अराजकवादी सोनम वांगचूक याला लडाखमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर काल अटक करण्यात आली. त्याची रवानगी राजस्थानातील जोधपूरच्या तुरुंगात करण्यात आलेली आहे. इथे तो लॉरेन्स बिष्णोई याच्या सारख्या खतरनाक गॅंगस्टरसोबत राहील. त्याची साथ करायला तिथे आसाराम बापूही आहेत. देशाच्या अखंडतेला आव्हान देणाऱ्या उमर खालिद, अमरीतपाल सिंह यांचे काय झाले, याचा वांगचूकला विसर पडला होता. त्याच्या चिथावणीमुळे झालेली जाळपोळ विसरून विरोधी पक्षांनी हुकूमशाही टीपेला अशा प्रकारची बोंब ठोकली आहे. एका बाजूला वांगचूक यांची पत्नी मोदी सरकारच्या दरबारात प्रतिष्ठा मिळवत असताना दुसऱ्या बाजूला वांगचूकचे हे देशविरोधी चाळे सुरू होते.
देशातील विरोधी पक्ष मोदी द्वेषाने इतका आंधळा झाला आहे की, लडाखमध्ये झालेला हिंसाचार, जाळपोळ आणि मृत्यूही त्यांनी नजरेआड केलेले आहेत. माझा बळीचा बकरा करण्यात आला अशी बोंब सोनम वांगचूक याने ठोकली आहे. मला अटक झाली तर लडाखमध्ये हिंसाचार उसळेल अशी धमकी त्याने दिली होती. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी तो आणि त्याची इको सिस्टीम ताकदीने प्रयत्न करेल. वांगचूकचे समर्थन करताना त्याच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांबाबत विरोधी पक्षातील एकही नेता बोलत नाही. कदाचित त्यांना याबाबत माहिती नाही. कदाचित त्यांना हा विषय जनतेसमोर आणण्याची इच्छा नाही किंवा संशयास्पद आर्थिक व्यवहार हा त्यांच्यादृष्टीने गुन्हा राहीलेला नाही. देशाच्या सुरक्षेबाबत तडजोड झाली तरी चालेल आम्हाला मोदी विरोधाचा कंड शमवायचा आहे, असा विरोधी पक्षांचा खाक्या आहे.
आपल्याला देशद्रोही म्हटले तरी चालेल, आपल्या हातून देशद्रोह झाला तरी चालेल व्होट बँकेचे, मोदी विरोधाचे राजकारण सोडायचे नाही, असा चंग विरोधी पक्षांनी बांधलेला आहे. त्यामुळेच कदाचित जेएनयूमध्ये भारत तेरे तुकडे होंगे, इन्शाअल्ला इन्शाअल्ला, अशा घोषणा देणारा देशाचा गद्दार कन्हैया कुमारला काँग्रेस पक्षाने पद आणि प्रतिष्ठा दोन्ही दिलेली आहे.
या संपूर्ण प्रकरणात सोनम वांगचूक याची पत्नी गीतांजली जेबी यांचेही नाव येते आहे. सोनम वांगचूकच्या एनजीओशी आणि त्याच्या खासगी कंपनीशी दोघांशीही या महिलेचा संबंध आहे. गीतांजली जेबी या कराटेच्या ब्लॅकबेल्ट आहेत. त्यांना नीती आयोगाने २०२२ चा वुमन ट्रान्स्फॉर्मिंग इंडीया अवार्ड देऊन गौरविले आहे. सरकारी वाहिनी डीडीवर त्यांचे भरभरून कौतुक झाले आहे. केंद्रीय मंत्र्यांसोबत त्यांची उठबस आहे. एकूणच हा सगळा घटनाक्रम पहिला की लक्षात येते, की केंद्र सरकारला आधी या दांपत्याच्या मानसिकतेचा अंदाजच नव्हता. जणू यांना केंद्र सरकारने कडेवर घेतले होते.
२०१८ मध्ये वांगचुक दांपत्याच्या हिमालयन इन्स्टिट्युट ऑफ अल्टरनेटीव्ह, लडाख या संस्थेला लडाखमध्ये विद्यापीठ स्थापन करण्यासाठी लेहमधील फ्यांग गावात १३५ एकर जमीन देण्यात आली. २०१९ पर्यंत या जमीनीवर ठरल्याप्रमाणे विद्यापीठाची निर्मिती झाली नसल्यामुळे सरकारने ती काढून घेतली. त्यानंतर सोनम वांगचूक यांचे सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू झाले. २०२३ मध्ये या एनजीओला ६ कोटींच्या देणग्या आल्या होत्या. पुढच्याच वर्षी २०२४ मध्ये हा आकडा दुप्पटी पेक्षा वाढला. संस्थेच्या सात पैकी चार बँक खात्यांची अधिकृत नोंद करण्यात आली नव्हती. या खात्यांमध्ये सरकारच्या माहितीशिवाय विदेशातून दीड कोटी रुपये आले होते. या एनजीओमधून वांगचूक दांपत्याची खासगी कंपनी असलेल्या शेषयॉन इनोव्हेशनमध्ये ६.५ कोटी रुपये फिरवण्यात आले. स्टुडण्ट एज्युकेशनल एण्ड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाख ही वांगचूक दांपत्याची आणखी एक एनजीओ. याच्या भागनडी सुद्धा बाहेर आलेल्या नाहीत. या संस्थेच्या एकूण ९ पैकी ६ बँक खात्यांची माहिती दडवून ठेवण्यात आली. या शिवाय वांगचूक यांची स्वत:ची नऊ वैयक्तित बँक खाती आहेत, त्यापैकी आठ खात्यांची माहिती त्यांनी झाकून ठेवली. २०२१ ते २०२४ या काळात या खात्यातून परदेशात २.३ कोटींची रक्कम पाठवण्यात आली. वांगचूक यांच्या एनजीओचे एफसीआरए परवाना रद्द करण्यात आलेला आहे. ही देवाणघेवाण आपल्या सुरक्षा संस्थांना संशयास्पद वाटू नयेत, अशी बहुधा विरोधी पक्षांची इच्छा आहे. मोदी सरकारला मात्र तसे वाटत नाही. वांगचूक यांच्या आर्थिक भागनडींची चौकशी सुरू झालेली आहेच, या वर्षी ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या त्यांच्या पाकिस्तान भेटीचीही चौकशी होणार आहे. कारण त्यानंतर सहा महिन्यांनी लडाखमध्ये हिंसाचार घडलेला आहे.
भारताच्या चिकन्स नेक बाबत आक्षेपार्ह विधाने करणारा दिल्ली दंगलीचा आरोपी उमर खालिद याला अनलॉफूल एक्टीव्हीटीज प्रिव्हेंशन एक्ट अंतर्गत अटक करण्यात आलेली आहे. अमरितपाल सिंह या खलिस्तानी दहशतवाद्याला मात्र वांगचूक याच्याप्रमाणे रासुका लावण्यात आला होता. देशात अरब स्प्रिंग घडवण्याची स्वप्न वांगचूक पाहात होता. नेपाळमध्ये झालेल्या जेन झीच्या आंदोलनाची उदाहरणे तो देत होता. तरुणांना चेहरे झाकून, हुडी घालून रस्त्यावर उतरण्याचे सल्ले देत होता. हे सल्ले तो कशासाठी देत होता, हे लडाखमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पुरेसे उघड झाले आहे.
हे ही वाचा..
सोनम वांगचुक यांच्या पाकिस्तान संबंधांची चौकशी सुरू; बांगलादेश भेटीवरही प्रश्नचिन्ह
बरेली दंगल प्रकरणी मौलाना तौकीर रझा अटकेत
… म्हणून काँग्रेस नेत्याला ठोठावला १.२४ अब्ज रुपयांचा दंड!
राज कुंद्रावर ईडीकडून १५० कोटींच्या बिटकॉइन घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल
माझा बळीचा बकरा करण्यात येत आहे. सरकारने लडाखला दिलेल्या आश्वासनांची वेळवेर पूर्ती न झाल्यामुळे तरुणांचा उद्रेक झाला, असा युक्तिवाद वांगचूक याने न्यायालयात केलेला आहे. त्याची मागणी लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा अशी आहे. जी मागणी काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला करीत आहेत. म्हणजे इथली कायदा व्यवस्था केंद्राच्या हातात राहणार नाही. पाकिस्तान-चीनशी हातमिळवणी करून येथे मनमानी करायला मेगासेसे गॅंगला मोकळे रान मिळेल. वांगचूक याच्या अटकेनंतर रवीश कुमार, केजरीवाल ही सगळी मेगॅसेसे गँग एका सुरात कोकलू लागली आहे.
या देशात अरुंधती रॉय, वांगचूक यांच्यासारखे मेगॅसेसे पुरस्कार विजेते आहेत. ज्यांचे इरादे सगळ्या जगाला माहिती आहेत. ही अरुंधती पाकिस्तानच्या सुरात सुर मिसळत बोलते, काश्मीरमध्ये सुरक्षा दलांचे जवान अत्याचार करीत असल्याची तद्दन खोटी विधाने करते. भारतात असे लोक खोऱ्याने सापडतील. काँग्रेस नेते राहुल गांधी वेगळे काय करतात, परंतु यांना कोणाचाच वचक उरलेला नाही. परंतु, आता केंद्र सरकारच्या सहनशक्तीचाही अंत झालेला दिसतोय. वांगचूकच्या अटकेने हे बऱ्यापैकी उघड झालेले आहे. देशात असे लोक आहेत, ज्यांचे अनौरस बाप पाकिस्तानात बसलेले आहेत. हा वांगचूक त्यातलाच पाकिस्तानातील पर्यावरण परिषेदत सहभागी होण्यासाठी हा तिथे गेला होता. पाकिस्तानातील एका नामांकीत वृत्त समुहाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एक असा देश जो आपल्या देशात सतत दहशतवादी कारवाया करतोय. असा देश ज्याने लडाखचा एक हिस्सा असलेल्या कारगीलवर आक्रमण केले होते. अशा देशात जायला वांगचूक सारख्या लोकांना जेव्हा लाज वाटत नाही, तेव्हा त्यांचे इरादे काय हे लक्षात येते लडाखमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर केंद्र सरकारला जाग येते आणि मग या वांगचूकची चौकशी केली जाते, हे संतापजनक आहे. पाकिस्तानने पहेलगाममध्ये दहशतवादी हल्ला घडवल्यानंतर खरे तर या वांगचूकला धरायला हवा होता. परंतु, तसे झाले नाही.
लडाख पेटवणाऱ्या या माणसाला तिथे विद्यापीठ बनवण्यासाठी जमीन दिली जाते, त्याच्या पत्नीला पुरस्कार दिला जातो. त्या पत्नीला केंद्र सरकारचे अनेक मंत्री भेटीसाठी लाल गालिचा अंथरतात. मग यासिन मलिकला पंतप्रधान मनमोहन सिंग हसतखेळत भेटले त्यांचा धिक्कार कशाला करायला हवा. यासिन मलिकने काही हत्या केल्या होत्या. वांगचूकने हातात हत्यार धरले नव्हते एवढाच फरक. परंतु, त्याच्या चिथावणीमुळे लडाखमध्ये चार बळी गेलेच की. वांगचूकच्या या देशविरोधी कारस्थानात त्याची पत्नी गीतांजली कितपत सहभागी होती, याची वेळीच चौकशी करा आणि तिच्यावरही कारवाई करा. कारण ज्या एनजीओ आणि कंपनीवर मोदी सरकारने गैर व्यवहाराचा ठपका ठेवलेला आहे, त्यात तिचाही सहभाग आहे. वेळी नाही कारवाई करा अन्यथा कालपर्यंत वांगचूक चीनचा एजेंडा चालवण्यासाठी जे काही करत होता, तेच उद्या गीतांजली करणार नाही, याची हमी कोणी द्यावी?
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
