पाकिस्तानी लष्कराचे शत्रू असलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) च्या सदस्यांनी पाकिस्तानचे स्वयंघोषित फील्ड मार्शल असीम मुनीर यांना आता थेट खुले आव्हान दिले आहे. टीटीपीने असीम मुनीर यांना पाकिस्तानच्या कोहट भागात येण्याचे आवाहन करणारा एक व्हिडिओ जारी केला आहे. तालिबान आणि पाकिस्तानी सैन्यातील युद्धानंतर टीटीपीने हे आव्हान दिले आहे.
टीटीपीने म्हटले आहे की, पाकिस्तानी सैन्याच्या सैनिकांना युद्धभूमीवर पाठवण्याऐवजी, जर तुम्ही मर्द असाल तर तुम्ही स्वतः कोहटला या. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात स्थित कोहट परिसर हा टीटीपीचा बालेकिल्ला आहे आणि हा भाग अफगाणिस्तानच्या सीमेवर आहे. या भागात टीटीपी दहशतवाद्यांचे वर्चस्व आहे. याच भागात पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले आहे.
टीटीपीने पाकिस्तानी लष्करप्रमुखांवर टीका करणारे अनेक व्हिडिओ जारी केले आहेत. या व्हिडिओमध्ये दिसणारा टीटीपी कमांडर हा असीम मुनीर यांना उघडपणे धमकी देत असल्याचे पाहायला मिळत आहे. तो म्हणत आहे की, सैनिकांना युद्धभूमीवर पाठवण्याऐवजी मुनीरने पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवावे. या व्हिडिओमध्ये खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कुर्रम भागात ८ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्याचे व्हिडिओ फुटेज देखील दाखवण्यात आले आहे. या हल्ल्यात २२ पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली असा दावा टीटीपीने केला आहे.
हे ही वाचा :
विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करणार अलविदा?
युद्ध निधीला आळा घालण्यासाठी रशियाच्या दोन तेल कंपन्यांवर अमेरिकेकडून निर्बंध
आसाम सरकारची ‘लव्ह जिहाद-बहुपत्नीत्व’ विरोधात विधेयक मांडण्याची योजना!
बिहारमधील कुख्यात रंजन पाठक-मनीष पाठक टोळीचा खात्मा; चौघांचा ‘एन्काऊंटर’
टीटीपी कमांडर हा काझिम असल्याचे सांगितले जात असून काझिम म्हणाला, जर तू मर्द असशील तर आमच्याशी सामना कर. त्याच व्हिडिओमध्ये काझिम असेही म्हणाला, जर तू आईचे दूध प्यायले असेल तर आमच्याशी लढ. यापूर्वी, २१ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी काझिमला पकडण्यासाठी माहिती देणाऱ्याला १०० दशलक्ष पाकिस्तानी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
