हंगेरीच्या एम३ महामार्गावर रविवारी पहाटे झालेल्या भीषण बस अपघातात १२ पोलिश नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. पोलंडमधील यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस रस्त्यावरून घसरून खोल खड्ड्यात उलटल्याने हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी बचाव पथकांनी तातडीने धाव घेत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले.
हा अपघात हंगेरीची राजधानी बुडापेस्टपासून सुमारे १४० किलोमीटर पूर्वेला असलेल्या मेझोकेरेस्तेशजवळ एम३ महामार्गावर पहाटे सुमारे एक वाजण्याच्या सुमारास झाला. बसमध्ये ५७ प्रवासी आणि दोन चालक असे एकूण ५९ जण प्रवास करत होते. अचानक बस रस्त्यावरून बाहेर गेली आणि दरीत उलटली. बस उलटल्यानंतर काही प्रवासी वाहनाखाली अडकले होते. बचाव पथकांना खिडक्यांमधून काही प्रवाशांना बाहेर काढावे लागले, तर क्रेनच्या मदतीने बस उचलून अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात आली.
प्राथमिक तपासात चालकाला डुलकी लागल्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले असावे, असा पोलिसांचा संशय आहे. अपघातानंतर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून या दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. जखमींमध्ये काहींची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
द्रविड-पुजारा यांच्या ‘खास क्लब’मध्ये पडिक्कल
पेपरफुटी तर ३०-४० वर्षांपासून, पण उपाययोजना आजच्या पंतप्रधानांनी केली!
नालासोपाऱ्यात केक खाऊन अनेकजण अस्वस्थ
हायकोर्ट लिपिक भरती परीक्षेत गोंधळ; सर्व्हर डाऊन, संतप्त विद्यार्थ्यांचा ठिय्या
अपघातग्रस्त बसमधील सर्व प्रवासी पोलंडचे नागरिक होते. हे यात्रेकरू बोस्निया-हर्जेगोव्हिनामधील यात्रेवरून पोलंडकडे परतत होते. पोलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने हंगेरीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मदत आणि माहिती समन्वयाचे काम सुरू केले आहे. या दुर्घटनेमुळे पोलंडमध्येही शोककळा पसरली असून पोलंडचे राष्ट्राध्यक्ष कारोल नवरोत्स्की यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती दुःख आणि सहवेदना व्यक्त केली आहे.
या भीषण दुर्घटनेनंतर हंगेरीतील आपत्कालीन यंत्रणा आणि बचाव पथकांनी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य राबवले. अपघातग्रस्त बसचे मोठे नुकसान झाले असून महामार्गावरील वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला. पोलिसांकडून अपघाताचा सविस्तर तपास सुरू असून चालकाच्या वैद्यकीय आणि इतर बाबींचीही चौकशी केली जात आहे. या दुर्घटनेमुळे लांब पल्ल्याच्या रात्रीच्या बस प्रवासातील चालकांच्या विश्रांती आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
