व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; १५ जणांचा मृत्यू

बचावकार्य युद्धपातळीवर

व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; १५ जणांचा मृत्यू

व्हिएतनाममधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ फू क्वोक (Phu Quoc) बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी पर्यटन बोट समुद्रात उलटल्याची घटना शनिवारी (११ जुलै) घडली. या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने शोध आणि बचाव मोहीम सुरू केली असून, व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानेही घटनेची पुष्टी करत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असल्याचे सांगितले आहे. या घटनेत १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, भारतीय पर्यटकांचा एक गट फू क्वोक बेट परिसरात समुद्र सफरीसाठी गेला असताना ही दुर्घटना घडली. बोट अचानक उलटल्याने पर्यटकांमध्ये एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक सागरी बचाव पथके, पोलीस आणि इतर आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आणि युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले. 

दक्षिण व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ एक स्पीडबोट उलटल्याने किमान १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बोटीमध्ये ३२ भारतीय पर्यटक आणि चार खलाशी होते. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, स्पीडबोट होन मे रुट बेटावरून आन थोई बंदराकडे जात असताना किनाऱ्यापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर उलटली. तसेच त्या भागात समुद्राची स्थिती खवळलेली होती, अशी माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या बोटीत २४ भारतीय नागरिक प्रवास करत होते. श्रीनिवास नावाच्या एका पर्यटकाने सांगितले की, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू येथील एकूण १०५ पर्यटक व्हिएतनाम दौर्‍यावर गेले होते. त्यापैकी सुमारे २४ जण या बोटीत प्रवास करत होते. या प्रवाशांमध्ये आंध्र प्रदेशातील ५ आणि तामिळनाडूतील १७ पर्यटकांचा समावेश होता. आंध्र प्रदेशातील दोन पर्यटक सुरक्षित असून तीघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच तामिळनाडूतीलही अनेक पर्यटकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दुर्घटनेनंतर व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने अधिकृत निवेदन जारी करून संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात असल्याचे सांगितले. दुर्घटनेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यासाठी दूतावास सज्ज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबतची माहिती सातत्याने गोळा केली जात असल्याचे दूतावासाने म्हटले आहे.

दरम्यान, बोट उलटण्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. हवामानातील अचानक बदल, समुद्रातील लाटांची तीव्रता किंवा तांत्रिक बिघाड यापैकी कोणते कारण या अपघातास कारणीभूत ठरले, याचा स्थानिक प्रशासनाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. तपास अहवालानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

हे ही वाचा:

“काश्मीरमध्ये आमचेच दहशतवादी लढले आणि…”, हिजबुल कमांडरच्या कबुलीने पाकची नाचक्की

एकेकाळी ‘नकोशी’ असणारी वाघीण बनली गिरडच्या जंगलाची ‘राणी’

भारतीय नौदलाला नवे बळ! अत्याधुनिक ‘आयएनएस महेंद्रगिरी’ ताफ्यात

राम मंदिर गैरव्यवहार प्रकरणी २० जणांना जिल्हा सोडण्यास बंदी

फू क्वोक हे व्हिएतनाममधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते. स्वच्छ समुद्रकिनारे, बेटांची सफर, स्कूबा डायव्हिंग आणि बोट राईडसाठी जगभरातील पर्यटक येथे मोठ्या संख्येने येतात. गेल्या काही वर्षांत भारतीय पर्यटकांचाही या बेटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या दुर्घटनेने भारतीय पर्यटकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version