भिंत फोडताच कामगारांना सापडला ९९ कोटींचा सोन्याचा खजिना

खजिना नेमका कुणाचा, यावर आता कायदेशीर लढाई

भिंत फोडताच कामगारांना सापडला ९९ कोटींचा सोन्याचा खजिना

बेल्जियममध्ये घराच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या कामगारांना भिंत फोडताना तब्बल ९९ कोटी रुपयांचा सोन्याचा खजिना सापडल्याने खळबळ उडाली आहे. पूर्व फ्लँडर्समधील डेंडर्मोंडे येथे सीवर पाइप टाकण्यासाठी खोदकाम सुरू असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला. सुरुवातीला कामगारांना भिंतीत काही नाणी दिसली. ती साधी नाणी असावीत, असा त्यांचा समज होता. मात्र पुढे खोदकाम केल्यानंतर सोन्याच्या विटा, नाणी आणि इतर मौल्यवान वस्तूंचा मोठा साठा समोर आला. या खजिन्याची अंदाजे किंमत ९ मिलियन युरो म्हणजेच जवळपास ९९ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

या खजिन्याचा शोध लागला तेव्हा कामगारांमध्ये १८ वर्षांचा कोबे नावाचा तरुणही होता. तो उन्हाळ्याच्या सुट्टीत पैसे कमावण्यासाठी काम करत होता. सुरुवातीला भिंतीत दिसलेले नाणे त्याला एक युरोचे नाणे वाटले. मात्र काही वेळातच सोन्याची वीट दिसल्याने संपूर्ण टीमला धक्का बसला. एवढा मोठा साठा आढळल्यानंतर कामगारांनी तो स्वतःकडे ठेवण्याऐवजी तातडीने पोलिसांना माहिती दिली. साइट मॅनेजर मारिओ यांनीही स्पष्ट केले की, एवढे सोने लपवून ठेवणे म्हणजे चोरी ठरली असती.
हे ही वाचा:
चिदंबरमना ‘दिमागी नक्षलवादी’ असल्याचा अभिमान!

हंगेरीत पोलिश यात्रेकरूंच्या बसचा भीषण अपघात; १२ जणांचा मृत्यू

द्रविड-पुजारा यांच्या ‘खास क्लब’मध्ये पडिक्कल

नालासोपाऱ्यात केक खाऊन अनेकजण अस्वस्थ

मिळालेल्या खजिन्यात सोन्याच्या विटांसोबत मोठ्या प्रमाणावर सोन्याची नाणी आणि क्रमांक असलेल्या सोन्याच्या पट्ट्यांचाही समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी करून संपूर्ण खजिना ताब्यात घेतला असून तो सध्या अत्यंत सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आला आहे. खजिना नेमका कुणाचा आहे, तो तिथे कधी आणि का लपवण्यात आला होता, तसेच त्याचा कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणाशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.

विशेष म्हणजे, ज्या इमारतीत हा खजिना सापडला ती पूर्वीच्या मद्यनिर्मिती केंद्राशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा खजिना जुन्या मालकाच्या कुटुंबाशी संबंधित असण्याची शक्यता तपासली जात आहे. मात्र अधिकृत मालकी अद्याप निश्चित झालेली नाही. ही इमारत सध्या गरजू नागरिकांसाठी काम करणाऱ्या एका चॅरिटी संस्थेच्या ताब्यात आहे. संस्थेच्या अधिकाऱ्यांनी खजिना जर त्यांच्या संस्थेला मिळाला, तर त्याचा उपयोग गरजू लोकांच्या मदतीसाठी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आता या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे ९९ कोटींच्या या खजिन्यावर नेमका कुणाचा हक्क असणार? बेल्जियमच्या कायद्यानुसार खऱ्या मालकाला हा खजिना परत मिळवण्यासाठी पाच वर्षांचा, म्हणजेच १,८२३ दिवसांचा कालावधी मिळतो. या कालावधीत कोणी वैध मालकीचा दावा केला आणि तो सिद्ध झाला, तर खजिना त्याला परत केला जाऊ शकतो. मात्र पाच वर्षांत कोणीही पुढे आले नाही आणि हा साठा कोणत्याही गुन्ह्याशी संबंधित नसल्याचे स्पष्ट झाले, तर कायद्यानुसार तो शोधणारे कामगार आणि संबंधित मालमत्तेचा मालक यांच्यात वाटला जाऊ शकतो.

दरम्यान, या घटनेची माहिती पसरताच घटनास्थळी खजिना शोधण्यासाठी लोक पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना बांधकामाच्या ठिकाणी अनधिकृतपणे जाण्याचा किंवा स्वतःहून खोदकाम करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा दिला आहे. एका साध्या सीवरच्या कामातून अचानक कोट्यवधींचा खजिना हाती लागल्याने बेल्जियममधील ही घटना सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र हा खजिना नेमका कुणाचा होता आणि अखेर ९९ कोटींच्या या संपत्तीचा कायदेशीर वारस कोण ठरणार, याचे उत्तर आता पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version