पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली वाराणसी येथून एकाला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद तुफैल असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून २८ वर्षीय तुफैल याला हनी ट्रॅपद्वारे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांच्या जाळ्यात अडकवण्यात आल्याचे समोर आले आहे. अशातच तुफैल याच्याबद्दल धक्कादायक खुलासे होत आहेत.
एटीएसला तुफैलच्या मोबाईलमधून देशविरोधी व्हिडिओ, संदेश, फोटो सापडले आहेत. माहितीनुसार, तुफैल हा सोशल मीडियाच्या माध्यमातून नफीसा या पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात आला होता. नफीसाचा नवरा पाकिस्तानी सैन्यात सेवा बजावतो. नफीसा हळूहळू तुफैल याला व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक आणि इतर माध्यमांद्वारे भारताबद्दल संवेदनशील माहिती गोळा करण्यास भाग पाडत होती.
एटीएसच्या तपासात असे आढळून आले की तुफैल हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक’चा नेता मौलाना शाद रिझवी याचे व्हिडिओ आणि संदेश विविध व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करत असे. त्याने गजवा-ए-हिंद, बाबरी मशिदीचा बदला आणि भारतात शरिया लागू करणे यासारखे कट्टरपंथी संदेशही प्रसारित केले. याशिवाय राजघाट, नमोघाट, ज्ञानवापी, जामा मशीद, लाल किल्ला, निजामुद्दीन औलिया इत्यादी भारतातील स्थळांचे फोटो आणि माहिती पाकिस्तानी नंबरवर शेअर केल्याचा आरोप आहे. त्याने पाकिस्तानातून चालवल्या जाणाऱ्या गटांच्या लिंक्स वाराणसीतील अनेक लोकांना पाठवल्या होत्या. ६०० हून अधिक पाकिस्तानी नंबरशी तो संपर्कात होता हे देखील समोर आले आहे. एटीएसने तुफैल याच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याला अटक केली.
उत्तर प्रदेश एटीएसला गुप्तचर माहिती मिळाली होती की वाराणसीमध्ये राहणारा एक व्यक्ती भारताच्या अंतर्गत सुरक्षेशी संबंधित माहिती पाकिस्तानला पाठवत आहे. यावर एटीएस वाराणसी युनिटने तपास सुरू केला, ज्यामध्ये असे आढळून आले की आरोपी तुफैल हा पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या लोकांशी थेट संपर्कात आहे. चौकशीनंतर, २२ मे रोजी तुफैलला एटीएस लखनऊने वाराणसीच्या आदमपूर भागातून अटक केली. त्याच्याविरुद्ध लखनऊ येथील एटीएस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हे ही वाचा..
“मुनीर यांनी स्वतःला फील्ड मार्शलऐवजी ‘राजा’ पदवी द्यावी”
बांगलादेश अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस राजीनामा देणार?
हावर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या प्रवेश बंदीचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने का घेतला?
वैष्णवी हागवणेचे सासरे, दीर सापडले, पोलिसांनी केली अटक
तुफैलच्या अटकेनंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कुटुंबीयांनी सांगितले की तुफैल हा अत्यंत धार्मिक स्वभावाचा होता. नियमितपणे उरूस, जलसा आणि व्याख्यानांमध्ये सहभागी व्हायचा. तसेच मौलवींच्या संपर्कात होता. त्यामुळे तुफैलसारखा धार्मिक मुलगा अशा कारवायांमध्ये सहभागी होऊ शकतो यावर कुटुंबीयांना विश्वास बसत नसल्याची माहिती आहे.
