पाकिस्तानने इस्लामिक ‘उम्मा’चा कार्यक्रम करून टाकलाय. उम्मा म्हणजे मुस्लीमांमध्ये असलेला भाईचारा. आपसांतील बंधुभाव व्यक्त करण्यासाठी हा शब्द इस्लामिक देश घाऊक प्रमाणात वापरत असतात. पाकिस्तान नेहमीच ‘इस्लामिक उम्मा’च्या बाता मारत असतो. इस्त्रायल – इराणमध्ये जोरदार जुंपलेली असताना या शब्दाचा पोकळपणा समोर आलेला आहे. इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स’ चे जनरल मोहमद रेजाई यांनी केलेल्या विधानामुळे पाकिस्तानचे पुरते वस्त्रहरण झालेले आहे. ‘इस्त्रायलने इराणच्या विरोधात अणुबॉम्बचा वापर केला तर पाकिस्तान इस्त्रायलवर अण्वस्त्रांनी हल्ला करेल’, असे आश्वासन आम्हाला पाकिस्तानकडून मिळाले असल्याचे ते म्हणाले होते. त्यांचा हा आशावाद फुसका होता, हे उघड होण्यासाठी फार वेळ लागला नाही.
इस्त्रायल इराण संघर्ष झालाच तर पाकिस्तानची भूमिका काय असेल? अशी चर्चा अवघ्या जगात होती. हा संघर्ष नेमका कधी होणार? हे जगात फक्त अमेरिका आणि इस्त्रायल दोन देशांना माहित होते. ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकेने पाकिस्तानची तळी उचलायला का सुरूवात केली? नूरखान हवाई तळावर हल्ला झाल्यानंतर अमेरिकेला कळा का आल्या? अमेरिकेच्या सेण्ट्रल कमांडचे जनरल मायकल कुरीला यांना पाकिस्तान हा दहशतवाद विरोधी लढ्यातील महत्वाचा भागीदार आहे, याची अचानक आठवण का आली? या सगळ्या प्रश्नाचे उत्तर एकच अमेरिकेला इराणचा कार्यक्रम करायचा होता. त्यासाठी त्यांना पाकिस्तानला वापरायचे होते.
पाकिस्तान अमेरिकेच्या बाजूला एका झटक्यात वळत नाही. तो टप्प्याटप्प्याने सोबत येतो. इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आपल्याला मोठा धक्का बसला आहे, असा आव आणत पाकिस्तानी नेत्यांनी ओरडा करायला सुरूवात केली. संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानच्या प्रतिनिधीने आवाज उठवला. ‘हा हल्ला अविचारी असून जागतिक समुहाने तात्काळ इस्त्रायलवर कारवाई करावी’, अशी मागणी केली.
‘ऑर्गनायझेश ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’मध्येही (ओआयसी) पाकिस्तानने हा मुद्दा उपस्थित केला. ‘जोपर्यंत मुस्लीम देशांमध्ये ऐक्य नाही, तोपर्यंत इस्लामी देश लष्करी आक्रमणांचे बळी पडत राहणार’, असे मत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी व्यक्त केले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शराफ यांनीही ‘इस्त्रायलचा हल्ला हा इराणच्या सार्वभौमत्वावर करण्यात आलेले अतिक्रमण’ असल्याची टीका केली.
हे सगळे चित्र पाहिल्यावर एखाद्याला वाटेल की, पाकिस्तानला इराणची किती चिंता आहे. प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. पाकिस्तानचे पडेल फिल्ड मार्शल जनरल आसिफ मुनीर यांनी गेल्या महिन्यात इराणचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ मोहमद बाघेरी यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी आपल्या हातातील घड्याळ काढून बाघेरी यांना भेट दिले. मैत्री, सहकार्य आणि पाठिंबा व्यक्त करणारी ही कृती होती. आजवर पाकिस्तानच्या नेत्यांनी इस्लामी देशांच्या नेत्यांना घड्याळे अनेकदा भेट दिली आहेत. परंतु हातातील घड्याळ काढून भेट दिल्याचा हा पहिला प्रसंग असावा. याच घडाळ्यात असलेल्या जीपीएसचा वापर करून इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याच्या पहिल्या दिवशी बाघेरी यांचा गेम केला, अशी चर्चा आहे. या अशा गोष्टी आहेत, ज्याची पुष्ठी केली जाऊ शकत नाही. पाकिस्तानची ड्रोन इराणी सीमेवर घिरट्या घालत असून इराणचा डेटा अमेरिकेला देत असल्याचीही चर्चा आहे.
इस्लामिक उम्माची चर्चा प्रत्येक वेळी पाकिस्तानचे नेते करीत असतात. प्रत्यक्षात संघर्षाच्या काळात पाकिस्तानची भूमिका काय असते, याकडे नजर टाकली, तर चित्र वेगळेच दिसते. इराणचा काटा काढण्याच्या बरीच वर्षे आधी अमेरिकेने इराकचा कार्यक्रम आटोपला आहे. २००३ मध्ये अमेरिकेने इराकवर आक्रमण केले तेव्हा पाकिस्तानचे नेतृत्व जनरल परवेज मुशर्रफ यांच्याकडे होते. ते पाकिस्तानचे राष्ट्रपती आणि लष्कर प्रमुख होते. सुरूवातीच्या काळात त्यांनी अमेरिकेच्या विरोधात सुरू लावला होता. २००२ आणि २००२ दरम्यान त्यांची विधाने पाहा.
‘अमेरिकेने इराकवर हल्ला केला तर अल कायदाची पाळेमुळे खोदून काढण्याच्या मोहीमेवर त्याचा थेट परिणाम होईल. मुस्लिम जगावर केलेला हल्ला म्हणून या हल्ल्याकडे पाहिले जाईल’, अशी भूमिका सुरूवातीच्या काळात मुशर्रफ यांनी घेतली होती. परंतु अमेरिकेने ३ अब्ज डॉलरचे गाजर दाखवल्यानंतर हा विरोध मावळला. भूमिकेत हळूहळू बदल होत गेला. ‘संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीत हल्ला केला तर पाकिस्तान अमेरिकेला पाठिंबा देईल’, अशी सुरूवात झाली.
पुढे तर पाकिस्तानने अमेरिकेश थेट हातमिळवणी केली. आपले हवाई तळ वापरू दिले. हवाई क्षेत्र वापरू दिले. अल कायदा आणि इस्लामी दहशतवाद्यांच्या संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती पाकिस्तानने अमेरिकेला पुरवली. पाकिस्तानचे १० हजार सैनिक इऱाकला पाठवण्याचीही मुशर्रफ यांची तयारी होती. परंतु पाकिस्तानात पूर्णपणे अमेरिका विरोधी वातावरण होते. सर्व खासदारांनी अमेरिकेला विरोध करण्यासाठी सह्याची मोहिम राबवली. अमेरिकी दूतावासासमोर मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. त्यामुळे मुशर्रफ यांना आपला उत्साह आवरता घ्यावा लागला. परंतु एकूण ‘इस्लामिक उम्मा’ म्हणजे फक्त बोलायच्या गोष्टी आहेत ही बाब त्यावेळी पुरेशी स्पष्ट झाली होती.
इराणच्या संदर्भात पाकिस्तानची पावले तशीच पडताना दिसत आहे. युद्धाला विरोध कऱण्याचा पहिला टप्पा पार पडला आहे. अमेरिकेने पाकिस्तानच्या घशात पैशाच्या राशी ओतल्या की, इराणला दगा देण्यासाठी पाकिस्तान तयार होईल. मोहमद रेजाई यांनी पाकिस्तान इस्त्रायलवर अण्वस्त्रांनी हल्ला करेल असे जाहीर केल्यानंतर पाकिस्तानचे नेते प्रचंड हादरलेले आहेत. ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ या संघटनेच्या व्यासपीठावर मुस्लीम राष्ट्रांनी एक होण्याची गरज आहे, अशी बांग देणारे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी रेजाई यांचे विधान स्पष्टपणे फेटाळले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रायलाच्या प्रवक्त्या मुमताज झारा बलोच यांनी इस्त्रायली वर्तमानपत्रात या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या आहेत, असा खुलासा केलेला आहे. म्हणजे तुम्ही इराणचे काहीही करा, तुमच्यावर अण्वस्त्रांचा हल्ला करण्याचा आमचा अजिबात इरादा नाही, हे पाकिस्तानने जगाला ओरडून सांगितले आहे.
हे ही वाचा:
इराणी हल्ल्यांमध्ये इस्रायलमधील अमेरिकन दूतावासाचे नुकसान
लालू यादव म्हणजे जंगलराज विद्यापीठाचे प्राचार्य
दोन टप्प्यांत पूर्ण होणार जनगणना
भारतासह २४ देशांची सेना शांती प्रशिक्षणात सहभागी
पाकिस्तान जेव्हा अण्वस्त्र सज्ज झाला तेव्हापासून सांगतो आहे. आमच्याकडे असलेली अण्वस्त्रे ही इस्लामिक अण्वस्त्र आहेत. असे सांगून पाकिस्तानने आखाती देशांकडून पैसाही बराच उकळला. परंतु ती इस्लामिक अण्वस्त्रे नाहीत, जगातील कोणत्याही इस्लामिक देशाच्या रक्षणासाठी ती उपलब्ध होणार नाही, असे पाकिस्तानच्या ताज्या भूमिकेवरून स्पष्ट झाले आहे. शब्द गिळणे हा पाकिस्तानचा जुना इतिहास आहे. तरीही एका बाजूला इराणच्या पाठीत खंजीर खुपसताना शब्दांची फुले उधळण्याचे काम पाकिस्तान सुरू ठेवणार आहे, कारण इराण सुपात आणि आपण जात्यात आहोत, हे पाकिस्तानला चांगलेच ठाऊक आहे.
इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा व्हीडियो व्हायरल झाला होता. त्यात ते म्हणतात की इराण, पाकिस्तान सारख्या देशांकडे अण्वस्त्र असणे ही चिंतेची बाब आहे. पाकिस्तानचे खासदार असद कैसर यांनी नॅशनल एसेम्ब्लिमध्ये ही भीती व्यक्त केली की कदाचित इराण नंतर पाकिस्तानचा नंबर लागेल. ही भीती पाकिस्तानला छळते आहे. परंतु इस्त्रायलचे काही वाकडे करण्याची ताकद पाकिस्तानमध्ये नाही. अमेरिका जेव्हा जेव्हा एखाद्या इस्लामी राष्ट्राला टार्गेट करेल तेव्हा जमेल तेवढी खंडणी वसूल कराची, या पलिकडे त्यांच्या हाती काहीच नाही.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
