला नामोहरम करू शकतो. जगानेही भारताचे कौतुक केले. भारतातील काही खासदार त्यावेळी जगातील विविध देशात जाऊन ऑपरेशन सिंदूरचे महत्त्व समजावून आले. एकूणच या वर्षभरात ऑपरेशन सिंदूरची खूप चर्चा झाली. याचदरम्यान विरोधी पक्षांनी आपली पातळी सोडत या ऑपरेशन सिंदूरवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केली. आपली किती विमाने पडली, किती लोक मारले गेले वगैरे सवाल विचारत पाकिस्तानला एकप्रकारे खाद्य पुरवले. पाकिस्तानातील वृत्तवाहिन्यांनीही असे सवाल विचारणाऱ्या भारतीय नेत्यांची वक्तव्ये दाखवून संधी साधली. तरीही अजून असे प्रश्न वारंवार विचारले जातच आहेत. यातून भारताचे कसे नुकसान होते, याचे भानही या विरोधकांना नाही. नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात  भारताचे नुकसान होत असेल तरीही चालेल अशी धारणा या विरोधकांची झालेली आहे.

पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी नुकतेच एका भाषणादरम्यान वक्तव्य केले की, ऑपरेशन सिंदूरदरम्यान मला लष्करातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, तुम्हाला बंकरमध्ये लपायचे आहे. पण झरदारी यांनी त्याला नकार देत आपण नेते असल्यामुळे आपण असे करणार नाही. भलेही आपल्या जीवाचे काही बरेवाईट झाले तरीही आपण बंकरमध्ये शरण घेणार नाही, असे सांगितले. झऱदारी यांची पत्नी व पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या स्मृत्यर्थ आयोजित कार्यक्रमात झरदारी बोलत होते.

पण मुख्य मुद्दा होता तो, झरदारी यांनी या भाषणादरम्यान आपल्याला बंकरमध्ये लपण्याची विनंती करण्यात आली याचा केलेला उल्लेख. झऱदारी यांनी केलेल्या या वक्तव्यातून स्पष्ट होते की, भारताने केलेले आक्रमण किती भेदक होते. त्या आक्रमणामुळे पाकिस्तानला घाम फुटला होता. त्यातूनच त्यांच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्राध्यक्षांना ही विनंती केली असणार. शेवटी नंतर पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनीच भारतीय अधिकाऱ्यांना फोन करून हे युद्ध थांबवा, शस्त्रसंधी करा अशी विनंती केली होती. ती मान्य करून भारताने युद्ध थांबवले होते. एकूणच भारताचे ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी ठरले हे स्पष्ट झाले. मात्र राहुल गांधी व इंडी आघाडीतील इतर पक्ष सातत्याने ऑपरेशन सिंदूरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहिले. त्यात भर पडली ती पृथ्वीराज चव्हाण या नेत्याची. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि एकेकाळी पंतप्रधान कार्यालयाची जबाबदारी पार पाडणारे म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांची ओळख आहे. पण त्यांनी काय मत व्यक्त केले होते की, भारत ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशीच पराभूत झाला. भारताची विमानेच उडाली नाहीत, पाकिस्तानच्या भीतीमुळे भारतीय हवाई दलाने विमानेच उडविली नाहीत, अशी लोणकढी थाप पृथ्वीराज चव्हाण यांनी मारली.

हे ही वाचा:

जंगल ‘अतिक्रमण’: नवीन तपास अहवाल मागवला

बीएमसी निवडणुकीत महायुती जिंकणार

भीमाशंकर ज्योतिर्लिंगसह कंगना रनौतने पूर्ण केली १२ ज्योतिर्लिंगची अद्भुत यात्रा

पाकिस्तानकडून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा कट

मुळात याच पृथ्वीराज चव्हाण यांनी सुरुवातीला ऑपरेशन सिंदूर कसे महत्त्वाचे होते, भारताने कसा जोरदार प्रतिसाद दिला असे वक्तव्य केले होते. पण कदाचित त्यांची मजबुरी असावी की, राहुल गांधींसमोर आपली प्रतिमा उंचावण्यासाठी किंवा इंडी आघाडीतील स्थान बळकट करण्यासाठी त्यांना नव्याने ऑपरेशन सिंदूरबाबत आपले वक्तव्य करावे लागले. याचा अर्थ स्पष्ट आहे की, पृथ्वीराज चव्हाण आणि झरदारी यांच्यात खरे कोण बोलत आहे हे स्पष्ट झाले.

झऱदारी हे काही पाकिस्तानचे माजी नेते नाहीत किंवा पाकिस्तान सोडून अन्य देशात स्थायिक झालेले नेते नाहीत. ते राष्ट्राध्यक्ष आहेत. ते असेही बोलू शकले असते की, पाकिस्तानमुळे भारताचे नेते बंकरमध्ये लपले किंवा त्यांना लपण्याची वेळ आली. पाकिस्तान या युद्धात जिंकला, पाकिस्तानमुळे भारत चार पावले मागे गेला. अशी वक्तव्ये त्यांनी केली असती तर ते मान्यही करता आले असते कारण शेवटी आपल्या देशातील नागरिकांसाठी ते खोटेही बोलले असते. पण त्यांनी आपल्याला बंकरमध्ये लपण्याची विनंती केली गेली असे सांगितले. त्यातून जो संदेश जायचा तो गेला.

पण इथे भारतात मात्र पृथ्वीराज चव्हाणांसारख्या नेत्यांनी या मोहिमवरच आक्षेप घेतला, त्याच्याविषयी शंका उपस्थित केल्या. पृथ्वीराज चव्हाण असोत कि राहुल गांधी त्यांची वक्तव्ये पाकिस्तानातही लोकप्रिय ठरली. भारतातील विरोधकांनी तर ती डोक्यावर घेतलीच पण पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्यांवरह राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण झळकले. याचा अर्थच ते भारतविरोधी भूमिका घेत आहेत, म्हणूनच त्यांची दखल पाक वाहिन्यांनी घेतली. अशा सगळ्या परिस्थितीत खरे तर भारतीय नेत्यांनी भारत सरकारच्या पाठीशी उभे राहायला हवे होते. जेव्हा पहलगामचा हल्ला झाला त्यानंतर त्यासंदर्भातील कारवाई सरकारने करावी आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत, असे वरवरचे विधान विरोधकांनी केले होते. मात्र प्रत्यक्ष ऑपरेशन सिंदूर झाल्यावर मात्र त्यांनी हा ‘पाठिंबा’ काढून घेत शंका उपस्थित करायला सुरुवात केली. मोदी सरकारची कोणत्याही परिस्थितीत बदनामी व्हावी, देशाचे नुकसान व्हावे एवढाच यामागील उद्देश असू शकतो. तसा नसता तर आपल्या सैन्याचे तरी कौतुक करताना ही मंडळी दिसली असती. त्यापेक्षा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्या बाता मारत होते, त्यावर यांचा विश्वास होता पण सैन्याने घेतलेल्या पत्रकार परिषदा आणि कारवाईची दिलेली माहिती याविषयी ते बोलत नव्हते.

आपण विरोधी पक्ष नव्हे तर देशविरोधी पक्ष आहोत का, असा सवाल यानिमित्ताने जनता विचारत आहे.

Exit mobile version