हा मार्ग देशाला महासत्ता बनण्याच्या दिशेने नेतो…

ऑपरेशन सिंदूर हा एका उगवत्या महासत्तेचा हुंकार आहे

हा मार्ग देशाला महासत्ता बनण्याच्या दिशेने नेतो…

ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने फक्त पाकिस्तानला युद्धात मात दिलेली नाही, चीनसोबत सुरू असलेल्या तंत्रज्ञान युद्धातही निर्णायक विजय मिळवलेला आहे. अमेरिकी संरक्षण विश्लेषक जॉन स्पेन्सर यांनी एका पोस्ट द्वारे हे मत मांडले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष का बिथरले? महासत्तेच्या स्पर्धेत असलेल्या चीनचा चरफडाट का झाला? याचे उत्तर स्पेन्सर यांनी दिलेले आहे.  त्यांनी स्पष्ट केले की भारताची वाटचाल महासत्ता होण्याच्या दिशेने सुरू झालेली आहे. इथे पोहोचण्याचा रोडमॅप भारताला सापडला आहे.

एखादा देश महासत्ता होतो म्हणजे नेमके काय होते? आज अमेरिका महासत्ता आहे, म्हणजे नेमके काय आहे? महासत्ता बनण्याचे जे काही वेगवेगळे निकष आहेत, त्यात तुमचा खजिना भरलेला असला पाहीजे, जगाच्या कानाकोपऱ्यात कोणत्याही क्षणी लष्करी कारवाई करण्याची क्षमता तुमच्याकडे हवी. तुमच्या नौदलाचे अस्तित्व पॅसिफीक, अटलांटीक, हिंद महासागर, आर्क्टीक, दक्षिण महासागरात असायला हवे. तुमच्या विमानवाहू नौकांचा ताफा प्रत्येक महासागरात दिसायला हवा. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात झेपावतील अशी लढाऊ विमाने तुमच्याकडे असायला हवीत. अशा काही गोष्टी तुमच्याकडे असायला हव्यात, ज्या फक्त तुमच्याकडेच आहेत. ज्याचा तुमच्याकडे एकाधिकार आहे. मेटा, यूट्युब, गुगल, व्हाट्सअप या सगळ्या रुपात आज ही मोनोपोली अमेरीकेकडे आहे. चीनने त्यांच्या स्वस्त आवृत्या बनवल्या आहेत. परंतु ती नक्कल आहे. स्वत:चे असे चीनकडे काहीही नाही.

हे सगळे साध्य करण्यासाठी फक्त पैसा नसतो. तुमच्याकडे तंत्रज्ञान असायला हवे. आजवर ज्यांनी जगावर राज्य केले, त्या प्रत्येक देशाकडे पैसा होताच शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान होते. एकेकाळी ज्यांच्या साम्राज्याचा सूर्य मावळत नव्हता, त्या ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला घरघर लागलेली आहे. त्यांच्याकडे जगातील सगळ्या अव्वल असे नौदल होते. आज अमेरिका ही जागतिक महासत्ता आहे. चीन त्या दिशेने पुढे सरकतो आहे.

जगातील बहुतेक प्रबळ देश शस्त्र विकून गडगंज झाले. कारण अद्ययावत  शस्त्रांची निर्मिती हा तंत्रज्ञानाचा परमोच्च बिंदू असतो. तंत्रज्ञानावर जोपर्यंत तुमची पकड नाही तोपर्यंत जबरदस्त मारक क्षमता आणि अचूकता असलेली शस्त्र बनवणे शक्य नसते. एकदा हे जमले की ती शस्त्र सगळ्या जगाला शंभरपट नफा घेऊन विकता येतात.

आज अमेरिकेकडे स्टेल्थ विमानांचे तंत्रज्ञान आहे. त्यांनी एफ२२ रॅप्टर आणि एफ३५ ही स्टेल्थ विमाने बनवलेली आहेत. त्यापैकी एफ ३५ जगातील अनेक देशांना विकली आहेत. त्यांच्याकडे मोठ्या संख्येने आण्विक पाणबुड्या आहेत. दुसऱ्या देशांच्या आण्विक पाणबुड्या शोधून नष्ट करणारी हंटर विमाने आहेत. ड्रोन्स आहेत. विमानवाहू जहाजे आहेत. या विमानांवर, जहाजांवर उत्तम प्रतिची रडार यंत्रणा लागते. त्यांना दिशा देण्यासाठी अवकाशात तुमचे उपग्रह असावे लागतात. उच्च दर्जाचे सॉफ्टवेअर लागते. या साठी जे तंत्रज्ञान लागते, ते निर्माण करण्यासाठी सतत संशोधनावर पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. काल पर्यंत ही मक्तेदारी फक्त अमेरिकेकडे होती. रशियाकडे होती. चीनने तसा प्रयत्न करून पाहिला, परंतु त्यांनी निर्माण केलेली शस्त्रे, एचक्यू-९ ही हवाई संरक्षण यंत्रणा, पीएल १५ ही क्षेपणास्त्रे जे१०, जे १७ थंडर ही लढाऊ जहाजे अगदीच रद्दी आहेत,  हे ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने जगाने पाहिले.

पाकिस्तानचे नेते ठिकठिकाणी जाऊन विजयाचा दावा करीत असले तरी शस्त्र निर्मिती करणाऱ्या चिनी कंपन्यांच्या शेअरचे गडगडलेले भाव आणि भारतीय शस्त्र निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरचे वधारलेले भाव सत्य ओरडून ओरडून सांगतायत. स्पेन्सर यांच्यासारखे तज्ज्ञ त्यावर शिक्कामोर्तब करतायत.

हेच सत्य त्यांच्या पोस्टमधून सांगितलेले आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे फक्त चीनचे वस्त्रहरण झालेले नाही, अमेरिकेचेही झालेली आहे. एफ१६ विमाने भारताच्या हल्ल्यात गारद झालेली आहे. भारतीय बनावटीच्या आकाश क्षेपणास्त्रांनी, बीईएल निर्मित रडार, सेन्सर आणि दूरसंचाराचा उत्तम समन्वय असलेली आकाश तीर, नागास्त्र ड्रोन आदी सीमेवर निर्माण केलेला पोलादी पडदा चीनी क्षेपणास्त्रांना भेदता आलेला नाही. ब्रम्होस क्षेपणास्त्रांनी केलेली कमाल पाहून जग थक्क झालेले आहे.

भारताचा बोलबोला आहे तो काय फक्त ब्रह्मोसमुळे नाही. भारत एका पीसाने बनलेला मोर नाही. भारताने माझगाव गोदी, कोचिन शिपयार्डमध्ये पाणबुड्या, विमानवाहू जहाजांची निर्मिती करतो आहे. सध्या आपल्याकडे विक्रमादित्य आणि विक्रांत अशी दोन विमानवाहू जहाजे आहेत. अशी आणखी सहा जहाजे बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्या दृष्टीने काम सुरू झालेले आहे. देशी बनावटीच्या एमका (एडवान्स मीडिअम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट)या लढाऊ स्टेल्थ विमानाच्या निर्मितीसाठी भारताने कंबर कसलेली आहे. २०३५ पर्यंत सुमारे १५० एमका विमाने बनवण्याचा संकल्प भारताने सोडलेला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही माहिती जाहीर केली आहे. ही विमाने बनवण्यासाठी खाजगी कंपन्यांनाही पाचारण करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

पाकचा बब्बर हा हिंदुस्थानचा गब्बर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ मे रोजी मध्यप्रदेश दौऱ्यावर

पाकिस्तानचे चार तुकडे झाले असते…

न्यूजीलंडचे माजी क्रिकेट प्रशिक्षक डेविड ट्रिस्ट यांचे निधन

भारताने तेजस हे ४.५ जनरेशनचे लढाऊ विमान तयार केलेले आहे. भारताला याचे इंजिन बनवण्यात मात्र यश आलेले नाही. डीआरडीओने कावेरी इंजिनाची निर्मिती केलेली आहे, परंतु याचा जो थ्रस्ट आहे तो जेमतेम ८० किलो न्यूटन इतका आहे. कावेरी इंजिनाचा वापर आपण सध्या ड्रोनसाठी करतो आहे. अमेरिकेच्या एफ३५ चा थ्रस्ट १२५ किलो न्यूटन आहे. आपल्या कावेरीला हा पल्ला गाठायचा आहे. मुळात इंजिनाची निर्मिती हा अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीचा विषय आहे. आपल्या डीआरडीओने त्यात यश मिळवले. आता सवाल त्याची क्षमता वाढवण्याचा आहे. यासाठी पूर्वी साधनसामुग्रीचा तुटवडा असायचा. गेल्या दहा वर्षाच्या काळात केंद्र सरकारने टप्प्याटप्प्याने प्रचंड पैसा उपलब्ध करून दिलेला आहे.

गेल्या दहा वर्षात आपण शस्त्र निर्मितीच्या प्रांतात अनेक चमत्कार केले. पुढच्या दहा वर्षात आपण स्टेल्थ विमाने, आण्विक पाणबुड्या, विमानवाहू जहाजे यांच्या निर्मितीत स्वयंपूर्ण होऊ असे चित्र आज दिसू लागलेले आहे.अमेरिकेत आज जे टॅलेंट राबते आहे, ते जगातून एच१बी व्हीसावर आलेले लोक आहेत. हा व्हीसा म्हणजे अमेरिकेकडे असलेले ब्रह्मास्त्र आहे. या व्हीसावर अमेरिकेत येणारे बरेच लोक भारतीय आहेत. भारतातून एवढ्या मोठ्या प्रमाणात ब्रेनड्रेन झाल्यानंतरही भारतात टॅलेंटची कमतरता नाही.

उलट अमेरिकेच्या तुलनेत आपण तोच दर्जा कायम ठेवून अत्यंत स्वस्तात उपग्रह, शस्त्रास्त्र बनवतो. हा जो जुगाड आहे. तो अमेरिकेला जमत नाही. भारताच्या पहिल्या चांद्रयान मोहीमेचा खर्च फक्त ६१५ कोटी रुपये होता. म्हणजे ७४ दशलक्ष अमेरिकी डॉलर. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या एव्हेंजर एण्ड गेम या सिनेमाचे निर्मितीमूल्य ३५६ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतके होते. म्हणजे जवळजवळ पाच पट.

म्हणजे अमेरिकेने निर्माण केलेले तंत्रज्ञान त्यांच्या २५ खर्चात आपण बनवू शकतो. चीनने सुद्धा स्वस्त तंत्रज्ञान जगाला विकण्याचा प्रयोग केला. परंतु त्यांनी जे निर्माण केले ते केवळ कबाड होते. आपण जे निर्माण करतो ते अमेरिकेपेक्षा सरस असते. हेच आज अमेरिकेला खटकते आहे. चीनला रोखण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज आहे. परंतु ऑपरेशन सिंदूरनंतर भारताला रोखायचे कसे असा प्रश्न अमेरिकेला पडलेला आहे. भारताला महासत्ता बनण्याची चावी सापडली आहे हे त्यांच्या लक्षात आलेले आहे. हा मार्ग सोपा नाही, परंतु भारतासाठी अशक्यही नाही याची जाणीव जागतिक महासत्तांना झालेली आहे. ऑपरेशन सिंदूर हा एका उगवत्या महासत्तेचा हुंकार आहे, हे अमेरिका, चीनच्या लक्षात आलेले आहे. तर भारतीयांसाठी हा आत्मसाक्षात्कार आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version