ट्रम्प यांचे हातपाय गारठतील असा कॅनेडीयन सुवर्णपेच

ट्रम्प यांचे हातपाय गारठतील असा कॅनेडीयन सुवर्णपेच

बिनान्स हे जगातील बडया क्रिप्टो ट्रेडींग नेटवर्क आहे. Binance.com ही क्रिप्टोच्या प्रांतातील लोकप्रिय आणि सुरक्षित वेबसाईट. कॅनडातील एका बड्या वित्तसंस्थेने देशातील सोन्याचा मोठा साठा न्यूयॉर्कच्या कॉमेक्समधून चीनच्या शांघाय एक्सचेंजमध्ये हलवण्याच्या तयारीत अशी ही बातमी आहे. दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध झालेली ही बातमी म्हणजे अमेरिकेचे मित्र कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या अमेरिकी अर्थकारणाच्या पाठीवर अखेरची काडी टाकायला तयार झालेले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. ट्रम्प यांनी दुखावलेल्या देशांचे नेते त्यांचा करेक्ट कार्यक्रम करायला तयार झालेले आहेत.

जगातील प्रत्येक बड्या देशातील मीडिया एका मोठ्या उद्योगपतीच्या हाती आहे. त्यामुळे वाचकांपर्यंत तेवढ्याच बातम्या पाठवल्या जातात ज्या त्यांना उघड करायच्या असतात. बाकीचा असली माल तर बाहेर येतच नाही. ही माहिती एका मर्यादीत वर्तुळात फिरत असते. त्यांनी चावून याचा चोथा झाला की मग ती अगदी तळागाळातील वाचकापर्यंत पोहोचते. बिनान्स डॉट कॉमवर प्रसिद्ध झालेली ही बातमी अमेरिकेच्या एकाही बड्या मीडियाने दिलेली नाही. वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाईम्स, ब्लूबर्ग कुठेही नाही. ती बिनान्स वर प्रसिद्ध झालेली आहे. जे क्रिप्टोच्या क्षेत्रातील मोठे नाव आहे.

या बातमीतही एक गोम आहे. जगात सगळीकडे सोन्याचा बोलबाला असताना जगात कॅनडा नावाचा श्रीमंत देश असा आहे, ज्याच्याकडे फक्त कागदी पैसा आहे. त्यातला बराच भाग अमेरिकी डॉलर, बाकी युरो, पाऊंड्स आणि जापनिस येन. एकूण १२७ अब्ज डॉलर. भारताच्या तिजारीत असलेल्या संपत्तीच्या प्रमाणात फूटकळ. कॅनडाच्या तिजोरीत सोने नाही. कधी काळी कॅनडाकडे १०२३ मे.टन. १९६६ मध्ये कॅनडाने हे सगळे सोने अमेरिकेला फक्त २०० दशलक्ष डॉलरला विकले. तेव्हा ब्रेटनवूड पद्धती अस्तित्वात होती. जेवढे सोने आहे, तेवढेच डॉलर छापायचे. १५ ऑगस्ट १९७१ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी ब्रेटनवूड सिस्टीम गुंडाळली आणि अमेरिका मनमानी पद्धतीने डॉलर नावाचा कागद छापू लागली.

कोणताही निर्णय घेतल्यानंतर तो जनतेच्या गळी उतरवावा लागतो. कॅनेडीयन नेत्यांनी तेव्हा जनतेला सांगितले की अमेरिकी बॉण्डमध्ये पैसे गुंतवले तर व्याज मिळते, सोने मात्र तसेच पडून राहाते. आज अशी परिस्थिती आहे की, डॉलरची माती होते आहे. जगभरातील देश डॉलर विकून सोन्यात पैसा गुंतवतायत. डी डॉलरायझेशनची मोहिम जगभरात जोरात असल्यामुळे सोन्याचे भाव कडाडतायत. जगाच्या हे लक्षात आलेले आहे की, येत्या काही वर्षात डॉलरला कागदाची किंमत राहणार आहे. जगातील देश अमेरिकी बॉण्ड विकून पैसे सोन्यात गुंतवत असताना कॅनडाने मात्र बॉण्डची खरेदी सुरू ठेवली. ऑक्टोबर २०२५ मध्ये कॅनडाकडे ४१९ अब्ज डॉलर किमतीचे बॉण्ड्स होते. २०२५ च्या अखेरपर्यंत हा आकडा ४७२ अब्ज डॉलर इतका झाला.

जगातील ज्या देशांनी मोठ्या प्रमाणात अमेरिकी बॉण्ड्समध्ये पैसा गुंतवला आहे त्यात कॅनडाचा समावेश आहे. म्हणूनच बिनान्समध्य प्रसिद्ध झालेली बातमी अमेरिकेसाठी खरा झटका ठरण्याची शक्यता आहे. कॅनडाच्या सरकारी तिजोरीत शून्य टन सोने आहे. मग बियान्सच्या बातमीत ज्या सोन्याचा उल्लेख आहे ते कुठले. बँक ऑफ कॅनडा ही कॅनडाची केंद्रीय बँक इथे सोने नाही. रॉयल बँक ऑफ कॅनडा, स्कॉटीआ बॅंक या दोन बड्या बँकांकडेही नाही. सेण्ट्रल फंड ऑफ कॅनडा हा सोन्यात गुंतवणूक करणारा फंड आहे, त्यांच्याकडे ५२.७ मे.टन सोने आहे. हे कदाचित चीनकडे वळवण्यात आले असल्याची शक्यता बिनान्सच्या बातमीतून दिसते आहे.

ही बातमी क्रिप्टोच्या वर्तुळात अत्यंत विश्वसनीय मानल्या जाणाऱ्या बिनान्सच्या वेबसाईटवर आहे. त्यामुळे ती विश्वासार्ह मानता येऊ शकेल. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर युरोपिय देश आणि जी-७ देशांचा जो उरला सुरला विश्वास होता तो साफ बुडाला ही बाब उघड आहे. कॅनडा हा नाटोचा संस्थापक सदस्य, जी-७ गटातील महत्वाचा देश. शिवाय अमेरिकेचा सख्खा शेजारी. अमेरिकेची सध्या नजर असलेल्या आर्क्टीक क्षेत्रातील महत्वाचा देश. अशा देशानेही आता अमेरिकेला बाजूला ठेवून चीनकडे पाहायला सुरूवात केली आहे.

कॅनडाकडे तर फुटकळ सोने आहे. जर्मनी, इटाली, युके, स्पेन या देशांनी अमेरिकेतून सोने काढून घ्यायची सुरूवात केली आहे. परंतु कॅनडा त्यांच्या पुढचे एक पाऊल टाकतो आहे. एखाद्या देशात तुम्ही जेव्हा सोने ठेवता त्याचे अनेक अर्थ निघतात. त्या देशाच्या आर्थिक, लष्करी बळावर आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याच्या न्यायबुद्धीवर तुम्ही विश्वास व्यक्त करता.

अमेरिकेने रशियाचे डॉलर गोठवले. ग्रीनलॅंडमध्ये तोंड मारण्याचा प्रय़त्न केला. याचा काढायचा तो अर्थ जी-७ च्या देशांनी काढलेला आहे. ट्रम्प वेळ प्रसंगी आपले, सोने सुद्धा गोठवू शकतो आणि एकदा का सोने गोठवले तर आपल्याला गारठायला वेळ लागणार नाही, हे या देशांना कळून चुकले आहे. अमेरिकेबाबत या देशांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे इथपर्यंत ठिक होते. परंतु चीनसारखा देश जो अमेरिकेचा उघड शत्रू आहे, उचापतखोर देश म्हणून ज्याचा लौकीक आहे, अशा देशाकडे कॅनडा जर बघत असेल तर ते अमेरिकेसाठी खतरनाक आहे. म्हणजे सख्या भावाशी पंगा झाल्यामुळे त्याचा शत्रू असलेल्या एखाद्या त्रयस्थ श्रीमंताकडे पैशाचे डबोले ठेवल्यासारखे हे आहे.

हे ही वाचा:

जुहूमध्ये बनावट सोन्याच्या गहाण कर्जाचा घोटाळा

बदलापूरातील नराधमाला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

तामिळनाडूत डीएमके नव्हे सीएमसी सरकार!

सोनं आणि चांदीचे दर आज पुन्हा उच्चांकावर

अमेरिकेला ग्रेट करण्याची घोषणा देत ट्रम्प यांनी अमेरिकेवर इतके प्रहार केले आहे की त्यांच्यानंतर येणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना पुढे अनेक वर्षे ही घाण साफ करावी लागणार आहेत. जगातील सगळ्याच दमदार देशांच्या मनात अमेरिकेबाबत असुरक्षा आणि अविश्वासाचा भाव निर्माण झाला आहे. जग विरुद्ध अमेरिका असे चित्र निर्माण झाले आहेत. आज हे सगळे देश फक्त अमेरिकेपासून बाजूला गेलेले दिसतात. उद्या ते एकत्र येऊन अमेरिकेला बुडवण्याचा विचार करणार नाहीत, हे कशावरून. युरोपियन देशांचे एकूण १२ ट्रिलियन डॉलर अमेरिकेत गुंतवण्यात आलेले आहेत. अमेरिकेतील बोईंगसारख्या अनेक बड्या कंपन्या युरोपातील कंपन्यांवर सुट्या भागांसाठी अवलंबून आहेत. कॅनडा आणि युरोपातील देशांना हात खेचला तरी अमेरिकेचा डोलारा कोसळायला किती वेळ लागेल. बिनान्सच्या बातमीवर विश्वास ठेवायचा तर कॅनडाने तर थेट चीनच्या मांडीवर बसण्याची तयारी केलेली आहे.

कॅनडाने जर अमेरीकी बॉण्ड्स विकायला सुरूवात केली तर अमेरिकेची अवस्था आणखीनच कठिण होईल. युरोपीतील देश याचे अनुकरण केल्याशिवाय राहणार नाहीत.

चीनने सोन्याच्या बाजारात आपली पकड निर्माण करण्यासाठी शांघाय बुलियन एक्सचेंजची काही वर्षांपूर्वी मुहुर्तमेढ रोवली. या बुलियन एक्सचेंजशी थेट लंडन बुलियन एक्सचेंज आणि अमेरिकेच्या कोमेक्सशी स्पर्धा आहे. एकेकाळी जगभरातील देश आपल्या सोन्याचे साठे ब्रिटन, अमेरिका, स्वित्झर्लंडसारख्या देशांच्या बॅंकामध्ये ठेवायचे. भारतही त्यात होता. त्यांच्याकडे जी विश्वासार्हता होती ती निर्माण करून जगभरातील सोने आपल्याकडे साठवले जाईल या दृष्टीने चीन प्रयत्न करतो आहे.

अलिकडे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी चीनला भेट दिली. चीनसोबत सामरीक भागीदारी करण्याची घोषणा कार्नी यांनी या भेटीत केली. अमेरिकेच्या शत्रूशी कॅनडा थेट हातमिळवणी करू असे संकेत कार्नी यांनी दिले आहेत. हा ट्रम्प यांना इशारा आहे. तुमच्या कडे आमच्या पेक्षा मजबूत लष्कर असू शकेल, परंतु आम्हाला गृहीत धरू नका. आम्ही तुमच्या तालावर नाचणार नाही, असे या भेटीतून त्यांनी सुचित केले. कॅनडाचे सोने खरोखरच जर चीनमध्ये हलवण्यात येणार असेल तर कार्नी हे खरोखरच घडू शकते याची झलक चीनला दाखवतायत. सांगण्याचा प्रय़त्न करतायत की, आता तरी सुधरा स्वत:ला. दुसऱ्या महायुद्धाने जगाची घडी बदलली. महासत्ता म्हणून ब्रिटन लयाला गेला, अमेरिका जागतिक महासत्ता बनला. तिसऱ्या महायुद्धाची सुरूवात आर्थिक युद्धापासून झालेली आहे. आणखी एक महासत्ता लयाला जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version