अमेरिकेच्या अर्कांस येथील भारतीय वंशाचा एक तरुण सध्या हद्दपारीची टांगती तलवार घेऊन जगत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. स्थानिक पोलिसांनी नियमित ट्रॅफिक स्टॉप दरम्यान “अफीम” लेबल असलेल्या परफ्यूमच्या बाटलीला ड्रग्ज समजून अर्कांससमधील भारतीय वंशाचा कपिल रघु याला चुकीच्या पद्धतीने अटक केली होती. यानंतर त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला होता. आता आपला अमेरिकन व्हिसा पुन्हा सुरू करण्याची मागणी त्याने केली आहे. मे महिन्यात त्याला अटक करण्यात आली, त्यानंतर त्याला यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्यात आले. आता, रघु हद्दपारीच्या धोक्यात जगत असल्याचे त्याच्या वकिलांनी सांगितले.
भारतीय वंशाचा रघु याने एका अमेरिकन महिलेशी विवाह केला आहे. त्याला ३ मे रोजी बेंटन पोलिसांनी किरकोळ वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल अटक केली. गाडी थांबल्यानंतर, पोलिस अधिकाऱ्यांना तपासादरम्यान त्याच्या गाडीत “अफीम” असे लिहिलेली एक छोटी बाटली सापडली. यानंतर हे ड्रग्ज असल्याचे गृहीत धरून त्यांनी तातडीने पुढील कारवाईला सुरुवात केली. रघु हा वारंवार त्यांना सांगत होता की, हा केवळ एक परफ्युम आहे मात्र, त्याला ड्रग्ज बाळगल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली. ही घटना पोलिसांच्या बॉडीकॅम फुटेजमध्ये कैद झाली.
यानंतर पुढील कारवाईमध्ये अर्कांस स्टेट क्राइम लॅबने पडताळणी केली असता रघु याच्याकडील बाटलीत अफीम नसून परफ्यूम असल्याचे सिद्ध झाले. असे असूनही, रघुने तीन दिवस तुरुंगात घालवले, जिथे अधिकाऱ्यांनी त्याच्या इमिग्रेशन कागदपत्रांमध्ये समस्या निर्माण केली आणि त्याची व्हिसाची मुदत संपल्याचा दावा केला. रघुचे वकील माइक लॉक्स यांनी व्हिसाची मुदत संपल्याचे वर्णन प्रशासकीय चुकीमुळे झाल्याचे सांगितले.
हे ही वाचा :
धर्मांतरासाठी परकीय निधी आणि… छांगुर बाबाविरुद्धच्या आरोपपत्रात मोठे खुलासे
भारताने पाकला ‘ऑपरेशन सर्चलाइट’ची आठवण का करून दिली?
टिलामोडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई
अटकेनंतर, रघुला लुईझियाना येथील संघीय इमिग्रेशन सुविधेत हलवण्यात आले, जिथे त्याला यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंटने ३० दिवसांसाठी ताब्यात ठेवले. जरी २० मे रोजी जिल्हा न्यायालयाने अंमली पदार्थांचा आरोप रद्द केला असला तरी, रघुचा अटकेदरम्यान व्हिसा रद्द करण्यात आला होता, ज्यामुळे त्याच्या अमेरिकेतील कायदेशीर स्थितीवर गंभीर परिणाम झाला होता. त्यामुळे सध्या त्याची सुटका झाली असली तरी “हद्दपारी”चा दर्जा हटलेला नाही. यामुळे त्याला काम करण्यापासून रोखण्यात आले आहे.
