पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात बुधवारी अज्ञात हल्लेखोरांनी मोठा घातपात केला. कुर्रम नदीवरील एक महत्त्वाचा पूल स्फोटकांच्या साहाय्याने उडवून देण्यात आला. ही घटना उत्तर वजीरिस्तान जिल्ह्यातील शेवा तहसीलमध्ये घडली.
या स्फोटामुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पूल उद्ध्वस्त झाल्याने या भागाचा मीरानशाह आणि बन्नू यांच्यासह आजूबाजूच्या अनेक भागांशी असलेला थेट रस्ता संपर्क तुटला आहे.
स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील प्रसिद्ध वृत्तपत्र डॉन ने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे की, पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी पुलाखाली मोठ्या प्रमाणात स्फोटकं लावली होती. स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं.
घटनेनंतर पाकिस्तानी पोलीस आणि सुरक्षा दल तातडीने घटनास्थळी पोहोचले. परिसर सील करून तपास सुरू करण्यात आला आहे. हा पूल या भागासाठी अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा दुवा होता. रोजच्या ये-जा करणाऱ्या नागरिकांबरोबरच रुग्ण, विद्यार्थी, व्यापारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा मार्ग फारच उपयोगी होता.
पूल तुटल्यामुळे आरोग्यसेवा, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि दैनंदिन व्यापारावरही परिणाम झाला आहे. नागरिकांना आता लांब आणि अवघड पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागत आहे.
साधारणपणे बलुचिस्तानमध्ये अशा प्रकारचे हल्ले जास्त होत असल्याचं दिसत असलं, तरी अलीकडच्या काळात खैबर पख्तूनख्वामध्येही अशा घटना वाढताना दिसत आहेत. गेल्या वर्षी ७ डिसेंबरला बन्नू जिल्ह्यातील ममंदखेल भागात एका लिंक पुलावर स्फोट घडवण्यात आला होता.
तसंच, मागील महिन्यात अवघ्या एका आठवड्यात मीर अली तहसीलमध्ये रात्रीच्या वेळी दोन सरकारी शाळा उडवून देण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या ह्युमन राइट्स कमिशन ऑफ पाकिस्तानने २०२५ पर्यंत खैबर पख्तूनख्वामधील सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
