उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील थराली शहरात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ढगफुटी झाली. यात जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थान, तहसील कार्यालय परिसर आणि अनेक घरांमध्ये चिखल शिरला आहे. दरम्यान एक तरुणी ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहितीही समोर आली आहे.
जिल्ह्यातील थराली बाजार, केदारबगड, राडीबगड आणि चेपडोंमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पोलीस आणि प्रशासनाची पथके बचाव आणि मदतकार्यांमध्ये व्यस्त आहेत. ढिगाऱ्याखाली दबून अनेक वाहनेही नुकसानग्रस्त झाली आहेत. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने थराली तालुक्यातील बारावीपर्यंतच्या सर्व शिक्षण संस्थांमध्ये आज, शनिवारी सुटी जाहीर केली.
जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे 1 वाजेच्या सुमारास थराली शहरात मुसळधार पावसात ढगफुटी झाली. त्यानंतर प्रचंड वेगाने आलेल्या पाण्यामुळे वाहत आलेला चिखल अनेक घरांमध्ये घुसला. रस्ते तळ्यांसारखे झाले. एसडीएम थराली यांच्या निवासस्थानी आणि तहसील कार्यालयातही चिखल आणि गाळ साचला.
तहसील कार्यालय परिसरात उभ्या असलेल्या काही वाहनांवर मलबा पडला. तर शहराजवळील सागवाडा गावात एक तरुणी ढिगाऱ्यात अडकली. यामुळे संपूर्ण परिसरात गदारोळ निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. जिल्हाधिकारी डॉ. संदीप तिवारी यांनी सांगितले की, पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी उपस्थित असून, मदत आणि बचावकार्य सुरू झाले आहे.
यासंदर्भात थरालीचे उपजिल्हाधिकारी पंकज भट्ट यांनी सांगितले की, तालुक्यातील राडीबगड, सागवाड आणि कोटदीपमध्ये भूस्खलनामुळे घरांमध्ये मलबा घुसला आहे. वाहनेही मलब्यात गाडली गेली आहेत. पाऊस सतत सुरू आहे. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तहसील प्रशासन आणि पोलीस रेस्क्यूमध्ये गुंतले आहेत. दरम्यान एक तरुणी अजूनही बेपत्ता असल्याचे त्यांनी सांगितले.
