देशाला महासत्ता बनवायचे असेल तर जल, थल आणि आकाशवर तुमची पकड असावी लागते. गेल्या ११ वर्षांच्या काळात या दृष्टीने भारताचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळात निर्यात वाढवायची असेल तर समुद्र मार्ग सुरक्षित हवेत. समुद्राखाली जे विशाल जग आहे, त्यातील उतार चढावांची अचूक माहिती तुमच्याकडे असावी लागले. ही माहिती मिळवण्याच्या दृष्टीने सर्वेक्षणासाठी उपयुक्त असलेल्या जहाजांची भारत मोठ्या संख्येने निर्मिती करतो आहे. याच श्रेणीतील आयएनएस इक्षकचे काल जलावतरण झाले. समुद्र मार्ग निश्चित आणि निर्वेध करणेच फक्त इथपर्यंत इक्षकची भूमिका नाही. सुमद्र तळाखाली असलेले तेल, गॅसचा शोध हे जहाज घेऊ शकते. समुद्राखाली कुठे किती मत्स्यधन आहे, याची माहिती मिळवण्याची क्षमता या जहाजात आहे.
भारताकडे असलेली विमानवाहू जहाजे, फ्रिगेट, डिस्ट्रॉयर यांच्या तुलनेत आयएनएस इक्षकचे वेगळेपण लक्षात घेण्याची गरज आहे. त्या शिवाय या जहाजाची उपयुक्तता समजणार नाही. गार्डन रिच शिपयार्ड इंजिनिअर्स या कंपनीने या जहाजाची निर्मिती केलेली आहे. आधुनिक जलसर्वेक्षण मोहीमांसाठी हे जहाज महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जहाजाची निर्मिती हे काही सोपे काम नाही. जगातील मूठभर देशांकडे हे तंत्रज्ञान आहे. भारताचा त्यात समावेश आहे. आपण या क्षेत्रांत दिवसेदिवस निपुणता मिळवतोय. ही प्रगती कौतुकास्पद आहे. इक्षकची निर्मिती ८० टक्के हून अधिक स्वदेशी आहे. हे जहाज अत्याधुनिक हायड्रोग्राफिक प्रणालीने सुसज्ज आहे. पाण्याखाली ११ हजार किमी अंतरापर्यंतचा परिसर स्कॅन करण्याची क्षमता या जहाजात आहे. ११ हजार किमीपर्यंत पाण्याखाली असलेले जग, त्यात पहाड, विशाल खडक, खोल गर्ता, वनस्प काहीही या जहाजाच्या नजरेतून सुटत नाही. इक्षक या संस्कृत शब्दाचा अर्थ “मार्गदर्शक” असा आहे. नावातूनच जहाजाच्या कामाचा परिचय व्हावा. ११० मीटर लांबी, ३,४०० टन वजन, तासाला १८ नॉटीकल मैल अंतर कापण्याची जहाजाची क्षमता आहे. इक्षकवर हेलिकॉप्टर डेक आहे. जहाजावर २३१ नौदल जवान आणि अधिकारी तैनात असतील.
भारताला ११०९८ किमीचा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. आपल्या सागरी सीमा आणि सागरी मार्गांचे अद्ययावत नकाशे तयार करण्यासाठी उपयुक्त असलेल्या नव्या चार जहाजांची निर्मिती करण्याचे काम २०१८ पासून आपण सुरू केले. त्यापैकी फेब्रुवारी २०२४ मध्ये संधायक आणि डिसेंबर २०२४ मध्ये निर्देशक या दोन जहाजांचे जलावतरण करण्यात आले. आयएनएस इक्षक हे तिसरे जहाज आहे. हा एकूण प्रकल्प २४३५ कोटी रुपयांचा आहे.
समुद्र तळाशी एक वेगळे जग असते. जमिनीवर जशा डोंगर, पर्वत, दऱ्या असतात तशा समुद्र तळाशीही असतात. समुद्राखालचे हे जग आपल्याला बऱ्यापैकी अपरिचित आहे. समुद्राखाली संपत्तीचे भांडार आहे, हे जागतिक महासत्तांच्या लक्षात आल्यानंतर समुद्र तळाचा अभ्यास आणि सर्वेक्षण करण्यासाठी चीन, अमेरिका सारखे देश प्रचंड पैसा ओततायत. समुद्रात तुमची जहाजे वावरत असताना तुम्हाला समुद्रतळाची व्यवस्थित माहिती नसेल तर अपघात होण्याची आणि तुमच्या जहाजाला जलसमाधी मिळण्याची शक्यता असते. कोट्यवधींचे नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी समुद्र तळाचा अभ्यास अपरिहार्य आहे. त्यासाठी तळाच्या भागाचे सर्वेक्षण करून अचूक नकाशे बनवून घ्यावे लागतात. या नकाशांच्या आधारे तुम्ही व्यापारी आणि नौदलाच्या जहाजासाठी सागरी मार्गांची आखणी करू शकता.
हे नकाशे सामरीक हालचालींच्या दृष्टीनेही महत्वाचे असतात. या नकाशांच्या आधारे नौदलाच्या जहाजांचे, पाणबुड्यांची स्ट्रॅटेजिक हालचाल निश्चित करणे तुम्हाला शक्य होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या सागरी क्षेत्रात घुसखोरीची शक्यता नेमकी कुठे असू शकते याचा तुम्हाला अंदाज येतो. सुमद्रावर तुमची बंदरे असतात. त्यांचा विकास करायचा असेल तर समुद्रतळाचा विचार करता हा विस्तार कितपत होऊ शकतो याबाबत मार्गदर्शन कऱण्याचे काम ही जहाजे करतात. जेणे करून तुमचे सागरी उद्योग, किनारपट्टीवरील पायाभूत सुविधा, सागरी व्यापाराचा विस्तार करणे शक्य होते. आयएनएस संधायक, निर्देशक आणि इक्षक नेमके हेच काम करणार आहेत.
समुद्र हा अपरिचित खजिना आहे. समुद्र तळाशी आणि तळाखाली बरीच संपत्तीत दडलेली आहे. अनेक महत्वाची खनिजे, दुर्मिळ वनस्पती, तेल, वायू, यांच्या अगणित खाणी समुद्र तळाशी दडलेल्या आहेत. इतकेच नाही तर मच्छिमारीच्या व्यवसायाला दिशा देण्याची क्षमता इक्षक सारख्या जहाजांकडे आहे. कारण समुद्र तळाशी मोठ्या प्रमाणात मत्स्यधन कुठे उपलब्ध होऊ शकते, याबाबतची माहिती अशा जहाजांच्या माध्यमातून मिळू शकते. याचा अर्थ देशाला अन्न सुरक्षेची हमी देण्याचे कामही इक्षकच्या माध्यमातून होऊ शकते.
हे ही वाचा:
उज्जैनमधील मशीद पाडण्याविरुद्ध दाखल केलेली याचिका फेटाळली; प्रकरण काय?
वंदे मातरम : भारतीय आत्म्याच्या गीताचा १५० वर्षांचा वैभवशाली इतिहास
आपल्या हत्येच्या कटामागे धनंजय मुंडे !
गोराई- दहिसर मॅन्ग्रोव्ह पार्क – “उत्तर मुंबई ते उत्तम मुंबई” संकल्पनेला गती
देशासाठी आणखी बरेच काही शोधण्याची क्षमता या जहाजांमध्ये आहे. समुद्र तळाशी तेल आणि गॅसचे साठे कुठे सापडू शकतात. याचा अचूक अंदाज बांधण्याचे काम ही जहाजे करू शकतात. भारतीय जहाजबांधणी उद्योगाने स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून अशा जहाजांची निर्मिती करून दाखवली आहे. यात सातत्य आहे. गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की, आपल्या नौदलात स्वदेशात निर्मिती झालेल्या पाणबुड्या, जहाजे, फ्रिगेट्स, विनाशिका सातत्याने दाखल होत आहेत. आपण आपल्या नौदलाची क्षमता वेगाने वाढवतोयत. आपले नौदल मजबूत झाले, समुद्रात आपण शक्तिशाली झालो तर देशाची ताकद आपोआप वाढणार आहे, हे लक्षात घेऊन आपण ही पावले टाकतो आहे.
गार्डन रिच शिपयार्ड या सरकारी कंपनीने आयएनएस इक्षकची निर्मिती केली आहे. गेल्या काही वर्षात ज्या झपाट्याने आपण नौदलाची जहाजे बनवतोय त्या वेगाला तोड नाही. एकट्या गार्डन शिपयार्ड कंपनीची क्षमता २०२४ पर्यंत वर्षाला २४ जहाजे बनवण्याची होती. म्हणजे १५ दिवसाला एक. २०२५ च्या अखेर पर्यंत वर्षाला २८ जहाजे निर्माण करण्याची क्षमता ही कंपनी विकसित करणार आहे. माझगाव डॉक ही सरकारी कंपनीही या क्षेत्रात उत्तम काम करते आहे. भारतीय जहाज बांधणी क्षेत्राला ऊर्जितावस्था आल्याचे चित्र आहे. येत्या काही काळात आपण आपली अंतर्गत गरज भागवून काही देशांना जहाजांची निर्यात करण्याच्या स्थितीत येऊ. त्या दिशेने आपण आधीच पावले टाकली आहेत. भारत येत्या काळात शस्त्रास्त्रांचा मोठा निर्यातदार बनणार असून त्यात जहाज, पाणबुड्यांचा समावेश मोठा असेल.
भारताला जर जागतिक महासत्ता बनायचे असेल तर भारताची जल, थल आकाशावर पकड हवी. आपण तिन्ही दिशांना वेगाने घोडदौड करीत आहोत. जागतिक व्यापार समुद्र मार्गे चालतो. जगभरात तुम्हाला जर निर्वेध व्यापार करायचा असेल तर तुमचे सागरी मार्ग सुरक्षित हवे, तुमच्याकडे उत्तम व्यापारी जहाजे हवी, या जहाजांना संरक्षण देणारी सुसज्ज नौदल जहाजे हवीत. त्या दिशेने आपली पावले पडतायत. जहाज बांधणी क्षेत्रात एकेकाळी अमेरिकेचा दबदबा होता. ती जागा आज चीनने घेतलेली आहे. चीन मोठ्या संख्येने जहाजांची निर्मिती करतोय. भारत देखील या स्पर्धेत उतरलेला आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
