इराणमध्ये अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांत ३८ ठार; ४०० हून अधिक जखमी

चाबहार बंदराचा नियंत्रण मनोरा उद्ध्वस्त

इराणमध्ये अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांत ३८ ठार; ४०० हून अधिक जखमी

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष अधिक तीव्र झाला असून अमेरिकेने सलग सहाव्या रात्री इराणवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत किमान ३८ जणांचा मृत्यू झाला असून ४०० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती इराणच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, ओमानच्या आखातावरील रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या चाबहार बंदरावरील (शहीद कलांतरी पोर्ट) नियंत्रण मनोरा उद्ध्वस्त झाल्याचे अमेरिकेनेही अधिकृतपणे मान्य केले आहे.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांड (CENTCOM) ने दिलेल्या माहितीनुसार, चाबहार बंदरावरील हा मनोरा इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या सागरी देखरेख यंत्रणेचा भाग होता. हा मनोरा होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांच्यावर हल्ल्यांचे समन्वय साधण्यासाठी वापरला जात असल्याचा अमेरिकेचा दावा आहे. त्यामुळे हा मनोरा नष्ट करून इराणची सागरी कारवाईची क्षमता कमकुवत करण्यात आल्याचे CENTCOM ने म्हटले आहे.

अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी सोशल मीडियावर नियंत्रण मनोरा कोसळतानाचे छायाचित्रही शेअर केले. इराणच्या सरकारी वृत्तसंस्था IRNA ने चाबहार बंदरावर हल्ला झाल्याची पुष्टी केली असली, तरी बंदरातील मालवाहतूक टर्मिनल, बर्थ आणि इतर प्रमुख पायाभूत सुविधा सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. सुरक्षा तपासणीनंतर बंदरातील कामकाज पूर्ववत सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

इराणच्या आरोग्य मंत्रालयानुसार, अलीकडील अमेरिकन हवाई हल्ल्यांमध्ये ३८ जणांचा मृत्यू झाला असून ४०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. अनेक जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

या हल्ल्यांमध्ये होर्मोजगान, बुशेहर, सिस्तान-बलुचिस्तान, खुजेस्तान आणि लोरेस्तान या प्रांतांतील अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. सहा पूल उद्ध्वस्त झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच बंदर अब्बास परिसरातील रेल्वे स्थानक, विमानतळ आणि इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरही हल्ले झाल्याचे इराणी माध्यमांनी म्हटले आहे.

दरम्यान, इराणनेही प्रत्युत्तरादाखल अमेरिकेच्या प्रादेशिक हितसंबंधांवर हल्ले सुरू ठेवले आहेत. इराणी रिव्होल्युशनरी गार्डने ओमानमधील अमेरिकेच्या दोन रडार केंद्रांवर हल्ला करून ती नष्ट केल्याचा दावा केला आहे. याशिवाय कुवेत, जॉर्डन, कतार आणि बहरीनमधील अमेरिकेशी संबंधित लष्करी ठिकाणांवरही क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले झाल्याचे वृत्त आहे.

हे ही वाचा:

दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना उचलून नेले रुग्णालयात

‘भारत माता नाही, आरएसएस माता’ म्हणणाऱ्याला टीव्ही चर्चेदरम्यानच चपलेने मारले

रूट ठरला भारताचा कर्दनकाळ

फायनलपूर्वी स्पेनची धाकधूक! यामल-पोरोच्या फिटनेसने वाढवली चिंता

भारतासाठी महत्त्वाची बाब म्हणजे, भारताच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या चाबहार बंदरातील भारतीय व्यवस्थापनाखालील टर्मिनलला कोणतीही हानी झालेली नसल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. हल्ल्यात बंदरावरील वेगळा देखरेख मनोरा उद्ध्वस्त झाला असला तरी भारताच्या व्यावसायिक हितसंबंधांवर परिणाम झालेला नसल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Exit mobile version