भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षादरम्यान पाकिस्तानकडून भारतविरुद्ध गरळ ओकण्याचे काम अजून थांबलेले नाही. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले असून सर्वात महत्त्वाच्या अशा सिंधू जल कराराला स्थगिती दिली आहे. यामुळे पाकिस्तान चिंतेत आहे. त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारताला पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. अशातच आता पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांची भाषा बोलण्यास सुरुवात केली आहे.
पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी दहशतवादी हाफिज सईदसारखीच भाषा वापरून भारताला धमकी दिली आहे. पाकिस्तानमधील एका विद्यापीठात भाषणादरम्यान अहमद शरीफ चौधरी यांनी भारताला उद्देशून म्हटले की, जर तुम्ही आमचे पाणी अडवले तर आम्ही तुमचा श्वास रोखू. यापूर्वी अशाच आशयाचे विधान २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार, लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईद याने केले होते. आता लष्करी अधिकाऱ्यांच्या तोंडीही अशीच भाषा असल्याने पाकिस्तानवर टीका केली जात आहे.
भारत सरकारने २३ एप्रिल या दिवशी सिंधू जल करार स्थगित केला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने हे मोठे पाऊल उचलले. १९६० मध्ये स्वाक्षरी झालेला आणि जागतिक बँकेच्या मध्यस्थीने केलेला हा करार दोन्ही देशांमधील सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याच्या वाटणीचे नियमन करतो. पाकिस्तानचे कृषिक्षेत्र, सिंचन क्षेत्रा या नद्यांच्या पाण्यावर अवलंबून असून यामुळे पाकिस्तानला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा..
पाकला माणुसकीचा विसर; हवाई हद्द वापरण्याची इंडिगोच्या पायलटची विनंती नाकारली
पाकसाठी हेरगिरी करणारा तुफैल ६०० पाकिस्तानी नंबरच्या होता संपर्कात
“मुनीर यांनी स्वतःला फील्ड मार्शलऐवजी ‘राजा’ पदवी द्यावी”
बांगलादेश अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस राजीनामा देणार?
यापूर्वी, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) प्रमुख बिलावल भुट्टो- झरदारी यांनी करार स्थगितीच्या भारताच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. “सिंधू आमची आहे आणि आमचीच राहील. आमचे पाणी त्यातून वाहील किंवा त्यांचे रक्त वाहील,” असे विधान करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती.
