भारत- बांगलादेश तणावादरम्यान ‘चिकन नेक’जवळ चीनी राजदूतांचा दौरा

बांगलादेशच्या अंतरिम सरकारने आयोजित केली होती भेट

भारत- बांगलादेश तणावादरम्यान ‘चिकन नेक’जवळ चीनी राजदूतांचा दौरा

भारत आणि बांग्लादेश यांच्यात वाढत असलेल्या कूटनीतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली चीनचे राजदूत याओ वेन यांना तीस्ता नदी प्रकल्प क्षेत्राचा दौरा घडवून आणला. हा भाग भारताच्या रणनीतिकदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या सिलीगुडी कॉरिडोरजवळ असून, त्याला ‘चिकन नेक’ असे संबोधले जाते. या घडामोडीला प्रादेशिक भू-राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

बांग्लादेशच्या अंतरिम सरकारनुसार, चीनी राजदूतांचा हा दौरा केवळ तीस्ता नदी व्यापक व्यवस्थापन आणि पुनर्स्थापन प्रकल्पाशी संबंधित तांत्रिक मूल्यमापनापुरताच मर्यादित होता. सरकारने स्पष्ट केले आहे की या भेटीमागे कोणताही राजकीय किंवा लष्करी उद्देश नसून, प्रकल्पातील तांत्रिक बाबी समजून घेणे हाच मुख्य हेतू होता.

दरम्यान, मागील काही महिन्यांत मोहम्मद युनूस यांच्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला आहे. डिसेंबर महिन्यात युनूस यांनी चिनी अर्थव्यवस्थेच्या विस्ताराबाबत तसेच भारताच्या ईशान्य भागाला ‘लँडलॉक्ड’ (स्थलरुद्ध) असल्याबाबत केलेल्या टिप्पणींवर तीव्र टीका झाली होती. या वक्तव्यांनंतर ढाका तसेच इतर प्रमुख शहरांमध्ये भारतविरोधी निदर्शने झाली होती. या आंदोलनांदरम्यान भारतीय राजनैतिक प्रतिष्ठानांनाही लक्ष्य करण्यात आले, ज्यामुळे द्विपक्षीय संबंधांतील तणाव अधिकच वाढला.

चीनी राजदूत याओ वेन यांच्यासोबत बांग्लादेशच्या जलसंपदा विषयक सल्लागार सैयदा रिजवाना हसन यांनीही रंगपूर जिल्ह्यातील तेपामधुपुर तालुक्यातील शाहबाजपूर येथील तीस्ता प्रकल्प क्षेत्राला भेट दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, चीन तीस्ता मास्टर प्लॅन (टीएमपी) शक्य तितक्या लवकर अंमलात आणण्यासाठी उत्सुक आहे. तांत्रिक मूल्यमापन पूर्ण होताच प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या दिशेने पावले उचलली जातील, असेही त्यांनी संकेत दिले.

हे ही वाचा:

ग्रीनलँड आणि अमेरिका संघर्ष चिघळणार? अतिरिक्त सैन्याच्या उपस्थितीने पडले प्रश्न

अभिभाषणाच्या मसुद्यात चुकीचे दावे; तामिळनाडूच्या राज्यपालांचा सभात्याग

उत्तर प्रदेशातील हापूरमधून २५० किलो स्फोटके जप्त

“आम्ही नोबेल पुरस्कार देत नाही” नॉर्वेच्या पंतप्रधानांनी हात झटकले

यापूर्वी आठवड्याच्या शेवटी चीनी राजदूतांनी बांगलादेशचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खलीलूर रहमान यांचीही भेट घेतली होती. या भेटीनंतर युनूस यांच्या प्रेस विंगकडून निवेदन जारी करण्यात आले. त्यात म्हटले होते की, “दोन्ही बाजूंनी परस्पर हितसंबंधांशी निगडित मुद्द्यांवर विचारविनिमय केला असून, बांगलादेश आणि चीन यांच्यातील दीर्घकालीन मैत्री आणि विकासात्मक सहकार्याची पुनःपुष्टी करण्यात आली आहे.” विशेष म्हणजे, मागील वर्षी युनूस यांनी भारताच्या ईशान्य भागाला ‘लँडलॉक्ड’ म्हणत, त्या भागात चीनने आपला प्रभाव वाढवावा, असे वक्तव्य केले होते. यावरून नवी दिल्लीने तीव्र आक्षेप नोंदवला होता.

Exit mobile version